होय, मी भंगारवाला आहे, पण...: नवाब मलिकांचे भारतीय जनता पार्टीला खणखणीत प्रत्युत्तर
ड्रग्ज प्रकरणावरून आता नवाब मलिक आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. 'भंगारवाला' म्हणून हिणवणाऱ्या भाजप नेत्यांना नवाब मलिक यांनी शुक्रवारी सडेतोड उत्तर दिलं.
भाजपशी संबंधित मोहित कंभोज यांचा मेहुणा कॉर्डेलिया क्रूझवरील पार्टीत होता. मात्र, त्याला सोडून देण्यात आले, असा आरोप सुरुवातीलाच नवाब मलिक यांनी केला होता. तेव्हापासून कंभोज व अन्य काही नेत्यांनी मलिक यांना लक्ष्य केले आहे. भंगारवाला म्हणून त्यांना डिवचले जात आहे. यावर मलिक यांनी आज प्रतिक्रिया दिली. 'होय मी भंगारवाला आहे. माझे वडील मुंबईत कपडे आणि भंगारचा धंदा करत होते. वयाच्या १६ व्या वर्षापासून आमदार होईपर्यंत मी स्वत: भंगारचा धंदा करत होतो. माझ्या भावाचेही भंगारचे गोडाउन आहे, हवं तर तिथे जाऊन फोटो काढा. माझे कुटुंब हा व्यवसाय करते. याचा मला अभिमान आहे,' असं मलिक म्हणाले. मात्र, माझ्या आजोबांनी बनारसमधील कुठल्याही डाकूकडून सोने खरेदी केलेले नाही, माझ्या वडिलांनी कुठल्याही चोरांकडून सोने घेतलेले नाही, मी कधी मुंबईत सोन्याचे स्मगलिंग केलेले नाही, मी कुठलेही बुलियन मार्केट बुडवलेले नाही, मी फ्रॉड करून बँकांचे पैसे खाल्लेले नाहीत, मी बोगस कंपन्या निर्माण करून बँकांचे शेकडो कोटी बुडवलेले नाहीत, माझ्या घरी कधीही सीबीआयची धाड पडलेली नाही, मी एखाद्या संस्थेला दिलेला चेक बाऊन्स झालेला नाही, मी मुख्यमंत्री निधीला चेक देऊन बाऊन्स करवून घेतला नाही,' असा टोला मलिक यांनी कंभोज याचे नाव न घेता हाणला.
'भंगारवाला काय करतो हे त्यांना माहीत नाही. भंगारवाला जुन्या वस्तू जमवून त्यांचे तुकडे-तुकडे करतो, भट्टीत टाकतो आणि त्याचे पाणी करतो. या शहरात जितके 'भंगार' आहे, त्यांचे नटबोल्ट खोलून भट्टीत टाकणार आहे. त्यांचे पाणी-पाणी केल्याशिवाय राहणार नाही,' असा इशारा मलिक यांनी दिला.