शेतकऱ्यांच्या प्रश्नाला बगल देऊन कृषीमंत्री अब्दुल सत्तार पळाले

शेतकऱ्यांच्या प्रश्नाला बगल देऊन कृषीमंत्री अब्दुल सत्तार पळाले

कन्नड, ११ एप्रिल : तालुक्यातील जेहूर, चिवळी, आंडगाव, निपाणी, मुंगसापुर आदी परिसरात रविवार (दि.9) रोजी सायंकाळी गारांचा जोरदार तडखा बसला होता. मध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री अब्दुल सत्तार, पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आज (दि.11) रोजी भेट दिली. या वेळी आयोजित सभेत माजी उपसभापती गीताराम पवार व शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे उत्तर न देताच कृषिमंत्री सत्तार यांनी काढता पाय घेतला.

       जेहूर परिसरामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात कांद्या, उन्हाळ बाजरी, मका, गहू आदींची लागवड करण्यात आली होती. या पिकातून शेतकऱ्यांना मोठे उत्पन्न मिळेल अशी आशा होती. मात्र अशातच रविवारी सायंकाळी गारपीठीने परिसराला जोरदार तडाखा दिला. यात शेतकऱ्यांचे हाता तोंडाशी आलेले सर्व पीक डोळ्यादेखत नेस्तनाबूत झाले.    

       परिसरात शेकडो हेक्टरवर क्षेत्र बाधित झाल्याने शेतकऱ्यांचे अक्षरशा कंबरडे मोडले. गारांचा वेग इतका होता की, कांद्याची पात पूर्णपणे नष्ट झाली. परिसरातील झाडांची पाने गळाल्याने झाडे पूर्णपणे बोडखी झाली. अनेक झाडे उन्मळून पडली. घरावरील पत्रे उडाली. विजेचे खांब कोसळले.

       परिसरात सर्व बाजूने गारपिठीची चादर पसरल्याचे चित्र निर्माण झाले. क्षणात होत्याचे नव्हते झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात फक्त अश्रू आणि अश्रूच पाहायला मिळाली. या पार्श्वभूमीवर मंगळवारी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार, पालकमंत्री संदिपान भुमरे, जिल्हाधिकारी   अस्थिक कुमार पांडेय, उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, तहसीलदार संजय वारकड, कृषी अधिकारी भीमराव वैद्य,  बिडिओ ढोकणे यांनी  नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या  शेतात जाऊन धावती पाहणी केली. यानंतर गावातील हनुमान मंदिरामध्ये एका छोटेखानी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषिमंत्री सत्तार हे विविध विषयावर भाष्य करत होते. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाहीत असे विविध मुद्दे चर्चेले जात होते. अशातच शिवसेना  पंचायत समितीचे माजी उपसभापती गीताराम पवार यांनी उभे राहत. ही मदत मिळेल तेव्हा मिळेल मात्र दिवाळीच्या वेळेसही अतिवृष्टी झाली होती. त्या अतिवृष्टीचे पैसे अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. तसेच चालू बाकीदार शेतकऱ्यांना    सरकार प्रोत्साहन पर 50 हजार रुपये देणार होते तेही अध्याप मिळालेली नाहीत.  यावर खुलासा करा असे म्हणताच मंत्री सत्तार यांनी कार्यक्रम आटोपता घेत पळ काढला. यामुळे हे सर्व प्रश्न शेतकऱ्यांच्या मनातील असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

      शिवसेनेचे माजी उपसभापती गीतराम पवार यांनी आतापर्यंत प्रश्न विचारताच कृषीमंत्री सत्तार यांची भंबेरी उडाली.