जुनी पेन्शनसाठी संप, मात्र लाचखोरी चालू : लाचखोर लिपिक अँटी करप्शनच्या सापळ्यात अडकला...
तेल्हारा, दि १६ मार्च : (प्रतिनिधी मोतेबर देशमुख) अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तहसील ऑफिस मधील वर्ग तीन आणि चार चे कर्मचारी जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी 14 तारखेपासून संपावर गेलेले आहेत. सरकारी कामे बंद आहेत. कार्यालयातील लिपिकाची लाचखोरी मात्र सुरू असल्याचा प्रकार बुलढाणा अँटी करप्शन ब्युरोचे अधिकाऱ्यांनी तेल्हाऱ्यात आयोजित केलेल्या सापळ्यातून समोर आला आहे.
बुलढाणा कडून मिळालेल्या माहितीनुसार तेल्हारा येथील एका वाळू वाहतूकदाराला वाळू वाहतूकीसाठी तेल्हारा तहसील कार्यालयातील लाचखोर लिपिक नामे वैभव फुलचंद जोहरे (वय २९ वर्षे) याने दरमहा १००००/- याप्रमाणे हप्ता ठरवून दिलेला होता. मागील तीन महिन्यापासून या वाहतूकदाराने लाचेचे हप्ते भरले नव्हते. लाचेची थकबाकी एकूण तीस हजार रुपये ची मागणी हा लाचखोर लिपिक वाहतूकदाराला सतत करीत होता. वाळू वाहतूकदार नियमानुसार वाळूची वाहतूक करीत असल्याने लाचेची रक्कम लाचखोर लिपिकास देण्याची त्याची तयारी नव्हती. म्हणून या वाळू वाहतूकदाराने लाचखोर लिपिकास धडा शिकविण्यासाठी बुलढाणा अँटी करप्शन ब्युरो गाठले.
बुलढाणा एंटी करप्शन ब्युरो चे पोलीस उपाधीक्षक एस एन चौधरी यांचेकडे लेखी तक्रार केली. पोलीस उपाधीक्षक चौधरी यांनी तक्रारीची पडताळणी केली असता लाचखोर लिपिक वैभव जोहरे याने वाळू वाहतूक सुरळीत चालू देण्यासाठी तक्रारदार यांचेकडे मागील थकीत असलेली तीन हप्त्याची रक्कम रु ३००००/- लाचेची मागणी पंचासमक्ष केलयाचे निष्पन्न झाले.
बुलढाणा अँटी करप्शन ब्युरो चे पोलीस उपाधीक्षक चौधरी यांनी आपले सहकारी पोलीस हवालदार विलास साखरे, पोलीस नाईक प्रवीण बैरागी, रविंद्र दळवी , विनोद लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल अ. काझी, अर्शद शेख आणि दोन पंचांसह लाचखोर लिपिक वैभव जोहरे यास रंगेहात पकडण्यासाठी तेल्हारा येथील शेगाव नाक्यावर सापळा लावला. ठरल्याप्रमाणे लाचखोर लिपिक लाचेची रक्कम घेण्यासाठी शेगाव नाक्यावर आला होता. परंतु त्यास संशय आल्याने त्याने लाचेची रक्कम स्वीकारली नाही. तिथून निसटण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यास अँटी करप्शन ब्युरो चे अधिकाऱ्यांनी पकडले. लाचखोर लिपिक वैभव जोहरे याचे विरुद्ध पोलीस स्टेशन तेल्हारा येथे लाज लुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.