निर्दोष मुसलमानांचा छळ आणि सेक्युलर झुंडांचा असली चेहरा

निर्दोष मुसलमानांचा छळ आणि सेक्युलर झुंडांचा असली चेहरा

         18 वर्ष तुरुंगात सडवूनही ज्यांना शेवटी बाम्बे हायकोर्टाने निर्दोष ठरवले, अशा 12 मुस्लिम तरुणांबद्दल जर काही लोक आजही म्हणत असतील की “त्यांना फाशी द्यायला हवी होती”, तर हे केवळ भारतीय न्यायव्यवस्थेचा अपमान नाही, तर हा इस्लामोफोबियाचा नंगा नाच आहे.

         आणि या घृणास्पद वक्तव्यांचे केंद्रबिंदू आहेत – स्वतःला 'धर्मनिरपेक्ष' म्हणवणारे, पण वागण्यात ठाम मुस्लिमद्वेष्टा असलेले – शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि महाराष्ट्र काँग्रेस. 

       शिवसेना (उद्धव गट)च्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी म्हटले की, "हे आरोपी निर्दोष सुटले, पण त्यांना फाशीच मिळायला हवी होती."

      काय? 18 वर्ष तुरुंगात खितपत पडलेल्यांना, कोणताही गुन्हा न सापडलेल्या व्यक्तींना फाशी? म्हणजे आता न्यायालयाचा निकाल सुद्धा सेक्युलर गँगच्या इस्लामोफोबिक हवेप्रमाणे हवा?  

         महिला, अल्पसंख्याक आणि वंचितांचे प्रतिनिधित्व करणारी काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी या निर्णयाला “दुःखद” म्हटले आहे.

       अरेरे! हेच लोक ‘भाजपचा मुस्लिमविरोध’ दाखवून स्वतःला सेक्युलर म्हणवतात! पण जेव्हा मुसलमान निर्दोष सुटतो, तेव्हा या सेक्युलर गँगच्या पोटात दुखू लागतं! 

          हीच ती हेट सेक्युलर गँग आहे — जी फक्त मुस्लिम मतांसाठी धर्मनिरपेक्षतेची नौटंकी करते. आणि मुस्लिमांनीही डोळे उघडून पाहायला हवे की, ही मंडळी त्यांच्या खऱ्याच अस्तित्वाच्या विरोधात आहेत.

         जो मुसलमान 'निर्दोष' ठरतो, तोही या सेक्युलर गँगच्या डोळ्यात खुपतो. कारण त्यांना ‘मुसलमान’ केवळ जाहीर आरोपी म्हणूनच हवा असतो — कायम झुकलेला, गोंधळलेला आणि मौनातच गेला पाहिजे, अशीच अपेक्षा.

         शिवसेना (उद्धव गट) आणि काँग्रेस – या दोन्ही पक्षांशी मुस्लिम नेते आणि संघटना पद्धतशीरपणे गुंतलेले आहेत. मात्र आज जेव्हा हायकोर्टाच्या ऐतिहासिक निर्णयावर थुंकण्याचे प्रकार होत आहेत, तेव्हा हे तथाकथित मुस्लिम नेते कोठे आहेत?

     ते मौन का बाळगत आहेत? मतासाठी त्यांची मतीही विकली गेली आहे का?  हा निर्णायक क्षण आहे!  जे मुस्लिम अजूनही उद्धव ठाकरे गटाच्या किंवा काँग्रेसच्या कुशीत बसून आहेत, त्यांनी एकदा स्वतःशी प्रामाणिकपणे विचार केला पाहिजे – "मी माझ्या समाजाच्या आत्मसन्मानाला, त्याच्या बेगुनाही रक्ताला किती स्वस्त विकतो आहे?"

          जर तुम्ही या पक्षांकडून हे वक्तव्य मागे घेऊन लावू शकत नसाल, तर तुमचं या समाजात उरलेलं "मुस्लिम नेतृत्व" हे पोकळ आणि लाचार आहे. 

या सेक्युलर स्वघोषित रक्षकांना थुंकून विचारायला हवे – की;  "तुमचं सेक्युलरिझम म्हणजे काय? मुस्लिमांनी जिवंतपणी शत्रू मानलं जावं आणि मेल्यावर ‘समावेशक’ भाषणात फक्त नाव घ्यावं?"

        मुस्लिम समाजाने आता सावध व्हावे लागेल.
नाहीतर ज्यांनी 18 वर्ष तुरुंगात घालवले, त्यांच्यासाठीही ही व्यवस्था डाव्या सेक्युलर हुकूमशहांच्या द्वेषाने अधिकच भयावह ठरेल.

       हक्क मागा, आवाज उठवा, आणि ढोंगी धर्मनिरपेक्षतेच्या चेहऱ्यावरचा मुखवटा फाडा.कारण आज जर तुम्ही गप्प बसलात – तर उद्या तुमचं नावही अशाच एखाद्या खोट्या केसमध्ये लिहिलं जाईल – आणि तेव्हा कुणीही तुमच्यासाठी काही बोलणार नाही!

      "ही लढाई फक्त 12 निर्दोषांची नाही – ही लढाई 'मुसलमान' नावाच्या अस्मितेच्या जगण्याची आहे!"

लेखक: डॉ. रियाज़ देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त (नि), छत्रपती संभाजी नगर