आता व्हाट्सअपवरचे मेसेज एडिट करता येणार
व्हाट्सअप या लोकप्रिय मेसेजिंग ॲप च्या माध्यमातून पाठविण्यात आलेला संदेश आता एडिट करता येणार आहे. व्हाट्सअप ची मालकी असलेल्या मेटा कंपनीचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी सोमवारी फेसबुकच्या माध्यमातून या नवीन फीचर बाबत घोषणा केली.
व्हाट्सअपच्या या फीचर मुळे वापरकर्त्यांना आता कोणालाही संदेश पाठविल्यानंतर पंधरा मिनिटाच्या आत तो एडिट करता येणार आहे. हे फीचर सर्व देशांतील व्हाट्सअप वापरकर्त्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र या फीचर चा वापर करून पाठविण्यात आलेल्या संदेशामध्ये काही दुरुस्ती केल्यास तो संदेश 'एडिटेड' असल्याचे त्या संदेशावर दिसणार आहे. तसेच दुरुस्ती करण्याआधीचा मजकूर कोणालाही दिसणार नाही. असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे. या फीचरमुळे पाठविण्यात आलेल्या संदेशातील एखादे वाक्य किंवा शब्द चुकला असल्यास संपूर्ण संदेश डिलीट करण्याऐवजी तेवढे वाक्य किंवा शब्द दुरुस्त करता येणार आहे.
असे करता येईल एडिटिंग
• संदेश पाठविल्यानंतर पंधरा मिनिटाचे आत एडिट करता येईल
• जो संदेश एडिट करायचा आहे त्यावर बोट दाबून ठेवल्यानंतर संदेश एडिट करण्याचा पर्याय दर्शविण्यात येईल.
• संदेश एडिट करण्याचा पर्याय निवडून संदेशात दुरुस्ती करता येणार.