हरिजन शब्दाने पेटला वाद : जलील यांच्या घरी पोलिस दाखल

छत्रपती संभाजीनगर, 4 जुलै 2025: एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या घरी सायंकाळी पोलिस दाखल झाल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यावर शासकीय जमीन हडपल्याचा आरोप करताना जलील यांनी पत्रकार परिषदेत ‘हरिजन’ हा शब्द वापरल्याने अनुसूचित जातीच्या काही लोकांनी त्यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात पोलिसांनी चौकशीसाठी जलील यांच्या घरी भेट दिली, ज्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांच्यावर शेंद्रा एमआयडीसी, जालना रोड आणि शहाजापूर येथील शासकीय जमिनी स्वस्तात खरेदी केल्याचा गंभीर आरोप केला होता. याप्रकरणी त्यांनी कागदपत्रे सादर करत मुख्यमंत्री आणि राज्यपालांना भेटण्याची तयारी दर्शवली होती. जलील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, शासकीय कागदपत्रांमध्ये या शाजापूरची जमीन ‘हरिजन’ समाजासाठी राखीव असल्याचा उल्लेख आहे, त्यामुळे त्यांनी त्या शब्दाचा वापर केला. मात्र, या शब्दाच्या वापरावरून अनुसूचित जातीच्या काही लोकांनी आक्षेप घेतला आणि त्यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत तक्रार दाखल केली.
आज सायंकाळी सिटी चौक पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांच्यासह अन्य अधिकारी जलील यांच्या मन्नत बंगल्यावर दाखल झाले. यावेळी जलील यांच्या समर्थकांचा जमावही तिथे गोळा झाला होता. पोलिसांनी जलील यांचे जबाब नोंदवले आणि काही वेळाने ते निघून गेले. यानंतर जलील यांनी माध्यमांशी संवाद साधला.
जलील यांनी ठामपणे सांगितले की, त्यांच्याविरुद्ध दाखल केलेला गुन्हा खोटा आहे आणि तो मंत्र्यांच्या दबावाखाली नोंदवण्यात आला आहे. “मी फक्त शासकीय कागदपत्रांमधील शब्द वापरला. ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत शब्द उच्चारणे गुन्हा ठरत नाही. माझ्याविरुद्ध मोर्चा काढणाऱ्या कथित नेत्यांनी भडकल गेट येथे व्यासपीठावरून अश्लील भाषा आणि मला मारण्याचया आणि शहरात फिरू देणार नसल्याच्या धमक्या दिल्या, पण पोलिसांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. हा कोणता न्याय आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, “मी पण त्यांच्यापेक्षा मोठा मोठा मोर्चा काढू शकतो, आमच्या तोंडात ही जीभ आहे, त्यांच्यापेक्षा जास्त चांगल्या भाषेत आम्ही त्यांना उत्तर देऊ शकतो, पण असे खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांना कायदेशीर लढाईतूनच उत्तर देईन. मी सर्वोच्च न्यायालयापर्यंत हा लढा लढेन,” असा इशारा त्यांनी दिला. "ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्याबद्दलच पोलिसांनी त्यांचा जबाब लिहून घेतला" असे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
या प्रकरणानंतर शिरसाट यांच्या समर्थकांनी जलील यांच्या घरी शेण फेकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तसेच, अनुसूचित जातीच्या काही लोकांनी जलील यांना अटक करण्याची मागणी करत क्रांती चौक ते भडकल गेट दरम्यान मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर अन्याय अत्याचार कृती समितीने पाठिंबा दिला होता. या मोर्चादरम्यान कथित नेत्यांनी आक्षेपार्ह भाषा आणि धमक्या दिल्याचा आरोप जलील यांनी केला आहे.
संजय शिरसाट यांनी जलील यांचे आरोप फेटाळले असून ते राजकीय प्रेरित असल्याचे म्हटले आहे. त्यांनी जलील यांच्याविरुद्ध मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला असून, याची सुनावणी 24 जून रोजी होणार आहे. शिरसाट यांनी म्हटले आहे की, जलील यांनी चुकीची माहिती पसरवून त्यांची बदनामी केली आहे.
हा वाद आता केवळ आरोप-प्रत्यारोपांपुरता मर्यादित न राहता रस्त्यावर उतरला आहे. जलील यांनी बेल न घेण्याचा निर्णय घेतला असून, ते कायदेशीर मार्गाने लढण्यास तयार आहेत. दुसरीकडे, शिरसाट यांच्यावर जमीन हडपण्याचे आरोप आणि त्यांच्या समर्थकांचे आंदोलन यामुळे छत्रपती संभाजीनगरातील राजकीय वातावरण तणावपूर्ण झाले आहे. या प्रकरणाचा पुढील टप्पा कायदेशीर लढाई आणि राजकीय हालचालींवर अवलंबून आहे.