नारळीबागेत 51 ग्रॅम एमडी जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा

नारळीबागेत 51 ग्रॅम एमडी जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा

छत्रपती संभाजीनगर, दि. 18 : शहरातील अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात कारवाई करत अंमली पदार्थ प्रतिबंधक पथकाने नारळीबाग परिसरातून 51 ग्रॅम 29 मिलीग्रॅम वजनाचा एमडी (मेफेड्रोन) जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थाची किंमत 2 लाख 53 हजार 870 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

     17 सप्टेंबर रोजी रात्री सुमारे 10 वाजता अंमली पदार्थ प्रतिबंधक पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नारळीबाग परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. यावेळी नदीम इब्राहिम शेख (वय 40, रा. उमर टॉवर, पाचवा मजला, गणेश कॉलनी, आयकॉन हॉस्पिटल परिसर, छत्रपती संभाजीनगर) याच्याकडून विक्रीसाठी आणलेला एमडी जप्त करण्यात आला.

     पोलिसांच्या चौकशीत नदीम शेख याने हा अंमली पदार्थ जाकीर झवेरी (रा. बांद्रा, मुंबई) याच्याकडून आणल्याचे समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी नदीम शेख आणि जाकीर झवेरी या दोघांविरुद्ध सिटी चौक पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) शशिकांत सातव, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मजहर सय्यद आणि पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

       कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव, पोलीस उपनिरीक्षक उद्रेश्वर मुंडे, पोहेकॉ भासिंग चव्हाण, पोहेकॉ नारायण पायघन, पोलीस अंमलदार सतीश जाधव, महिला पोलीस अंमलदार छाया लांडगे, पोलीस अंमलदार देशराज मोरे, सरताज पठाण, विशाल मेटे, चालक पोलीस अंमलदार विठ्ठल पवार तसेच अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

      दरम्यान, शहरात कुठेही अंमली पदार्थांची विक्री अथवा सेवन होत असल्याची माहिती नागरिकांना असल्यास 9684702002 या व्हॉट्सॲप क्रमांकावर संदेशाद्वारे माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.