गणेशोत्सवासाठी 4 DCP, 7 ACP, 33 PI, 105 API-PSI अन् 1570 पोलीस अंमलदारांचा बंदोबस्त!
छत्रपती संभाजीनगर, १५ सप्टेंबर: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्ताची तयारी केली असून, सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडावा यासाठी तब्बल ४ DCP, ७ ACP, ३३ PI, १०५ API/PSI आणि १५७० पोलीस अंमलदार तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय RAFची एक कंपनी, SRPFच्या तीन कंपन्या, ५०० होमगार्ड आणि दोन RCP पथकेही बंदोबस्तात सहभागी असतील.
शहरात यंदा तब्बल ८७९ सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना झाली आहे. जिल्हा गणेश महासंघ, छावणी महासंघ, वाळूज गणेश महासंघ, नवीन छत्रपती संभाजीनगर पूर्व गणेश महासंघ, गारखेडा, सिडको-हडको सर्वपक्षीय महासंघ, बजाजनगर व्यापारी मित्र मंडळ आणि बजाजनगर महासंघ वाळूज महानगर अशा विविध महासंघांच्या माध्यमातून गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
१४ सप्टेंबर रोजी गणेशमूर्तींची स्थापना झाली असून, २५ सप्टेंबर रोजी संपूर्ण शहरात, तर २६ सप्टेंबर रोजी छावणी भागातील गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार असल्याने शहरातील प्रमुख मार्गांवर पोलिसांचा मोठा फौजफाटा दिसणार आहे.
गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी पोलीस आयुक्त प्रविण पवार यांच्या अध्यक्षतेखाली ६ सप्टेंबर रोजी मंथन हॉल, एमआयटी परिसर, बीड बायपास रोड येथे समन्वय बैठक घेण्यात आली. या बैठकीत गणेश मंडळांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेऊन संबंधित विभागांच्या माध्यमातून त्यांचे निराकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना कोणतीही अडचण, मार्गदर्शन किंवा मदत हवी असल्यास संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, सहायक आयुक्त किंवा गरजेनुसार संबंधित परिमंडळाच्या पोलीस उपायुक्तांशी थेट संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात विविध शासकीय आणि संबंधित विभागांमध्ये समन्वय राहावा यासाठी तब्बल ४९ कार्यालयांना पत्रव्यवहार करून आवश्यक खबरदारी आणि उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पोलीस ठाणे स्तरावर शांतता समितीच्या तब्बल ५५ बैठका घेण्यात आल्या आहेत.
कायदा-सुव्यवस्था बिघडविणाऱ्या संभाव्य घटनांना आळा घालण्यासाठी शहरातील १७ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दंगाकाबू योजनेची रंगीत तालीम सुरू आहे. समाजकंटक आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवरही प्रतिबंधात्मक कारवाई करून काहींना हद्दपार करण्यात आले आहे. संवेदनशील ठिकाणी RAF, SRPF, RCP, QRT आणि शहर पोलीस दलाच्या माध्यमातून रुटमार्चही आयोजित करण्यात येणार आहेत.
संपूर्ण उत्सव काळात नियमित बंदोबस्ताव्यतिरिक्त १२ स्ट्रायकिंग फोर्स वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तैनात राहणार असून, आणखी चार स्ट्रायकिंग फोर्स नियंत्रण कक्षात राखीव ठेवण्यात आले आहेत. शहरातील अतिसंवेदनशील २१ ठिकाणी आणि संवेदनशील ७४ ठिकाणी सशस्त्र गार्ड तैनात करण्यात आले आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी तंत्रज्ञानाचीही मदत घेतली आहे. उच्च दर्जाच्या ६ ड्रोनच्या माध्यमातून तसेच कमांड कंट्रोल सेंटरच्या कॅमेऱ्यांद्वारे संपूर्ण शहरावर नजर ठेवली जात आहे. अतिसंवेदनशील आणि संवेदनशील भागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
घातपाताच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या तीन पथकांकडून विशेष तपासणी केली जात आहे. शहराच्या सर्व प्रवेश मार्गांवर चेकनाके कार्यरत करण्यात आले असून संशयित वाहने आणि व्यक्तींची तपासणी सुरू आहे. विशेषतः बाहेरील जिल्ह्यांतून येणाऱ्या DJ वाहनांवर पोलिसांची करडी नजर असून, नियमबाह्य DJ शहरात प्रवेश करू नयेत यासाठी खबरदारी घेतली जात आहे.
ध्वनीप्रदूषणाचा मुद्दाही पोलिसांनी गांभीर्याने घेतला आहे. पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली १२३ पोलीस अंमलदारांना प्रशिक्षण देऊन ध्वनीप्रदूषण नियंत्रण पथके तयार करण्यात आली आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांवर या पथकांकडून कारवाई केली जाणार आहे.
महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी छेडछाडविरोधी पथक तसेच दामिनी पथक कार्यरत ठेवण्यात आले असून शहरात प्रभावी पेट्रोलिंग केले जाणार आहे. गरज भासल्यास दामिनी पथकाच्या ९२२५५८८४९२ या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी ११२ या टोल फ्री क्रमांकावर किंवा पोलीस नियंत्रण कक्षाच्या ०२४०-२२४०५०० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळात भाविकांना महाप्रसादाच्या माध्यमातून अन्नविषबाधा होऊ नये यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अन्नपदार्थांची तपासणी केली जाणार आहे. महत्त्वाच्या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. उत्सव काळात अखंडित वीजपुरवठा राहावा यासाठी महावितरणकडून विशेष पथकेही तैनात करण्यात आली आहेत.
गणेशोत्सव हा शहराच्या सामाजिक सलोख्याची आणि शांततेची परीक्षा घेणारा काळ आहे. त्यामुळे उत्सव उत्साहात साजरा करताना कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त प्रविण पवार यांनी केले आहे. शहरवासीयांना गणेशोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा देताना शांतता, सामाजिक सलोखा आणि बंधुभाव कायम राखण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.