बाळशास्त्री जांभेकर यांची पत्रकार परिषद

बाळशास्त्री जांभेकर यांची पत्रकार परिषद

(बाळशास्त्री जांभेकर यांच्या आत्म्याची माफी मागत)

बाळशास्त्री जांभेकर यांची पत्रकार परिषद

    माझ्या प्रिय संपादकहो, पत्रकारहो आणि न्यूज अँकरबाबांनो, आणि विशेषतः “ब्रेकिंग न्यूज” गाडीच्या चालकहो,

          माझं नाव बाळशास्त्री जांभेकर. होय, तोच! पहिलं मराठी वृत्तपत्र “दर्पण” सुरू करणारा बाळशास्त्री. पण हल्ली तुमचं वृत्तपत्र आणि टीव्ही चॅनल पाहून मला वाटतं, की तुम्ही माझ्या नावावर “आरसा” लावून ठेवलाय! कारण मला तुमचं वृत्तपत्र वाचताना वर्तमानपत्र नाही, तर “फास्टफूड” खात असल्यासारखं वाटतं.

      पहिल्यांदा, मी तुमच्या “ब्रेकिंग न्यूज” संस्कृतीबद्दल बोलणार आहे. तुम्हाला काय वाटतं? जगातल्या प्रत्येक गोष्टीला “ब्रेकिंग” का म्हणायचं? कुणाच्या कुत्र्याला शिंका आली तरी ब्रेकिंग न्यूज! कुणाच्या चहात साखर कमी पडली, तरी ब्रेकिंग न्यूज! खरं सांगतो, माझ्या काळात असं ब्रेक झालं असतं, तर आमच्या छपाईच्या मशिनने आत्महत्या केली असती!

          दुसरी गोष्ट, तुमच्या खोट्या बातम्या... आता बोला! इतकी कल्पनाशक्ती असती तर आमचं ऐतिहासिक “दर्पण” कधीच साहित्यकृती म्हणून विकलं गेलं असतं. तुम्ही तर इतक्या सहजपणे खोट्या बातम्या देता की, मला वाटतं तुम्हाला “अफवा निर्माता पुरस्कार” द्यायला हवा.

            तिसरी गोष्ट, जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या बातम्या. अहो, वर्तमानपत्र हे समाजजागृतीचं साधन असतं, हत्यार नाही. पण हल्ली तुम्ही लोक बातम्यांमधून इतकं विष पेरता की, मला वाटतं तुम्हाला सापाला ‘आत्मसन्मान’ वाटत असेल.

      आणि आता “गोदी मीडियाबद्दल” काही बोलतो. अहो, तुम्ही पत्रकार आहात की राजकीय चमचेगिरीचे गटारे? सत्य लिहिण्याऐवजी तुम्ही तर राजकीय नेत्यांच्या भाषणांची प्रतिकृती वाटताय. माझ्या काळात असं असतं, तर छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन वर्तमानपत्र सुरू करणं अशक्य झालं असतं.

        माझा पुढचा मुद्दा म्हणजे बातम्यांसाठी पैसे घेणे. अहो, पत्रकारितेचा “पेड न्यूज” चा हा गोंधळ पाहून माझं मन म्हणतं, “कागदासाठी झाडं कापली जातात, आणि बातम्यांसाठी सत्याची गळा.”

            शेवटी, एकच विनंती.
“पत्रकार हा समाजाचा आरसा आहे; त्यात सत्यच दिसलं पाहिजे, सेल्फी नव्हे!”

            धन्यवाद, आणि हसत रहा; नाहीतर तुम्ही खोट्या बातम्या तयार करत राहाल, आणि मी वरून पाहत राहीन.

लेखक : डॉ. रियाज़ देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त (सेनि), औरंगाबाद.