HIT FIRE : राणा दाम्पत्याला टीकेची साडेसाती
अफलातून कृती, वादग्रस्त वक्तव्य व त्यातून सकारात्मक असो वा नकारात्मक, अशा दोन्ही पद्धतीने प्रसिद्धीच्या झोतात राहणार्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे यजमान आमदार रवी राणा या आठवड्यात जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात त्यांच्या राजकीय विरोधकांच्या टीकेच्या लक्ष्यस्थानी राहिले आहेत. त्यांच्यावर चहुबाजूने टीकेचा मारा सुरू असताना या ‘अॅक्शन’वर राणा दाम्पत्याकडून कुठलिही ‘रिअॅक्शन’ नाही. याचा अर्थ राणा दाम्पत्याने एकतर त्या टीका महत्त्वहीन समजून दुर्लक्षित केलेल्या आहेत किंवा त्यांच्याकडून घडलेल्या कृती टीकेला पात्रच आहेत, असे गृहीत धरले असावे, असे एकंदरीत दिसून येत आहे.
अफलातून कृती आणि वादग्रस्त वक्तव्य ही राणा दाम्पत्याची खासियत राहिलेली आहे. त्यांची राजकीय वृत्ती, विचार, व्यवहार आणि फेकाफेकीचा व्यासंग आश्चर्यचकीत करणारा आहे. लोकांना काय वाटते, लोक काय विचार करतात, याचा ते फार विचार करीत नाहीत. फक्त आपण जे केलेले आहे, करतो आहे अथवा करणार आहोत, ते सर्व योग्यच आहे, हे ठासून सांगण्याचा त्यांचा स्वभाव रहिलेला आहे. भुतकाळात डोकावल्यास त्याची कित्येक उदाहरणे सहज सापडतात, असो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचे नामकरण, अभिवादन सोहळ्यादरम्यान भीम ब्रिगेडने त्यांच्यासमोर केलेली घोषणाबाजी आणि नगरसेवकांच्या विकास कामांवर स्वतःच्या नावाचे फलक लावण्याच्या मुद्यांवरून राणा दाम्पत्य या आठवड्यात चर्चेत राहिलेले आहे. खासदार नवनीत राणा यांनी गुरूवारी (ता.13) रात्री स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन केले. त्यादरम्यान त्यांनी चौकाचे नामकरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर, असे करण्याचे जाहीर केले. या मुद्यावरून काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस किशोर बोरकर यांनी त्यांना ‘रडार’वर घेतले. अमरावती महापालिकेने पूर्वीच्या इर्विन चौकाचे 2006 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, असे नामकरण केलेले आहे. तो ठराव विधी समितीत कोणी आणला होता, त्याला कुणी अनुमोदन दिले. तो विधी समिती आणि नंतर सर्वसाधारण सभेत केव्हा पारीत झाला, त्या ठरावाचा अधिकृत उतारा पुढे आणून खा. राणा यांच्या अनभिज्ञतेला ‘उतारा’ दिला. बोरकर एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी खासदारांना खोटेसुद्धा ठरविले. यावर राणा दाम्पत्याने आता मौन बाळगलेले आहे.
आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा या आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादनासाठी डॉ. आंबेडकर चौक येथे उपस्थित झालेले असताना भीम ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोर ‘कोण आले रे कोण आले, भाजपचे दलाल आले’, अशी तुफान घोषणाबाजी केली. धर्मनिरपेक्ष मतदारांची बोळवण तसेच बोगस जातप्रमाणपत्राचा वापर करून मागासवर्गीयांची राखीव जागा बळकावण्याच्या संतापातून ही घोषणाबाजी होती, फक्त त्याचा अंदाज राणा दाम्पत्याला येऊ शकला नाही. हजारोंच्या जनसमुदायात या घोषणाबाजीने राणा दाम्पत्य खजिल व अस्वस्थ झाले होते, मात्र चेहर्यावरील अस्वस्थतेचा भाव लपविण्यात ‘अभिनय संपन्न’ राणा दाम्पत्य यशस्वी ठरले. या टीकेला त्यांनी नाईलाजाने का होईना खिलाडूवृत्तीने घेत त्यावर ‘रिअॅक्ट’ होण्याचे टाळले.
भरीसभर भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा महापालिकेतील माजी पक्षनेता तुषार भारतीय यांनीसुद्धा आमदार रवी राणा यांना खुले पत्र लिहून नगरसेवकांच्या विकास कामांच्या ठिकाणी स्वतःचे फलक लावून त्या कामांचे श्रेय लाटण्याच्या त्यांच्या वृत्तीचा समाचार घेतला. त्यासाठी त्यांनी भूतकाळातील काही कामांची उदाहरणे देत त्या प्रकारांना घृणास्पद व निचपणा म्हटलेे. अंजनगावबारी येथील भूमिपूजन कार्यक्रमातून महिलांनी हाकलून लावल्याची आठवण करून देत आमदार रवी राणा हे आपले लोकप्रतिनिधी आहेत, याची मतदारसंघातील लोकांना लाज वाटत असल्याचे तोंडसुख तुषार भारतीय यांनी घेतले. स्वार्थासाठी भाजपसोबत युती करणे आणि भाजपच्याच नेते व कार्यकर्त्यांना शिव्याशाप देऊन अपमानित करणे, फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रकार चिड आणणारा असल्याचे सांगत भाजप कार्यकर्त्यांची पक्षनिष्ठा ही कमजोरी नव्हे तर जमेची बाजू आहे. त्यांना गृहीत धरून वेळीच शहाणे व्हा, भाजपच्या पदाधिकार्यांनी केलेल्या विकास कामांवर स्वतःचा नामफलक लावला तर तुम्हाला तुमची जागा दाखविण्यात भाजपचा प्रामाणिक कार्यकर्ता कमी करणार नाही, असा निर्वाणीचा इशारा तुषार भारतीय यांनी दिला.
तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याला लागलेली ‘साडेसाती’ होय, असे त्यावेळी आमदार रवी राणा यांनी म्हटले होते. आता जिल्ह्यात त्यांच्या संदर्भात या आठवड्यात घडलेल्या उपरोक्त घटना, यासुद्धा राणा दाम्पत्याच्या मागे लागलेली ‘साडेसातीच’ होय, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. ही साडेसाती त्यांनी स्वतःहून ओढावून घेतलेली आहे. जिल्ह्यात उफाळून आलेली टीकेची ही साडेसाती कशी दूर करायची, याचा ‘चालिसवाँ’ हनुमानभक्त आमदार रवीभाऊ राणा यांना स्वाभिमानाने येथून पुढे निश्चितच करावा लागणार आहे.
‘हिटफायर’ची शतकोत्तरी वाटचाल
'हिटफायर’ या बहुचर्चित स्तंभाचा आजचा हा 100 वा भाग आहे. 1 मार्च 2021 ला या स्तंभाची सुरूवात करण्यात आली. कोरोना महामारीदरम्यान ‘चाचणीच्या कालबद्ध कार्यक्रमाची गरज’ या शीर्षकाने पहिला ‘एपिसोड’ लिहिण्यात आला होता. तेव्हापासून आजपर्यंत प्रकृती व सुटीच्या कारणास्तव दोन आठवड्यांचा खंड तसेच एक दिवसाच्या विलंबाचा एक अपवाद वगळता हा स्तंभ दर सोमवारी नियमित प्रकाशित होत आहे. शहर, जिल्हा, प्रादेशिक, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय अशा त्या-त्या आठवडा व पंधरवड्यातील चर्चेच्या विषयांना ‘हिटलिस्ट’वर घेऊन त्रयस्थपणे हात घालण्यात आला. राजकीय विषय हे लिखानाच्या केंद्रस्थानी राहिले. त्यातून अनेकांची नाराजी झाली. जे चुकले असे वाटले, त्यांच्या ती चूक लक्षात आणून देण्यात आली. कुणाशीही कोणताही आपपरभाव वा वैरभाव मनात न ठेवता लोकांच्या मनातील भाव मांडण्याचा प्रयत्न आतापर्यंत करण्यात आलेला आहे. ‘दैनिक विदर्भ मतदार‘च्या वाचकांचा त्याला उदंड प्रतिसाद मिळालेला आहे. यासोबतच सोशल मीडियाच्या माध्यमातून या स्तंभाला अमेरिका, यूनाइटेड अरब एमिरेट्स (यूएई), जर्मनी, ऑस्ट्रेलिया, कनाडा, नार्वे, दक्षिण अफ्रीका येथूनही अत्यंत मोजका वाचक लाभलेला आहे. मुंबईतील ‘पुढारी’ या प्रथितयश आघाडीच्या दैनिकाने या स्तंभातील विषयाची दखल घेतलेली आहे. डिजिटल मीडियातील ‘जनसत्ता’ या युट्यूब चॅनलने हा स्तंभाचे अनेक भाग पुनर्प्रकाशित केलेले आहेत. त्यासाठी सर्वांना धन्यवाद!
-गोपाल रा. हरणेे, वरिष्ठ पत्रकार,
अमरावती.
9422855496