हायवेवर पिकअपचा अपघात : गावकऱ्यांकडून पिकअप मधील चॉकलेट, बर्फी, सोनपापडीची लुटपाट..

हायवेवर पिकअपचा अपघात : गावकऱ्यांकडून पिकअप मधील चॉकलेट, बर्फी, सोनपापडीची लुटपाट..

पाचोड : रस्त्यात उभ्या पिकप वाहनाला भरधाव आयशर ट्रकने धडक दिल्याने पिकअप उलटून  रस्त्यावर त्या पिकअप मधील सर्व किराणा सामान विखुरले गेल्याची घटना धुळे - सोलापूर मार्गावरील आडगाव जावडे शिवारात शनिवारी घडली. यानंतर नागरिकांनी अपघातग्रस्तांना मदत न करता रस्त्यावर विखरलेले चॉकलेट, बर्फी, सोनपापडी, गुलाब जामुन आदी साहित्य लूटून नेले.  विशेष म्हणजे पोलिसांसमोर हा प्रकार सुरू होता. मात्र लुटारुंची संख्या जास्त असल्याने ते काहीच करू शकले नाही.

     औरंगाबाद कडून बीड कडे पिकअप ( नंबर MH-20 EG 1037) चॉकलेट, बिस्किट, बर्फी, सोनपापडी, गुलाब जामुन इत्यादी किराणा दुकानाचे खाद्यपदार्थ घेऊन जात होता. हा पिकअप आडगाव जावडे शिवारात पंक्चर झाला. त्यामुळे चालकांने पंक्चरचे दुकान शोधत आपले वाहन रस्त्याच्या बाजूला उभे केले. याच वेळी भरधाव वेगाने बीड कडे जाणाऱ्या आयशर ट्रकने ( नंबर HR - 37 R1746) उभ्या पिकअप ला पाठीमागून जोराची धडक दिली. त्यामुळे खाद्यपदार्थ भरलेले हे पिकअप रस्त्यावर आडवे होऊन रस्त्यावर उलटले. 

     त्यात असे साहित्य रस्त्यावर बिखुरले असल्याची माहिती जवळपासचे  रजापूर, थापटी आडुळ, देवगावचे  नागरिकांना (लुटारुंना) समजल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जो तो पिकअप मधील रस्त्यावर विखुरलेले तसेच पिकअप मधील चॉकलेट, बर्फी, सोनपापडी, गुलाब जामुन, शेंगदाणा पट्टी, गोळ्या, बिस्किट इत्यादी वस्तूंच्या बरण्या घेऊन पळवित होते.

      विशेष म्हणजे पिकअपचा ड्राइवर आमच्या वाहनातील माल घेऊ नका, आम्हाला मदत करा, वाहन बाजूला घेण्यासाठी मदत करा. अशी विनंती करीत होता. मात्र कुणीही त्यास जुमानत नव्हते. घटनास्थळी आलेल्या सर्वाधिक बरण्या लुटण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली. फुकटच्या बरण्या मिळवण्यासाठी उपस्थितांमध्ये धक्काबुक्की ही झाली.

        अखेर हे लुटारु जुमानत नसल्याचे पाहून पिकअप चालकाने वाहनाचे उघडलेले दोन्ही दरवाजे बंद करून त्यास कुलूप लावल्याने अर्धा माल वाचला. बरण्या चोरणाऱ्यांची गर्दी झाल्यामुळे बीड कडे जाणाऱ्या वाहनांच्या दोन - तीन किलोमीटर दूर पर्यंत रांगा लागल्या होत्या. अगदी लहानग्यापासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनीच ही लुटपाट केली.