शहाण्यांनो!, मुर्ख कोण?

शहाण्यांनो!, मुर्ख कोण?

     शिवजयंती उत्सव समितीतर्फे 19 फेबु्रवारीच्या शिवजयंतीला अमरावतीच्या शिवटेकडीवर व्याख्याता तुषार उमाळे यांना माजीमंत्री तथा राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी व्यासपीठावर ‘ऐ शहाण्या, मुर्ख आहे का?’, असे तर व्याख्यात्याने खासदारांना ‘तुम्ही मूर्ख आहात’, असे थेट म्हटले. त्यावरून खासदार, व्याख्यात्याच्या अंगावर जाण्यासाठी खुर्चीतून उठताच पाहुण्यांनी त्यांना रोखले. सुरक्षारक्षक हरकतीत आले. काहीसा गोंधळ उडाला. डॉ. बोंडे यांनी स्वतःला सावरत संभाव्य अनर्थाला विश्राम दिला. अन्यथा शब्दांची कापाकापी, थरकाप उडविणारी ठरली असती अन् एक वेगळाच अध्याय व्याख्यानाला जोडला गेला असता.  

 
     खा. डॉ. अनिल बोंडे शिवटेकडीवर नेहमी हवापालट करण्यासाठी जातात. तिथे फिरायला येणार्‍यांचा एक गोतावळा आहे. त्याचे ते सदस्य आहेत. या टेकडीवरील शिवरायांचा जुना अश्वारूढ पुतळा हटवून त्याऐवजी नवीन पुतळा बसविण्यात आलेला आहे. त्यामुळे तेथील यंदाच्या शिवजयंती उत्सवाला विशेष महत्त्व होते. शिवजयंती उत्सव समितीने शिवव्याख्याते म्हणून तुषार उमाळे यांना निमंत्रित केले होते. खा. डॉ. अनिल बोंडे हेसुद्धा पाहुणे म्हणून व्यासपीठावर होते. विषयाची मांडणी करताना तुषार उमाळे म्हणाले की, शिवरायांना कसे ‘प्रेझेंट‘ करायचे, तेच अनेेकांना अद्याप कळलेले नाही. सकाळ झाली की मॉसाहेब महाराजांना आज्ञा द्यायच्या, महाराज नाश्ता तयार आहे, महाराज जायचे आणि दोन मुसलमान कापून यायचे. जेवणाची वेळ झाली की, महाराज चार मुसलमान कापून यायचे, संध्याकाळी जेवणाची वेळ झाली की, महाराज सहा मुसलमान खपाखप कापून यायचे. जणूकाही महाराजांना दुसरा धंदाच नव्हता, अशी प्रतिमा त्यांची तयार करण्यात आलेली आहे. व्याख्यात्याच्या या वक्तव्याने खा. डॉ. अनिल बोंडे ‘इरिटेड’ झाले. त्यांनी व्याख्यात्याला ऐ, ऐ म्हणून दोनदा काही सूचित करण्याचा प्रयत्न केला, परंतु व्याख्यात्याचे ‘नॉनस्टॉप’ व्याख्यान सुरूच होते.  अखेर खा. डॉ. बोंडे यांनी जागेवरूनच चढ्या आवाजात ‘ऐ शहाण्या, मुर्ख आहे का?’, असे व्याख्यात्याला प्रश्नार्थक स्वरूपात म्हटले. व्याख्यात्यानेसुद्धा खासदारांना उत्तरादाखल ‘तुम्ही मूर्ख आहात’, असे थेट म्हटले. या प्रकाराने संतप्त खासदार खुर्चीतून उठले आणि व्याख्यात्याच्या दिशेने जाणार तोच त्यांना व्यासपीठावरील अन्य पाहुण्यांनी थांबविले. त्यादरम्यान व्याख्यात्याने ‘हे बरोबर नाही. भारतीय संविधानाने आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहे. तुम्ही त्या स्वातंत्र्याची अशी गळचेपी करू शकत नाही. आम्ही ती सहन करणार नाही, तुम्ही आम्हाला वडीलधारी आहात, म्हणून अरे-कारे म्हणणार हे सहन करणार नाही. मीसुद्धा निमंत्रित पाहुणा आहे. जे बोलतो ते माझे विचार आहेत. ज्यांना पटते त्यांनी ऐकावे, ज्याला पटत नाही, त्यांनी खुशाल निघून जावे’, असे खडेबोल सुनावले.

     या कार्यक्रमापश्चात खा. डॉ. अनिल बोंडे यांनी समाजमाध्यमावर व्यक्त होतं, ‘स्वतःला शिवव्याख्याते म्हणायचे, माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल घाणेरडे बोलायचे, काल्पनिक व्याख्याते म्हणून लोकांवर आदळायचं, हे योग्य नाही. जाती-जातीत कुणी संघर्ष पेटविणार असेल तर थांबविणारच. शिवजयंतीच्या कार्यक्रमात अजेंडा चालवायचा नसतो. व्याख्यात्याने पूर्वग्रह दूषित नसावे, छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी थांबविली, हा गुन्हा आहे का’, अशी भूमिका मांडली. तर खासदारांची माफी मागण्यासाठी आपल्याला धमकीचे फोन येत आहेत, असा खुलासा व्याख्यात्याने केला. अत्यंत गंभीर असा विषय प्रसारमाध्यमांच्या ‘स्क्रीन’वरून अवघ्या एका दिवसात बाद झाला.

      छत्रपती शिवाजी महाराज कुठल्या एका जाती-धर्माचे नव्हते, त्यांनी सर्व धर्म अन् अठरापगड जातीसाठी स्वराज्य निर्माण केले आणि चालविले, ही भूमिका व्याख्यात्यानेसुद्धा मांडली. मात्र, व्याख्याता वा पाहुणा कोणीही असो, त्यांनी सार्वजनिक बोलताना आपल्या शब्दाने कुणी दुखावणार नाही, याचे भान नेहमीच राखले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्यावरील आक्रमणकारी मुगल मुसलमानांच्या विरोधात होते. त्यासाठी त्यांना स्वराज्यातील मुस्लीमांची साथ होतीच. आजही असंख्य मुसलमान व त्यांच्या कित्येक संघटना छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाचे पोवाडे गातात, ही त्यांच्या कार्याची पावतीच होय. छत्रपती शिवरायांना कसे ‘प्रेझेंट’ करायचे, हे अनेकांना कळतच नाही, असे म्हणणार्‍या तुषार उमाळे यांना  मुसलमान आणि कापाकापी हे शब्द वगळून शिवचरित्राची मांडणी करता आली असती.  त्यामुळे कदाचित खासदार डॉ. बोंडे ‘इरिटेड’ झाले नसते. शिवरायांच्या संदर्भाने मुसलमानद्वेष हा विषय तसा कालबाह्य आहे.  भारतीय संविधानाने बेशक सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र दिलेले आहे. त्याची कोणी गळचेपी करू नये, हे जरी मान्य असले तरी कुणाचा उपमर्द करण्याची मर्यादा कुणी ओलांडू नये, हेही तेवढेच खरे.

      खा. डॉ. अनिल बोंडे हेसुद्धा त्या व्याखानाचे एक घटक होते. त्यांनी व्याख्यात्याला रोखणे आणि ऐ शहाण्या, मुर्ख आहे का?, असे म्हणणे पूर्णतः चुकीचेच होते. त्यांनी संयम ठेवायला पाहिजे होता. त्यांनी जर वक्त्याचा प्रश्नार्थक स्वरूपात मुर्खपणा काढला नसता तर वक्त्यानेसुद्धा त्यांना थेट मूर्ख म्हटले नसते. दुसरीकडे स्वतःच्या कार्यक्रमातील पाहुण्याला अन् तेही लोकप्रतिनिधीला ज्येष्ठ, वडीलधारी म्हणायचे आणि ‘तुम्ही मूर्ख आहात’, असे थेट म्हणणे, ही बाबसुद्धा व्याख्यात्याच्या तोंडी अजिबात न शोभणारी आहे. खासदारांना वक्त्याचे विचार पटत नव्हते तर त्यांनीसुद्धा तेथून निघून जायला पाहिजे होते. वक्ता अन् आयोजकांना ती खरी चपराक असती. खासदारांनी सार्वजनिक कार्यक्रम आणि सभागृह यातील फरक समजून घेतला पाहिजे. सभागृहात वक्त्याला ‘डिस्टर्ब’ करण्याची नेत्यांना सवय असते. सार्वजनिक व्यासपीठावर ती टाळली पाहिजे. व्याख्यात्याच्या व्याख्यानानंतर खासदारांना बोलण्याची संधी होती, असे सांगितले जाते. तेव्हा त्यांना वक्त्याचे मुद्दे खोडून काढता आले असते, ती संधी खासदारांनी निश्चितच दवडल्याचे दिसते, असो.
 
      व्याख्याता तुषार उमाळे आणि खासदार डॉ. अनिल बोंडे यांचा विषय बाजूला ठेवला तरी सध्या बाबा, बुवा, महाराज, प्रवचनकार, कीर्तनकारांचे पीक चोहीकडे लबालब आलेले आहे. आध्यात्म अन् विचार पेरणीच्या गोंडस नावाखाली बाजार मांडून त्यावर लाखो रुपये उधळले जात आहेत. वक्तृत्वगुण लाभलेल्यांनी तर धंदाच चालविलेला आहे. त्याला खतपाणी घालणार्‍यांमध्ये डॉ. अनिल बोंडे यांचा पक्ष महाआघाडीवर आहे. प्रवचन, कीर्तनाचे मोठेमोठे पॅकेज घेतले जातात. त्या पॅकेजची रक्कम डोळे दीपवून टाकणारी असते. तो पैसा कुठून येतो, कुठे जातो, सर्व गोलमाल आहे. विकाऊ प्रबोधन हे टिकाऊ नसते. कुणाला कोणी कोणती उपाधी द्यायची. कुणी कोणाच्या पायावर डोके ठेवायचे, हा ज्याचा त्याचा प्रश्न परंतु, जोपर्यंत मुर्खांचे अस्तित्व आहे, तोपर्यंत शहाण्यांना मरण नाही, असे म्हटले जाते. ते निरर्थक आहे का?


-गोपाल रा. हरणे
वरिष्ठ पत्रकार
अमरावती.
9422855496