हाजी एजाज देशमुख यांची सेंट्रल हज कमिटी सदस्य पदी बिनविरोध निवड

हाजी एजाज देशमुख यांची सेंट्रल हज कमिटी सदस्य पदी बिनविरोध निवड

औरंगाबाद, २९ जानेवारी : सेंट्रल हज कमिटी सदस्य पदी निवडी करिता आज मंत्रालयात घेण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हाजी एजाज देशमुख यांची बिनविरोध निवड झाली आहे.

       सेंट्रल हज कमिटीवर तीन वर्षासाठी सदस्यांची निवड केली जाते. निवड करण्यात येणाऱ्या सदस्यांमध्ये तीन सदस्य हे हज यात्रेसाठी सर्वात जास्त हज यात्रेकरू जाणाऱ्या तीन राज्यातील एक-एक सदस्य पण निवडला जातो. या कॅटेगिरी मध्ये महाराष्ट्र राज्य हज कमिटी मधून सेंट्रल हज कमिटीवर एका सदस्याची निवड करण्यासाठी आज मुंबई येथे मंत्रालयात निवडणूक आयोजित करण्यात आली होती. या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्य हज कमिटीचे सदस्य आणि भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष हाजी एजाज देशमुख यांची बिनविरोध निवड झाली आहे. 

         महाराष्ट्र राज्य हज कमिटी मध्ये एकूण ११ सदस्य आहेत. १० जानेवारी रोजी सेंट्रल हज कमिटी सदस्य निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता. या निवडणुकीमध्ये निवडणूक लढविण्याचे आणि मतदान करण्याचे अधिकार सदस्यांसह महाराष्ट्र राज्य हज कमिटी सदस्यांसह अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री आणि महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष यांना पण आहेत. 

      निवडणूक जाहीरनाम्याप्रमाणे निवडणूक कार्यक्रमाची प्रक्रिया आज रोजी सुरू झाल्यानंतर हाजी एजाज देशमुख यांचे शिवाय इतर कोणीही नामांकनपत्र दाखल केले नाही. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची निवड झाल्याचे जाहीर केले.

        हाजी एजाज देशमुख हे बीड येथील रहिवाशी असून भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान सक्रिय नेते आहेत. भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड होण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा चे प्रदेश अध्यक्ष म्हणून अनेक वर्षे नेतृत्व केले आहे.