मशिदीवरील भोंगेबाबत किरीट सोमय्याच्या वक्तव्याचा SDPI कडून निषेध, पोलिसांच्या दबावाचाही खुलासा

मशिदीवरील भोंगेबाबत किरीट सोमय्याच्या वक्तव्याचा SDPI कडून निषेध, पोलिसांच्या दबावाचाही खुलासा

छत्रपती संभाजी नगर, ४ ऑगस्ट २०२५ — मशिदीवरील साऊडस्पीकरच्या मुद्द्यावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या विधानाचा सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) च्या छत्रपती संभाजी नगर शाखेने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. सोमय्या यांनी वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला भेट देऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावत मशिदींवरील साऊडस्पीकर काढण्याची मागणी केली आहे, अशी टीका SDPI ने केली.

         SDPI ने स्पष्ट केलं की, मुंबई उच्च न्यायालयाने केवळ लाऊडस्पीकरच्या आवाजाची मर्यादा (डेसिबल पातळी) ठरवली असून त्यावर बंदी घालण्याचा किंवा काढून टाकण्याचा कोणताही आदेश दिलेला नाही. याशिवाय गुजरात उच्च न्यायालयानेही अजानसाठी साऊडस्पीकर वापरण्यात काहीच गैर नाही, असं नमूद केलं आहे. अजान ही धार्मिक श्रद्धेचा भाग आहे आणि त्याचा आवाज थोड्या वेळासाठीच असतो, त्यामुळे तो सार्वजनिक आरोग्यासाठी हानिकारक ठरत नाही, असं मत न्यायालयाने व्यक्त केलं आहे.

          SDPI कडून सांगण्यात आले की, छत्रपती संभाजीनगरात काही पोलिस अधिकारी मशिदीच्या व्यवस्थापकांना फोन करून साऊडस्पीकर उतरवण्याचा दबाव टाकत आहेत. या संदर्भात उच्च न्यायालयाचा कोणताही स्पष्ट आदेश नसतानाही असा बेकायदेशीर दबाव येत आहे. त्यामुळे सर्व मशिदींच्या व्यवस्थापकांनी पोलिसांकडून लेखी आदेशाची मागणी करावी, असे आवाहन SDPI ने केले आहे. पोलिसांनी जर लेखी आदेश दिला, तर आम्ही न्यायालयात जाऊन आमचा हक्क मागू, असेही SDPI ने ठामपणे सांगितले.

         SDPI ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षपणे पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप केला आणि यामुळे पोलिस प्रशासनावर बेकायदेशीर ताण येत असल्याचं सांगितलं. त्यांनी विचारलं की तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्ष या प्रकारच्या भेदभावपूर्ण राजकारणावर मूक का आहेत?

         SDPI च्या मते, किरीट सोमय्या यांची वक्तव्ये समाजात तणाव निर्माण करणारी असून, धार्मिक सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न आहे. त्यांनी सरकारला आणि प्रशासनाला आवाहन केलं की, संविधानाच्या चौकटीत राहून कायद्याचे शासन प्रस्थापित करावे आणि अशा दिशाभूल करणाऱ्यांना पाठीशी घालू नये.

        या पत्रकार परिषदेला सय्यद कलिम (प्रदेश महासचिव), समीर शाह (जिल्हाध्यक्ष), डॉ. हाफिज इमराननजीर (जिल्हा उपाध्यक्ष), अब्दुल अलीम, मोहसीन खान (जिल्हा महासचिव), हाफिज समीउल्लाह काजी (जिल्हा कोषाध्यक्ष), अशरफ पठान, आरिफ शाह, हाफिज अबूजर पटेल आणि रियाज सौदागर उपस्थित होते.