अमरावतीत ..... या समाजाचे 250 मुलांनी मोबाईल वापरणार नाही म्हणून केली तौबा
1.
अमरावती : (अमोल खोडे यांचे कडून) : अमरावती शहरातील 250 दाउदी बोहरा कुटुंबांनी त्यांच्या 15 वर्षांखालील मुलांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, 250 मुलांनी मोबाइलचा वापर पूर्णपणे थांबवला असून, शैक्षणिक उपयोगासाठीदेखील मोबाइल बंदी घालण्यात आली आहे.
दाउदी बोहरा समाजाचे धर्मगुरू डॉ. सैयदना मुफद्दल सैफुद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबवण्यात आली आहे. बोहरा समाजाचे स्थानिक आमिल साहेब शेख युसुफभाई खरगोनवाला यांनी सांगितले की, मोबाइलच्या वाढत्या व्यसनामुळे मुलांचे भविष्य धोक्यात येऊ लागले आहे. या समस्येवर उपाय म्हणून समाजाने हा निर्णय घेतला आहे, ज्याचा शंभर टक्के पालन होत आहे.
दाऊदी बोहरा समाजातील ज्येष्ठ मंडळींनी मुलांच्या वाढत्या मोबाइल वापराबाबत चिंता व्यक्त केली होती. मोबाइलमुळे होणाऱ्या सायबर गुन्ह्यांपासून मुलांना वाचवणे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे. सध्याच्या काळात ओटीपी किंवा लिंकद्वारे फसवणूक होण्याचे प्रकार वाढले आहेत, आणि मुलांना अशा गोष्टींपासून वाचवणे गरजेचे आहे.
मोबाइलमुळे मुलांची शारीरिक क्रियाशीलता कमी होत आहे, आणि त्याचा अभ्यासावरही वाईट परिणाम होतो. पण मोबाइलपासून दूर राहिल्यास मुलांचा वेळ कुटुंबासोबत जाईल, ते अधिक जबाबदार बनतील आणि समाजात चांगल्या प्रकारे घडतील, असे मत बोहरा समाजाच्या विचारवंतांनी व्यक्त केले आहे.
शहरातील जवाहर गेट, भांडी बाजार, हबीब नगर, कॅम्प, जमील कॉलनी आणि पॅराडाईज कॉलनीत राहणाऱ्या या समाजाने घेतलेला हा निर्णय समाजासाठी प्रेरणादायक ठरतो आहे.