पब्जी-फेसबुक लैला अंजू सीमा प्रेम अपार : गुंतले नसरुल्ला सचिन मजनू सीमापार
इश्क़ पर ज़ोर नहीं है ये वो आतिश 'ग़ालिब'
कि लगाए न लगे और बुझाए न बने
स्त्री पुरुषां मधील प्रेमभावनेचे विश्लेषण करताना प्रसिद्ध शायर मिर्झा गालिब यांनी वरील आपल्या शयरीत म्हणटले आहे की, स्त्रीपुरूष मधील आसक्ती,प्रेमभावना म्हणजे जबरदस्तीने योजून, आखून करण्यासारखी कृती नसून ते एक नकळत आपोआप होणारे एकमेकां विषयीचे आकर्षण, जीवापाड प्रीती आणि एकमेकांसाठी जगण्या मरण्याचा घेतलेला दृढ निश्चय होय.
प्रेम म्हणजे असा ज्वालाग्नी जो प्रयत्न करून भडकत नाही आणि एकदा भडकला की त्याला विझवणे कठीण आहे.
भारतीय हिंदी सिनेमावाल्यांनी गालिबमीयांच्या शायरींना आदर्श मानून, प्रेमकथा मूलभूत आधार घेवून सिनेमे काढण्यास सूरवात केली आणि गल्ले जमवले. सुरवातीच्या प्रेमकथावार आधारित सिनेमावर नंतरच्या सिनेनिर्मात्यांनी पुन्हापुन्हा रीमेक्स काढल्या. युवक युवतीचे प्रेम, त्यांच्या आईवडलानी प्रेमासाठी केलेला विरोध आणि शेवटी त्यांचा विरोध मावळून युवक युवतीचे झालेले मिलन अशा किंवा अशा आशयाची किंवा थोड्या फार फरकाने असलेली प्रेम-हिंसात्मक कथानके म्हणजेच सीनेमावाल्यांचे मते आयुष्य आणि आयुष्याची वास्तविकता.
वास्तविक पाहता प्रेम,प्रीतीचा काळ मनुष्य जीवनात विवाहपूर्व आणि लग्नानंतर नवतारुण्याचा थोडासा काळ वगळता मरे पर्यंत आयुष्यात माणूस दुःख- वेदना सोसत आणि अडचणी संकटे यांच्याशी सामना करीत स्वतःचे अस्तित्व टिकवण्यााठी धडपडत असतो. ही जीवनाची वास्तविकता चित्रपटवाले दाखवत नाहीत. याला अपवाद श्याम बेनेगल,हृषिकेश मुखर्जी किंवा एन सी सिप्पी इत्यादी सारखे सामाजिक प्रश्नांना हात घालणारे मोजके सिनेमावाले.
भारता सारख्या विकनशील देशात माहिती तंत्रज्ञानचा प्रसार होण्यापूर्वी ग्रामीण व शहरी भागात सिनेमा शिवाय इतर मनोरंजनाचे साधन सामान्यांना नव्हते. मनोरंजनसाठी जाणाऱ्या सामान्य स्त्री पुरुषांना दाखवलेल्या चित्रपटातील वास्तविकता आणि भंपकता यातील फरक ओळखणे कठीण झाले आणि भंपकतेला वास्तविकता समजून तरुणपिढी प्रितीप्राप्तीसाठी चित्रपटातील नायक किंवा खलनायकाने केलेल्या कृत्याचे प्रसंगी हिंसात्मक घटनेचे सुध्धा अनुकरण करू लागले.
काळ पुढे सरकला, मंदगतीने सरकणाऱ्या विज्ञानाला माहिती तंत्रज्ञानाची साथ मिळाल्याने अतिवेगाने तंत्रज्ञान विकसित झाले आणि स्वप्नात पाहिल्या नाहीत त्या गोष्टी शक्य झाल्या. दळणवळण सोपे झाल्याने देश,परदेश प्रवास किंवा जगातील कानाकोपऱ्यात व्हिडिओ संवाद,संदेश देणे किंवा संवाद साधने सोपे आणि स्वस्त झाले ज्यामुळे जग अति जवळ आले. गाडीभर सामानचे काम करणारी एकच वस्तू स्मार्ट फोनच्या रुपात प्रत्येकाच्या हातात दिसू लागली आणि त्यातून खरोखरच लोकांची ढिगारा कामे होवु लागली. माहिती देणारे गूगलाचार्य कडून घर बसल्या जगातील सर्व क्षेत्रातील ज्ञान लोकांना मिळू लागले.
महिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा उच्चांक गाठणाऱ्या या विज्ञान युगात फेस बुक, सारखे सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ व पप्जी सारखे खेळ निर्माण झाल्याने मानवी जीवनात लंपट स्त्रीपुरुषांची जागतिक स्थरावर मैत्री होण्यास सुरवात झाली आणि या मैत्रीतून लैला-मजनूच्या आधुनिक सुधारित आवृत्त्या निर्माण झाल्या. या आधुनिक प्रेमविरानी स्वतःचे लग्न होवूनही जनाची, मनाची लाज न ठेवता 'इश्क'चे भूत डोक्यात घेवून आपल्या जोडीदाराला, मुलांना सोडून इतर देशात जाऊन आपल्या नव्या प्रेमअंकुराला खतपाणी घालन्यास सर्वात केली. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे सध्या चर्चेत असलेले भारतपाक प्रेमवीर सीमासचिन आणि अंजूनसरुल्लाह हे होत.
या प्रेमविरांच्या डोक्यातून एकदाचा प्रेमरूपी पुराचा लोट ओसरला की आयुष्याच्या वास्तविकतेचा सामना करताना त्यांना समाजाची जी निर्भत्सना सोसावी लागेल तसेच अंगिकरलेला मार्ग किती खडतर आहे हे ज्या वेळी त्यांच्या लक्षात येईल त्यावेळी दिलासा देणारे त्यांना कोणी भेटणार नाही तसेच त्या मार्गातून बाहेर पडणे सुध्धा त्यांना कमालीचे कठीण होईल.
वडीलधाऱ्यामाणसांचा सल्ला न घेता भारतीय संस्कृती विसरून तारुण्याच्या धुंदीत घेतलेले अविचारी निर्णय आपल्या आयुष्यात वादळ निर्माण करतात याची जाणीव तरुणपिढीला असणे अत्यंत जरुरीचे आहे. सामाजिक बंधने पाळून वडीलधाऱ्यांचा सन्मान ठेवून त्यांचे सल्ले घेऊन आयुष्याचा मार्गक्रम आखल्यास तो सुकर व आनंदमयी निश्चितच होईल.
जे.एस.काझी
निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
औरंगाबाद. 9923421947