कुरआनला समजून वाचणे आवश्यक
कुरआन हे इस्लामच्या पवित्र ग्रंथामध्ये सर्वात महत्त्वाचे आणि आधारभूत मानले जाते. मुस्लिम बांधवांसाठी कुरआन केवळ एक धार्मिक ग्रंथ नसून जीवनाचा मार्गदर्शक मानला जातो. कुरआनमध्ये देवाच्या आज्ञा, मार्गदर्शन, नैतिकता आणि जीवनाच्या सर्व पैलूंचे मार्गदर्शन दिलेले आहे. त्यामुळे कुरआनचा केवळ पठण करण्याऐवजी त्याचा अर्थ आणि संदेश समजून घेणे महत्त्वपूर्ण आहे. यासाठी हदीस (प्रेषित मुहम्मद यांच्या वचनांचे संकलन) देखील मोठी मदत करते.
कुरआन समजून वाचण्याचे महत्त्व
कुरआन वाचणे हे एक धार्मिक कार्य मानले जाते आणि हे फक्त त्याचे शब्द वाचण्यावर आधारित नाही तर त्याच्या संदेशाचा पूर्ण आकलन करून त्यानुसार आचरण करणे हे अधिक महत्त्वाचे आहे.
उदाहरणार्थ, अल-बकरा (२:२) मध्ये म्हटले आहे:
"हे ते पुस्तक आहे ज्यामध्ये शंका नाही. हे मार्गदर्शन आहे त्या लोकांसाठी जे धार्मिक भिती बाळगतात."
या आयातमध्ये (कुरआनच्या श्लोकाला आयात म्हणतात) स्पष्ट सांगितले आहे की, कुरआन मार्गदर्शनाचे साधन आहे. पण हे मार्गदर्शन तेव्हा फळेल जेव्हा त्याचा अर्थ समजून घेतला जाईल.
याला दुसरे उदाहरण आहे अल-इमरान (३:७):
"तोच आहे ज्याने हे पुस्तक तुमच्याकडे पाठविले आहे. यात काही आयाते स्पष्ट आहेत आणि त्या पुस्तकाच्या मुळ भागाच्या स्वरूपात आहेत..."
येथून स्पष्ट होते की, कुरआनच्या अनेक आयाते अशा आहेत ज्या स्पष्ट असतात, परंतु काही जटिल आयाते आहेत ज्याचा अर्थ विचार आणि अभ्यासाने समजून घ्यावा लागतो.
कुरआन समजून वाचल्याने होणारे फायदे
१. आध्यात्मिक उन्नती: कुरआन समजून वाचणे म्हणजे अल्लाहच्या संदेशाला आत्मसात करणे. त्याचे आदेश आणि सूचना समजून त्यानुसार आचरण केल्याने धार्मिकता वाढते. हदीसही यात महत्त्वाची भूमिका बजावते. हदीस मार्गदर्शन देतात की, प्रेषित मुहम्मद यांनी कुरआन कसा आचरणात आणला आणि त्यांनी त्यांच्या अनुयायांना काय शिकवले.
२. मूल्यांची स्थापना: कुरआनमध्ये नैतिकता, सहिष्णुता, दयाळूपणा, इतरांवर प्रेम करण्याची शिकवण दिलेली आहे. हदीसनेही या शिकवणीचे बळकटीकरण केले आहे. प्रेषितांनी म्हटले आहे, "तुम्ही दुसऱ्यांना तुमच्या स्वतःपेक्षा जास्त प्रेम करायला हवे." या शिक्षणातून मानवी मूल्यांची स्थापना होते.
३. धार्मिक आचरणाला मजबुती: कुरआनचे आकलन आचरणाला बळकट करते. कुरआनमधील काही आदेश, जैसे की, "न्यायप्रिय राहा" (सूरा अन-निसा, ४:५८) यासारखे आदेश प्रत्यक्ष जीवनात कसे आचरण करायचे, याची शिकवण हदीस देते.
४. ज्ञानाचा विस्तार: कुरआन समजून वाचणे हे केवळ धार्मिक असण्याचा अर्थ नसतो, तर एक शास्त्रीय आणि तार्किक विचारांची जोडही असते. कुरआन विज्ञान, इतिहास, आणि तत्त्वज्ञानाच्या गोष्टी देखील सामावते.
कुरआन आणि हदीस एकत्र समजणे का आवश्यक?
प्रेषित मुहम्मद यांचे वचन म्हणजेच हदीस हे कुरआनचा अर्थ अधिक स्पष्ट करते. उदाहरणार्थ, कुरआनने नमाजचा आदेश दिला आहे परंतु नमाज कशी करावी याचे स्पष्टीकरण हदीसमध्ये आहे. हदीसला समजून घेतल्याशिवाय कुरआनच्या अनेक गोष्टींचा अर्थ गवसणार नाही.
प्रेषितांनी म्हटले आहे, "मी तुम्हाला दोन गोष्टी सोपवून जात आहे. जर तुम्ही त्या धरून राहिलात तर कधीच मार्गभ्रष्ट होणार नाही. एक म्हणजे कुरआन, दुसरे म्हणजे माझ्या हदीस."
कुरआनचा अर्थ समजून वाचणे हे प्रत्येक मुस्लिमाने केले पाहिजे. हा एक असा मार्ग आहे जो फक्त अध्यात्मिक उन्नतीसाठी नाही तर एक उत्तम जीवन जगण्यासाठीही आहे.
कुरआन ला समजून न वाचल्यास होणाऱ्या परिणामांबद्दल देखील काही चेतावण्या दिल्या आहेत.
कुरआन समजून न वाचण्याचे परिणाम – कुरआनमधील उदाहरणे
१. कुरआनवर विचार न करणाऱ्यांची निंदा (अल-फुरकान, २५:३०):
प्रेषित मुहम्मद यांना उद्देशून सांगितले आहे की, "रब्बा, माझ्या लोकांनी या कुरआनला दुर्लक्षित केले." या आयातमध्ये कुरआनचे वाचन आणि समजून घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. जर फक्त वाचन करून त्यातील शिक्षणाचा आदर केला नाही, तर त्या वाचनाला अपूर्ण मानले जाते.
२. विचार आणि ज्ञानाशिवाय वाचणे म्हणजे अंधकार (मोहम्मद, ४७:२४):
"तर, का नाही ते कुरआनवर विचार करतात? किंवा त्यांच्या हृदयावर कुलुपे बसवलेली आहेत?" या आयातमध्ये अल्लाहने कुरआनवर विचार न करणाऱ्यांना चेतावले आहे. याचा अर्थ असा की कुरआनचे वाचन समजून न केल्यास ते केवळ एक बाह्य आचरण होते आणि त्यातून सखोल आध्यात्मिक अर्थ समजला जात नाही.
३. कुरआनला गाईबैलासारखे वाचणे (अल-जुमुआ, ६२:५):
"ज्याप्रमाणे पुस्तकांची भार वाहणाऱ्या गाढवांचे उदाहरण आहे, तसाच प्रकार त्यांच्या बाबतीत आहे जे कुरआन वाचतात पण त्यावर विचार करत नाहीत." हा दृष्टांत कुरआनला केवळ वाचून, त्याचा अर्थ न समजणाऱ्या लोकांबद्दल आहे.
हदीसमध्ये कुरआन समजून वाचण्याचे महत्त्व
१. प्रेषितांचे आदेश:
हदीसमध्ये, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले आहे की, "तुमच्या प्रत्येक कृतीत ज्ञान असेल, कारण ज्ञानाविना केलेले आचरण फक्त दिखावा आहे." (सहीह बुखारी). याचा अर्थ असा की कुरआन समजून वाचल्यास त्याचा खरा उपयोग होतो; अन्यथा ते वाचन केवळ एक बाह्य क्रिया राहते.
२. कुरआनच्या आदेशांचे पालन न करणे:
एका हदीसमध्ये प्रेषितांनी सांगितले की, "काही लोक फक्त कुरआन वाचतील पण त्यांच्या गळ्याखाली तो जाणार नाही." (सहीह मुस्लिम). याचा अर्थ असा आहे की, फक्त पाठांतर करून किंवा शब्द वाचून कुरआनचा अर्थ आत्मसात करता येत नाही. ज्ञान न मिळाल्यास वाचन फक्त बाह्य पातळीवरच राहते.
३. खोटा आदर:
हदीसमध्ये असेही सांगितले आहे की, "ज्या व्यक्तीला कुरआनच्या शब्दांना फक्त ओठांनी वाचता येते, पण हृदयातून आचरण करत नाही, त्याच्यासाठी ते ज्ञान नाही." यावरून स्पष्ट होते की, कुरआन समजून वाचल्याशिवाय आंतरिक बदल घडवून आणणे शक्य नाही. कुरआन समजून न वाचणे म्हणजे त्याच्या ज्ञानाचा योग्य उपयोग न करणे. अल्लाहने कुरआन फक्त पठणासाठी नव्हे, तर त्यातील शिक्षणाने जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी पाठवले आहे.
- डॉ. रियाज़ देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त (सेनि), औरंगाबाद.