नगर परिषद निकालाला ब्रेक! हायकोर्टाचा धडाकेबाज निर्णय — मतमोजणी 21 डिसेंबरला
नागपूर दि. २ डिसेंबर: संपूर्ण महाराष्ट्रात आज होणाऱ्या नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकीची जी मतमोजणी उद्या होणार होती त्याबद्दल बॉम्बे हायकोर्टाचे नागपूर खंडपीठाने आज एक महत्त्वाचा निकाल दिला आहे.
१) मतमोजणीवर हायकोर्टाची मोठी कलाटणी
नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निकालावर आज मोठा बदल झाला आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेली ३ डिसेंबरची मतमोजणी आता होणार नाही. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वाचा निर्णय देत ही मतमोजणी पुढे ढकलली आहे.
२) नवी तारीख – 21 डिसेंबर
हायकोर्टाच्या आदेशानुसार आता सर्व नगरपरिषदांची आणि नगरपंचायतींची मतमोजणी 21 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे उद्या ज्या निकालांची उत्सुकता होती, ती आता आणखी काही दिवस थांबणार आहे.
३) मतमोजणी पुढे का ढकलली?
काही नगरपरिषद आणि प्रभागांमध्ये मतदान 20 डिसेंबरला होणार आहे. जर काही ठिकाणचे निकाल आधी जाहीर झाले, तर 20 डिसेंबरला होणाऱ्या मतदानावर त्याचा परिणाम होऊ शकतो, असा मुद्दा दाखल याचिकांमध्ये मांडण्यात आला होता. न्यायालयाने ही बाब गांभीर्याने घेतली आणि निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता राखण्यासाठी एकाच दिवशी निकाल जाहीर करावेत, असे आदेश दिले.
४) राज्यभरात मतदान सुरूच
आज राज्यातील 264 नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी मतदान होत आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 दरम्यान मतदानाची वेळ असून, राज्यभरात 12,316 मतदान केंद्रांवर 62,000 हून अधिक अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
५) आता सगळ्यांचे लक्ष निकालाच्या दिवशी
हायकोर्टाच्या या निर्णयामुळे निवडणुकीचे वातावरण पुन्हा तापले आहे. मतदार, उमेदवार आणि पक्षकार्यकर्त्यांचे लक्ष आता 21 डिसेंबरच्या निकालाकडे खिळले आहे.