१३ जणांच्या हत्येप्रकरणी बदल्याची शिक्षा : १३ वर्षाच्या मुलाने झाडली गोळी

१३ जणांच्या हत्येप्रकरणी बदल्याची शिक्षा : १३ वर्षाच्या मुलाने झाडली गोळी
आरोपी मंगल

काबूल, ३ डिसेंबर : अफगाणिस्तानच्या खोस्त प्रांतात एका हत्या प्रकरणात दोषी ठरलेल्या तरुणाला सार्वजनिकरित्या मृत्यूदंड देण्यात आला. तालिबान प्रशासनाने जारी केलेल्या माहितीनुसार, मंगल नावाच्या तरुणाने एका कुटुंबातील १३ जणांची हत्या केल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ‘किसास’ म्हणजेच बदल्याची शिक्षा जाहीर केली होती.

        खोस्त प्रांतातील एका मोठ्या स्टेडियममध्ये ही शिक्षा देण्यात आली. प्रशासनाच्या माहितीनुसार, सुमारे ८० हजार लोक या कारवाईदरम्यान उपस्थित होते. पीडित परिवारातील १३ वर्षीय मुलाने दोषीवर गोळी झाडली. तालिबानच्या अधिकाऱ्यांनी ही शिक्षा त्यांच्या न्यायप्रणालीतील ठरावीक प्रक्रियेनुसार दिल्याचा दावा केला आहे.

       या प्रकरणात आरोपी मंगलला प्रथम कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरवले. त्यानंतर त्याने पुनर्विचार याचिका दाखल केली; मात्र निकालात बदल झाला नाही. अंतिम टप्प्यात सर्वोच्च न्यायालयानेही कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. त्यानंतर तालिबानचे सर्वोच्च नेते हिबतुल्लाह अखुंदजादा यांनी मृत्यूदंडाची मंजुरी दिली.

       या घटनेबाबत काही मानवाधिकार संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे. तालिबानच्या न्यायप्रणालीत पारदर्शकता व निष्पक्षतेचा अभाव असल्याचा आरोप संघटनांनी केला.

संयुक्त राष्ट्रांचे विशेष दूत रिचर्ड बेनेट यांनीही सार्वजनिक मृत्यूदंडाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या दृष्टीने अशा शिक्षांचा पुनर्विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली.

तालिबान प्रशासनाने मात्र हे सर्व निर्णय इस्लामी शरीअत कायद्याच्या चौकटीत घेतल्याचा दावा केला आहे. त्यांच्यामते, गंभीर गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षा देणे ही कायद्याची अंमलबजावणी असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. त्यांच्या म्हणण्यानुसार, अशा शिक्षांचे उद्दिष्ट समाजात गुन्हे रोखणे आणि पीडितांना न्याय मिळवून देणे हे आहे.