HITFIRE : बच्चूभाऊंचा खांदा, अन् अजेंड्याचा झेंडा
प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख माजी राज्यमंत्री, आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चूभाऊ कडू यांनी शेतकर्यांच्या नऊ प्रश्नांवर नऊ ऑगस्टला अर्थात क्रांतिदिनी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर हजारो शेतकर्यांचा ‘जन एल्गार मोर्चा’ काढला. त्यांनी या मोर्चाच्या माध्यमातून शेतकरी-शेतमजूर, बेघर, प्रकल्पग्रस्त, असंघटीत कामगारांच्या ज्या मागण्या रेटल्या आहेत, त्या सोडविण्यासाठी सरकारला तीन महिन्यांचा ‘अल्टिमेटम’ दिलेला आहे. बच्चूभाऊ यांचे पूर्वाश्रमीच्या ‘ईडी’ व आता महायुतीच्या ‘ऑटोरिक्षा सरकार’ला समर्थन आहे. त्यांनी सरकारला ‘अल्टिमेटम’ देणे, हा वरकरणी अचंबित करणारा प्रकार वाटत असला तरी त्यामागे एक मोठा अजेंडा आहे. बच्चू कडू यांचा अजेंडा काय आहे, त्यांचा तो अजेंडा ‘मास्टरस्ट्रोक’ ठरणार आहे का, याची उत्सुकता सर्वांनाच आहे.
आमदार बच्चू कडू भूमिका घेण्यात मागेपुढे पाहत नाहीत. जे आहे ते छातीठोकपणे सांगतात, हा त्यांचा स्वभाव राहिलेला आहे. गोरगरिबांचे हक्क, दिव्यांगांचे प्रश्न, रुग्णसेवा, रक्तदानाचा अजेंडा राबविण्यावर त्यांचा बेशक भर राहिलेला आहे. आमचे नाते जनतेच्या दुःखाशी आहे. सरकारमध्ये आहे म्हणून घरी बसू का, आंदोलन आमच्या रक्तातच आहे. यापुढची लढाई विधवा, अपंग, शेतकरी, शेतमजूर, वृद्ध आणि गोरगरिबांसाठी आहे. जनहितासाठी सरकारविरोधात उभे राहण्याची वेळ आल्यास तेसुद्धा करू, आम्ही सरकारपर्यंत जाणार नाही, सरकारला आमच्यापर्यंत येण्यास भाग पाडू, ज्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचत नाही, त्यांचा आवाज बुलंद करून तो सरकारपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करू, सरकारची जनविरोधी निती, विविध योजना कार्यान्वयनातील लेटलतिफी, दप्तरदिरंगाई याविरोधात हा लढा असल्याचे बच्चू कडू यांनी मोर्चातून स्पष्ट केलेले आहे.
शेतमालाला भाव देण्याची कोणत्याही शासनाची औकात नाही, सर्पदंशाने मृत्युमुखी पडणार्या शेतमजुराला नुकसान भरपाई मिळत नाही. आता 15 दिवसात निर्णय न झाल्यास मंत्रालयात साप सोडू, असा इशारा बच्चू कडू यांनी जन एल्गार मोर्चाच्या माध्यमातून दिलेला आहे. बच्चूभाऊ कडू यांनी मंत्रालयात वेळोवेळी उग्र कृतीतून व विधिमंडळात जहाल भाषणातून त्यांचे विषारी रुप दाखवून दिलेले आहेच. आता ते पुन्हा फुत्कार मारण्यास सज्ज झालेले आहेत. त्याचा विडाही त्यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातूनच उचललेला आहे. मन्यार सापाचे विष थेट मेंदूवर तर नागाचे विष एकाचवेळी हृदय आणि मेंदूवर परिणाम करते. घोणस आणि फुरसे सापाचे विष हे रक्ताच्या गुठळ्या करते. त्यातही घोणस हा सर्वाधिक गतीने अटॅक करतो. बच्चूभाऊ कडू आता त्यापैकी कोणत्या रुपात त्यांच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी मंत्रालयात वा विधिमंडळात जातात, ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या फोनवरून बच्चू कडू हे गतवर्षी गुजरातमार्गे गुवाहाटीला जाऊन आले. सर्वांवरच खोक्यांचा आरोप झाला. त्या आरोपाने बेजार झाल्याची पुस्तीही बच्चू कडू यांनी जोडली होती. मंत्रिपदाला ठोकर मारून शिंदे यांच्यासोबत गेलेल्या बच्चूभाऊ कडू यांनी प्रहारचा मुख्यमंत्री होईल, असा विश्वास व्यक्त केला होता. मुख्यमंत्रिपद तर दूरच पण राज्यमंत्री पदसुद्धा त्यांना मिळू शकले नाही. त्यांची ती धडपड व्यर्थ ठरली. मागून आलेले पुढील रांगेत बसले. आशेवर किती दिवस राहणार म्हणून अखेरीस मुख्यमंत्र्यांना निर्णय घेणे सोपे व्हावे, असे नाईलाजाने सांगत त्यांनी मंत्रिपदाचा दावा सोडला. पण तत्पूर्वी मोठ्या संघर्षाची फळे सरकारकडून पदरात पाडून घेतली. ती म्हणजे मतदारसंघातील प्रकल्पांना सुमारे 700 कोटींचा निधी तसेच दिव्यांग बांधवांसाठी मंत्रालयाची निर्मिती, ही त्यांच्यासाठी उपलब्धी ठरली. बच्चू कडू यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून दिव्यांगांच्या हक्कासाठी लढा उभारला होता. त्यासाठी कित्येक आंदोलने केली. ते सर्व प्रयत्न सरकारच्या एका निर्णयाने सार्थकी लागले.
आता बच्चू कडू यांनी पुढचा ‘अजेंडा फिक्स’ केलेला आहे. त्याची झलक त्यांनी पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी सभागृहातील भाषणाने दाखवून दिली. ‘अमूल दूध पिता है इंडिया’ या ऐवजी ‘जहर पिता है इंडिया’, अशी जाहिरात आता व्हायला पाहिजे. राज्यात दरदिवशी 16 कोटी लिटरचे दूध उत्पादन आणि 64 कोटींचे वितरण होते, यातून भेसळीचा ‘पिक्चर’ बच्चू कडू यांनी पेश केला. ‘मलाई कोण खात आहे’, तो हरामखोर कोण?’, ‘आम्ही येथे फक्त गोळा करण्यासाठी आहोत का’, ‘कर्करोगाने मरणार्या लोकांचे काय’, या सवालाने त्यांनी सरकारचा सभागृहात ‘सिनेमा’ केला. सरकारने शेतकरी व सामान्यांच्या जीव केवळ चार-पाच लाखांच्या मदतीपुरता स्वस्त करून ठेवला. घरकुलाचा निधी, पाणीवाटपाचे प्रमाण यातील शहरी, ग्रामीण भेदभाव त्यांनी चव्हाट्यावर आणत व आपले इरादे काय आहेत, ते दाखवून देत बच्चू कडू यांनी सरकारवर मोठा दबाव निर्माण केलेला आहे.
आमदार बच्चू कडू यांनी मोर्चादरम्यान आयुक्तालयात यावेळी सुदैवाने फटाके फोडले नाहीत, मात्र भाषणातून सरकारवर तोफ डागली. शेतातील पेरणी ते कापणीपर्यंतची सर्व कामे मग्रारोहयोतून करावी, कर्जमाफी, अतिवृष्टी व वन्य प्राण्यांमुळे नुकसान व जीवितहानीसाठी मदत, कुडामातीचे घर तसेच पालघरामध्ये राहणारे नागरिक, घरेलू कामगार, बेघर नागरिकांसाठी स्वतंत्र घरकुल योजना, बांधकाम मजुराप्रमाणे शेतकरी व भूमिहीन, शेतमजूर घरेलू कामगारांसाठी महामंडळ, प्रकल्पग्रस्तांना 25 लक्ष अनुदान, 20 लक्ष बिनव्याजी कर्ज किंवा कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी, कंत्राटी कामगारांसाठी महामंडळ, औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना पूर्वकल्पनेशिवाय कामावरून कमी न करण्याची इत्यादी मागण्या त्यांनी सरकारकडे मोर्चाद्वारे केल्यात.
शेतातील पेरणी ते कापणीपर्यंतची सर्व कामे मग्रारोहयोतून करावी, ही बच्चू कडू यांची फार जुनी मागणी आहे. प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन त्यांच्याच मतदारसंघातून बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने उभे केलेले आहे. त्या समितीची मागणी ‘हायजॅक’ करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो आहे. अतिक्रमण करून कुडामातीच्या घरात तसेच पालमध्ये राहणारे नागरिक, घरेलू कामगार, बेघर नागरिकांसाठी स्वतंत्र घरकुल योजना राबवावी, या मागणीसाठी तर त्यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान पालमध्ये राहून आंदोलन केले होते. कंत्राटी कामगारांसाठी महामंडळ स्थापण्याची त्यांच्या पक्षाचीच मागणी आहे. यातून बच्चू कडू यांनी त्यांच्या अजेंड्याचा झेंडा खांद्यावर घेतल्याचे दिसते. तो सरकारकडून पूर्ण करून घेण्याचा ते पुरेपूर प्रयत्न करतील व वेळप्रसंगी ‘सरकारला खांदा देण्यास’ मागेपुढे पाहणार नाहीत. त्यात त्यांना आगामी काळात किती यश मिळते, ते लवकरच दिसून येईल, तूर्त प्रतीक्षा करू या! जय कृष्ण हरि!!
-गोपाल रा. हरणे, वरिष्ठ पत्रकार, अमरावती.
9422855496