गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा
मुसलमान हे गाईची तस्करी करतात, मुसलमान गाई कापतात, मुसलमान गाईची निर्यात करतात, मुसलमान गोभक्षक आहेत,इत्यादी मुद्द्यावर, आजवर बजरंग दल, विश्व हिंदू परिषद तथा इतर काही हिंदू संघटनांची दुकानदारी सुरू होती. घरात गाईचे मास शिजत असल्याच्या संशयावरून, त्यांनी अखलाकची हत्या केली. तरीसुद्धा सर्वसामान्य भारतीयांची सहानुभूती, मारेकऱ्यांच्याच बाजूने होती. अखलाकची बाजू उचलून धरणाऱ्या, काही युट्युब्सला, त्यावेळी खिजगणतीत सुद्धा मोजले गेले नाही. गाय आपली माता आहे आणि तीस कोटी देवांचा वास तिच्या शरीरात आहे, या भावनेने भारवलेल्या हिंदूला, गोमातेची हत्या करणाऱ्या बद्दल राग असला, तर त्यात गैर होते, असेही म्हणता येणार नाही. परंतु गोहत्या करणाऱ्या मुसलमानांविषयी, समस्त हिंदूंचा द्वेष एवढा पराकोटीला नेऊन ठेवायचा होता की, हिंदूनेच गाईची हत्या करायची आणि त्याचा आरोप मुसलमानावर जाईल याची व्यवस्था करायची, अशीही प्रकरणे उघडकीस आलेली आहेत.ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले, हे स्वतः कुरेशी नाम धारण करून, गुजरात मध्ये राहिले. आणि त्यावेळी गायीची वाहतूक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी प्रथम त्यांना दमदाटी करून, नंतर त्यांच्याकडून भली मोठी खंडणी वसूल करून. त्यांना गो - वाहतुकीचा मार्ग मोकळा करून देण्यात आला. त्यांच्याकडून खंडणी वसूल करणाऱ्या संघटना, या अर्थातच हिंदूंच्या संघटना होत्या. या विषयावर यापूर्वी देखील बरीच चर्चा झालेली आहे. एवढ्यातच घडलेल्या एका घटनेनुसार, हिंदूच्या एका मंदिरापुढे, मासाचे तुकडे पडले असल्याचे आढळून आले. हिंदूंच्या मंदिरासमोर मासाचे तुकडे म्हटल्यानंतर, हिंदूंनी एकत्र येऊन त्याचा निषेध करणे, ही साहजिक बाब होती. परंतु निषेध करत असताना, सारा रोष मुस्लिम समाजावर होता, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. परंतु मंदिरात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज ज्यावेळी तपासले गेले, त्यावेळी मासविक्री करणारे दोन इसम,पोत्यात मास भरून, ते आपल्या स्कूटरवरून घेऊन जात असल्याचे दिसून आले. नेमके मंदिराच्या समोर, त्यांच्या पोत्यातील मासाचे काही तुकडे खाली पडले, असे स्पष्टपणे दिसून आले. यामध्ये या तरुणांचा काहीही दोष नसल्याचे आढळून आले. परंतु यातील प्रमुख बाब अशी की, मासाची वाहतूक करणारे हे दोघेही इसम हिंदू धर्माचे होते. अर्थात मंदिरासमोर मास आणून टाकले म्हणून, दंगल घडवून आणण्याची फार मोठी संधी, हिंदू संघटनाच्या हातून निसटली.
गो हत्या आणि गोमास भक्षण याकरता बदनाम असणाऱ्या मुस्लिम समाजाने, या ईदच्या पर्वावर वेगळेच पाऊल उचलले. या ईदच्या पर्वावर, गोमातेची कुर्बानी न देता, सरकारने गोमातेला, राष्ट्रीय पशु घोषित करून तिची हत्या बंद करावी, अशी मागणी एका मुस्लिम पुढाऱ्याने पुढे केली. आणि इतर मुस्लिम संघटनांनी या मागणीला पाठिंबा देखील दिला.वर वर पाहता, गोहत्या बंद करण्याची ही मागणी असली तरी, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्या सहित काही हिंदू संघटनांची दुकानदारी बंद करण्याचा घाट, मुस्लिम संघटनांनी घातला असल्याचे, यामधून दिसून येते.
यापूर्वी महाराष्ट्र सरकारने गाईला "राज्य मातेचा" दर्जा दिला होता. त्यावेळी गाईला राज्यमातेचा दर्जा देणारे पहिले राज्य म्हणून, महाराष्ट्राचे भरपूर कौतुक झाले. परंतु गोमातेला राज्य मातेचा दर्जा दिल्यामुळे, गाईचा दर्जा सुधारला अशातला अजिबात भाग नाही. आजही आमच्या महाराष्ट्राच्या गाई, उकिरड्यावर प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून फेकलेले अन्नपदार्थ ,प्लास्टिकच्या पिशव्या सकट खात असल्याचे, आपल्याला दिसून येते. शहरातील अनेक हॉटेल्स तथा दुकानामधून, गोमातेच्या सेवार्थ एक डबा ठेवलेला आपल्याला आढळून येतो. येणारे ग्राहक एक रुपयापासून पुढची रक्कम, आपल्या ऐपतीप्रमाणे या डब्यात टाकत असतात. दररोज किती पैसे जमा होतात, ते कुठे जातात, याविषयीचा हिशोब असतो का, याबद्दल ठाऊक नाही. परंतु आपली गोमात्रा मात्र, उकिरड्यावर अन्न खात असल्याचे दृश्य वरचेवर बघायला मिळते.
तर महाराष्ट्राने राज्यमाता म्हणून घोषित केलेल्या गाईला, भारत सरकारने राष्ट्रमाता म्हणून घोषित करावे, अशा प्रकारची मागणी करून, मुस्लिम संघटनांनी भारतीय जनता पक्षाची पंचाइत करून ठेवली आहे. कारण भारतीय जनता पक्षाचे गोप्रेम, हे अनेक भागात विभागले गेले आहे. गोमातेची हत्या करण्याला त्यांचा विरोध आहे.परंतु आपण बिफ खातो आणि खात राहणार, असे घोषित करणाऱ्या किरण रिजुजी या भारतीय जनता पक्षाचे नेत्याचे स्थान, लोकसभेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांच्या अगदी मागच्या बाजूला आहे. उत्तर - पूर्व भागातील राज्य आणि गोवा या ठिकाणी,मास हेच त्या ठिकाणच्या लोकांचे प्रमुख अन्न आहे. अशा राज्यांमधून गाईची कत्तल करण्यास, भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या सलग्नित हिंदू संघटनांना, काहीच हरकत नाही. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते, सुधांशू त्रिवेदी तर म्हणतात, की उत्तर पूर्व भागात कत्तल होत असणाऱ्या गाई, या गाई नसून त्या मिथुन आहेत. आपण सुद्धा महाराष्ट्रात गाईचे अशाप्रकारे नामकरण केले, तर आपल्याला गाईचे कत्तल करण्याचा अधिकार मिळेल का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पश्चिम बंगाल मध्ये ज्यावेळी गाईला राष्ट्रीय पशू घोषित करा, अशी मागणी मुस्लिम समुदायाकडून आली. त्यावेळी गाय ही आमची माता आहे, त्यामुळे आमच्या मातेला, तुम्ही पशु कसे काय सांगू संबोधू शकता, असा प्रश्न विचारण्यात आला. परंतु पशू नसून, माता असलेली ही गाय, 14 वर्षाची झाल्यानंतर, तिला कापण्यास काही हरकत नाही असे पश्चिम बंगालच्यामुख्यमंत्र्यांचे मत आहे. या मानलेल्या गाईला कापण्याचे वय निश्चित केले जाऊ शकत असेल तर, मग जन्मदाता आईच्या वयाबद्दल सुद्धा तुम्ही विचार कराल, अशी तुमची मानसिकता असू शकते. एकंदरीतच भारतीय जनता पक्षाच्या, निरनिराळ्या नेत्यांचे गायी बाबतचे विचार ऐकले, तर ते स्वतःच गोंधळलेल्या अवस्थेत असल्याचे आपल्याला बघायला मिळत.
नुकतीच सावरकर जयंती साजरी झाली. आजकाल सावरकर म्हणजे, भारतीय जनता पक्ष करता जीव की प्राण झाले आहेत.सावरकर म्हणतात, जर एखादी गाय, ज्यावेळी शेतकऱ्याच्या बांधावर येते त्यावेळी तो हातामध्ये काठी घेऊन तिला चार-पाच झोडपे लावतो. या चार-पाच झोडप्यात, तिच्या अंगातील 33 कोटी पैकी किमान चार-पाच देव तरी मरून जायला हवे. एका उपयुक्त पशुखेरीज, सावरकर यांच्या लेखी गाईची किंमत नव्हती. गाई पेक्षा गाढव हे जास्त उपयुक्त जनावर आहे, असे त्यांचे मत होते, असो! सावरकरांची गाई विषयीचे मत, हा आजच्या लेखाचा विषय नाही. तर मुसलमानांनी गाईला राष्ट्रीय पशु घोषित करण्याची मागणी केल्यानंतर, हिंदू संघटनांची दातखिळी का बसली, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. गोमातेच्या निर्यातीमध्ये ,बहुतेक ब्राझील नंतर, भारताचा दुसरा क्रमांक लागतो. कदाचित लवकरच भारत, याबाबतीत प्रथम स्थान देखील प्राप्त करेल. एवढ्या मोठ्या प्रमाणात गोवंशाची कत्तल करणारा देश, गोमातेला आईचा दर्जा देण्याचा दुटप्पीपणा कसा काय करू शकतो, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. अल बशीर या नावाप्रमाणे, अजून काही मुस्लिम नाव धारण करून, गोवंशाची निर्यात करणाऱ्या सर्वच, कंपन्यांचे मालक हिंदू असल्याची बाब पुढे आली आहे. मुसलमानांना बदनाम करायचे आणि हिंदूंनी गोवंशाच्या मासाची निर्यात करायची, भारतीय जनता पक्षाने या कंपन्यांकडून, निवडणूक रोख्यांच्या स्वरूपात, करोडो रुपयांचा चंदा घ्यायचा, असा गोरख धंदा अनेक वर्षापासून सुरू आहे. या ईदच्या पर्वावर देखील मुसलमान गायीची कुर्बानी देतात म्हणून, अनेक हिंदूंनी आपल्या गाई मार्केटमध्ये विक्री करता आणल्या होत्या. परंतु मुसलमानांनी घेतलेल्या निर्णयामुळे, त्यांच्या मनसुब्यावर पाणी फिरले. मुसलमान जरी गाईची कुर्बानी देत असतील, तरी त्यावर हिंदू कुटुंबाची उपजीविका अवलंबून आहे. अशीच आपल्या भारताची अर्थव्यवस्था राहिली आहे. मुसलमानांच्या मागणीला होकार देऊन, गाईला राष्ट्रमाता घोषित केले तर, मुसलमानांचे फार काही बिघडणार नाही. परंतु गोमस निर्यात करणाऱ्या हिंदू कंपन्यांचे दिवाळे निघाल्याशिवाय राहणार नाही, ही आजची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे गाईला माता संबोधून, मुसलमानाविषयी द्वेष पसरवणे, इथपर्यंतच भारतीय जनता पक्षाचे आणि तथाकथित हिंदू संघटनांचे गोमाते प्रतिचे प्रेम मर्यादित आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
पंकज वैद्य, वरिष्ठ पत्रकार,
अमरावती - 9823014040