एमआयएमला मोठा धक्का? छत्रपती संभाजीनगरात ‘इस्लाम पार्टी’ची दमदार एंट्री; आसिफ शेख यांचा इम्तियाज जलील वर हल्लाबोल

एमआयएमला मोठा धक्का? छत्रपती संभाजीनगरात ‘इस्लाम पार्टी’ची दमदार एंट्री; आसिफ शेख यांचा इम्तियाज जलील वर हल्लाबोल

छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी) : राज्याच्या राजकारणात मुस्लिम समाजाच्या नेतृत्वाचा दावा करणाऱ्या एमआयएमसमोर आता नव्या राजकीय आव्हानाचे चित्र उभे राहू लागले आहे. मालेगाव येथून उदयास आलेल्या इस्लाम पार्टीने छत्रपती संभाजीनगरात भव्य शक्तिप्रदर्शन करत आपल्या संघटनात्मक विस्ताराची जोरदार सुरुवात केली आहे. कटकट गेट परिसरातील सहारा लॉन येथे हजारो कार्यकर्ते आणि समर्थकांच्या उपस्थितीत झालेल्या जाहीर कार्यक्रमात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी आमदार आसिफ शेख यांनी शहर आणि जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करत एमआयएमवर थेट निशाणा साधला.

     कार्यक्रमात एमआयएमचे माजी नगरसेवक व शहरातील परिचित राजकीय चेहरा रफतयार खान यांची इस्लाम पार्टीच्या छत्रपती संभाजीनगर शहराध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली. तर आरटीआय कार्यकर्ते, समाजसेवक आणि विविध जनआंदोलनांमध्ये सक्रिय असलेले मोहम्मद अझहर खान यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. एमआयएमचे माजी नगरसेवक आरिफ हुसेनी यांची पक्ष प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली. युवा आघाडीची धुरा अबुल हसन हाश्मी यांच्याकडे देण्यात आली असून जिल्हाध्यक्ष म्हणून अबुल आला हाश्मी यांची निवड करण्यात आली.

     याशिवाय औरंगाबाद पूर्व, मध्य आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघांसाठी स्वतंत्र पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. शहरातील विविध प्रभाग, वॉर्ड, मीडिया सेल आणि संघटनात्मक विभागांच्या नियुक्त्याही या कार्यक्रमात करण्यात आल्या. त्यामुळे आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इस्लाम पार्टीने शहरात मजबूत संघटन उभारण्याची तयारी सुरू केल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

     सभेला संबोधित करताना आसिफ शेख यांनी एमआयएम पक्षाच्या कार्यपद्धतीवर आणि नेतृत्वावर कडाडून टीका केली. मुस्लिम समाजाच्या प्रश्नांवर सातत्याने संघर्ष करण्याऐवजी एमआयएमचे काही माजी आमदार आणि खासदार हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शिवसेना आणि भाजपच्या राजकारणाला पोषक भूमिका घेत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. सभास्थळी लावण्यात आलेल्या मोठ्या एलईडी स्क्रीनवर काही व्हिडिओ दाखवत त्यांनी आपल्या आरोपांचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. या व्हिडिओंमुळे सभेत उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये मोठी चर्चा रंगली.

     मुस्लिम समाजावर होणारे अन्याय, धार्मिक ध्रुवीकरण, शैक्षणिक मागासलेपणा आणि रोजगाराच्या प्रश्नांवर इस्लाम पार्टी रस्त्यावर उतरून संघर्ष करेल, असा दावा करत आसिफ शेख यांनी संविधानिक मार्गाने हक्क मिळविण्यासाठी व्यापक आंदोलन उभारण्याची घोषणा केली. "फक्त भावनिक भाषणे नव्हे तर प्रत्यक्ष लढा आणि जनतेच्या प्रश्नांवर कृती" हीच पक्षाची ओळख असेल, असे त्यांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगरात झालेल्या या शक्तिप्रदर्शनामुळे मुस्लिम राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.

     एमआयएममधील काही नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्ते इस्लाम पार्टीकडे वळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून आगामी निवडणुकांमध्ये या नव्या पक्षाची भूमिका किती प्रभावी ठरते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र एका गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे—मुस्लिम मतदारांच्या राजकारणावर एकहाती वर्चस्व असल्याचा दावा करणाऱ्या पक्षांना आता नव्या आव्हानाचा सामना करावा लागू शकतो, अशी चर्चा कार्यक्रमानंतर रंगू लागली आहे.