मंत्र्याच्या ड्रायव्हरशी पंगा: २२ मुस्लिम धर्मीयांची दुकाने जाळण्यात आली – नुकसान भरपाईसाठी उपोषण सुरू

मंत्र्याच्या ड्रायव्हरशी पंगा:  २२ मुस्लिम धर्मीयांची दुकाने जाळण्यात आली – नुकसान भरपाईसाठी उपोषण सुरू

जळगाव, २७ जानेवारी २०२५: (प्रतिनिधी)
३१ डिसेंबर २०२४ रोजी जळगाव जिल्ह्यातील पाळधी गावात झालेल्या किरकोळ वादावरून मोठा तणाव निर्माण झाला. मंत्र्यांच्या ड्रायव्हरशी झालेल्या वादानंतर मुस्लिम समाजाच्या एका युवकाला मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर रात्री गावातील २२ मुस्लिम धर्मियांची दुकाने जाळण्यात आली. यामध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.

घटनेचा प्राथमिक तपशील असा आहे की 31 जानेवारी 2024 चे संध्याकाळी पाळधी गावात राहणारे महाराष्ट्र शासनाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या ड्रायव्हरसोबत एका मुस्लिम युवकास सोबत किरकोळ वाद झाल्यानंतर, मंत्र्यांच्या दोन मुलांनी त्या मुस्लिम युवकाला मारहाण केली व त्याला पाळधी गावातील पोलीस चौकीत नेऊन तिथेही मारहाण केली. पोलीस चौकीतील सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे. परंतु, मंत्र्यांच्या दहशतीमुळे पोलिसांनी मारहाण करणाऱ्या लोकांचे विरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही. उलट त्या मुस्लिम युवकाला गाव सोडून निघून जाण्याचा सल्ला पोलिसांनी दिला असून तेव्हापासून तो युवक बेपत्ता असल्याची चर्चा गावात आहे.

          त्यानंतर रात्री अकरा वाजताचे नंतर रात्रभर गावातील मुस्लिम समाजाच्या लोकांचे  २२ दुकानांना जाळण्यात आले. जाळलेल्या दुकानांची संख्या जास्त असूनही आणि दुकानांचे घटनास्थळ वेगवेगळे असताना सुद्धा फक्त एकच एफआयआर अज्ञात आरोपींची विरुद्ध 1 जानेवारी 2025 रोजी नोंदविण्यात आली, आणि मंत्र्यांच्या मुलांचा किंवा ड्रायव्हरचा एफ आय आर मध्ये कुठेही उल्लेख करण्यात आला नाही.

          पीडित दुकानदारांनी सांगितले की, जळालेल्या दुकानांचा पंचनामा फक्त पोलिसांनी केला आहे; तहसीलदार, उपविभागीय अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. या प्रकरणात पोलिसांचा भेदभाव स्पष्ट दिसून येतो.

          नुकसान भरपाईची मागणीसाठी पीडित दुकानदार, त्यांची कुटुंबे, महिला व लहान मुले २५ जानेवारीपासून पाळधी गावातील जीएस ग्राउंडवर साखळी उपोषणाला बसली आहेत. हे ठिकाण आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयाच्या समोर असूनही अद्याप कोणतीही दखल घेतलेली नाही. साखळी उपोषणाचे प्रमुख मुद्दे असे आहेत;
नुकसान भरपाई: जळालेल्या २२ दुकानांसाठी त्वरित नुकसान भरपाई द्यावी.

कठोर कारवाई: दुकानांना जाळणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी.

प्रत्येक घटनेची एफआयआर: वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या जाळपोळीसाठी वेगवेगळ्या एफआयआर नोंदवाव्या.

        २५ जानेवारीपासून हे साखळी उपोषण सुरूच राहील. मात्र, तीन दिवसांत प्रशासनाने त्यांच्या मागणीनुसार कोणतीही कारवाई केली नाही, तर हे साखळी उपोषण आमरण उपोषणात बदलले जाईल, असा इशारा हाजी हमीद मणियार यांनी दिला आहे.

           उपोषणाला जळगाव जिल्हा एकता संघटनेचे फारुक शेख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नदीम मलिक, तसेच अनेक मान्यवरांचा पाठिंबा मिळाला आहे.

          हाजी हमीद मणियार, यासीन हाफिस देशमुख, शेख हबीब शरीफ, शेख शरीफ एजाज, युसुफ देशमुख, दानिश शेख, सत्तार शेख, साबीर सादिक, शकील शेख अब्दुल्ला, अक्रम खान, रफिक खान, शेख तसवर, वकार अहमद, उमर सलीम, जावेद पिंजारी, रज्जाक शेख, सय्यद बिस्मिल्ला यांच्यासह अनेक पीडित या आंदोलनात सहभागी आहेत.

          आंदोलकांनी शासनाला विनंती केली आहे की, त्वरित नुकसान भरपाई दिली जावी व आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा, आंदोलन अधिक तीव्र केले जाईल. सरकारने तातडीने लक्ष घालून या पीडितांना न्याय देणे अत्यावश्यक आहे.