९५% शास्ती माफ! प्रशासन सज्ज, प्रशासकांची रात्री झोन ४ ला सरप्राईज़ व्हिजिट

छत्रपती संभाजीनगर : दि. १८ जुलै: महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक जी. श्रीकांत यांनी नागरिकांना दिलासा देण्यासाठी मालमत्ता कराच्या शास्तीवर मोठी सूट जाहीर केली आहे. या सूट योजनेत १५ जुलै ते १५ ऑगस्ट दरम्यान मालमत्तेचा थकीत कर एकरकमी भरल्यास ९५ टक्के शास्ती माफ केली जात आहे.
या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, यासाठी सर्व झोन कार्यालये रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आणि सुट्टीच्या दिवशीही उघडे ठेवण्याचे आदेश प्रशासकांनी दिले आहेत.
या आदेशांची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत आहे का, हे पाहण्यासाठी जी. श्रीकांत यांनी आज रात्री ०८:४५ वाजता झोन क्रमांक ४ (टीव्ही सेंटर) येथील कार्यालयाला अचानक भेट दिली. त्यांनी कर वसुलीचा आढावा घेतला व कर्मचाऱ्यांचे कामकाज तपासले.
महानगरपालिकेची "शास्ती से आझादी" ही योजना नागरिकांसाठी फायदेशीर ठरत असून, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाने पुन्हा एकदा केले आहे.