अलखैरच्या नावाखाली कर्ज फसवणूक; सायबर गुन्हेगारांविरोधात अखेर गुन्हा दाखल

अलखैरच्या नावाखाली कर्ज फसवणूक; सायबर गुन्हेगारांविरोधात अखेर गुन्हा दाखल
Al Khair Bank, Aurangabad

औरंगाबाद: अलखैर क्रेडिट को-ऑपरेटिव सोसायटीच्या नावाखाली कर्ज देण्याचे आमिष दाखवून शेकडो लोकांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या सायबर गुन्हेगारांविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

           अलखैर क्रेडिट को-ऑपरेटिव सोसायटी गेली २३ वर्षे औरंगाबाद शहरात कार्यरत असून गरजू लोकांना केवळ एक टक्का सेवा शुल्क आकारून, कोणतेही व्याज न लावता कर्ज पुरवते. या उल्लेखनीय कार्यावर झी न्यूजने विशेष कार्यक्रम प्रसारित केला होता.

          झी न्यूजच्या कार्यक्रमातील टेप्सचा गैरवापर करत काही सायबर गुन्हेगारांनी लोकांना व्याजमुक्त कर्जाचे आमिष दाखवून फसवणूक करण्याचा कट रचला. हे गुन्हेगार फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप यांसारख्या डिजिटल माध्यमांचा वापर करत लोकांची फसवणूक करत होते. गेल्या वर्षभरात ही फसवणूक सुरू होती.

          हहसायबर गुन्हे विभागाला वारंवार या प्रकरणाची माहिती देण्यात येत होती. अखेर, अलखैर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त संजय पवार यांची भेट घेऊन तक्रार दाखल केली. त्यांनी सायबर गुन्हे विभागाला तत्काळ एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले.

          अलखैरचे व्यवस्थापक हाफिज हबीबुल्लाह खान यांच्या तक्रारीवरून सायबर गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक श्री. पांढरे यांनी एफआयआर दाखल केला. “आम्ही त्वरित योग्य ती कारवाई करू,” असे त्यांनी सांगितले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
नागरिकांसाठी अलखैर संस्थेची सूचना:
अलखैर कोणतेही ऑनलाइन व्यवहार करत नाही. संस्थेचे कामकाज केवळ औरंगाबाद शहरापुरते मर्यादित आहे. शहराबाहेरील लोकांना कर्ज दिले जात नाही. संस्थेचे अध्यक्ष इंजिनियर वाजेद कादरी यांनी नागरिकांना सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

           नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या डिजिटल माध्यमांवर व्याजमुक्त कर्जाचे आमिष दाखवणाऱ्या पोस्ट्स किंवा मेसेजेसवर विश्वास ठेवू नये. अशी फसवणूक झाल्यास त्वरित सायबर गुन्हे विभागाशी संपर्क साधावा.