गुटखा रेड : बुलढाणा पोलीसांचा चीप पब्लिसिटीचा की अन्य कशाचा फंडा?
जळगाव जामोद, 2 डिसेंबर : (प्रतिनिधी)
पोलीस विभागाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार आज बुलढाणा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खामगाव येथील अपर पोलीस अधीक्षक श्रावण दत्त एस (IPS) यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक खामगाव यांचे कार्यालयातील वाचक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ सूर्यवंशी, पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन बोरसे पोलीस नाईक गजानन आहेर, रघुनाथ टाकसाळ, संदीप टाकसाळ आणि पोलीस कॉन्स्टेबल राम धामोडे यांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्राम निंभोरा (बु) येथे गुटख्याची रेड केली. त्यात 778243 /- रुपये किमतीचा सुगंधित पान मसाला गुटखा आणि मोबाईल आणि वाहने असा एकूण 1642553/- रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपी दिगंबर प्रल्हाद पारस्कर वय 46 वर्षे, राहणार निंभोरा (बु) यांचेकडून जप्त करण्यात आला.
या कारवाई संदर्भात अधिकची माहिती पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथून घेण्यात आली असता पोलिसांनी गैर कायदेशीर रित्या त्यांना अधिकार नसताना गुटख्याची रेड करून गुन्हा दाखल केल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
जळगाव जामोद पोलीस स्टेशन येथील पोलीस उपनिरीक्षक सचिन वाकडे यांचेकडून गुन्ह्यासंबंधी अधिकची माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की अपर पोलीस अधीक्षक खामगाव यांचे कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी निंभोरा (बु) येथे गुटख्याची रेड केली. पोलीस नाईक गजानन बोरसे यांनी दिलेल्या रिपोर्ट प्रमाणे पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे गुन्हा रजिस्टर नंबर 955/2021 कलम 328, 272,188 भारतीय दंड विधानासह कलम 26 (2)(i),(iv) अन्न सुरक्षा मानदे कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणि गुटख्याची रेड टाकणाऱ्या पथकासोबत कोणीही अन्नसुरक्षा अधिकारी नव्हता. प्रेस नोट मध्ये दर्शविल्याप्रमाणे गुटख्याची रेड टाकणाऱ्या पथकामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ सूर्यवंशी हे अधिकारी असताना त्यांनी स्वतः तक्रार न देता एका कनिष्ठ पोलीस अंमलदार म्हणजेच पोलीस नाईक गजानन बोरसे यांना तक्रार द्यायला लावली. गुटख्याची रेड टाकण्यासाठी व मालमत्ता जप्त करण्यासाठी कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला किंवा अंमलदाराला शासनाने अन्न सुरक्षा व मानदे कायद्याचे कलम 41 नुसार कोणतेही अधिकार दिलेले नसताना पोलिस अधिकाऱ्यांनी अशी गुटख्याची रेड करणे व मालमत्ता जप्त करणे गैर कायदेशीर आहे. याची जाणीव बहुतेक सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ सूर्यवंशी यांना असल्यामुळे त्यांनी स्वतः फिर्याद न देता एका कनिष्ठ दर्जाचे पोलीस अंमलदाराला तक्रार द्यायला लावली असावी. तसेच जळगाव जामोद चे पोलीस स्टेशन ऑफिसरनी पण अशा गैर कायदेशीर रित्या करण्यात आलेल्या कारवाई वरून गुन्हा कसा दाखल करून घेतला? असा ही प्रश्न उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे या गुन्ह्यात आरोपीने कोणत्याही व्यक्तीला त्रास देण्याचे (Injure करण्याचे) उद्देशाने तो गुटखा ( विषारी पदार्थ) खाऊ घातलेला नस्ताना जळगाव जामोद पोलीस स्टेशन ऑफिसरनी कलम 328 भारतीय दंड विधाना प्रमाणे गुन्हा कसा दाखल करून घेतला?. असा पण प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलीस नाईक गजानन बोरसे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सदरचा जप्त करण्यात आलेला गुटखा हा आरोपीच्या किराणा दुकानाचे समोर उभ्या असलेल्या वाहनातून जप्त करण्यात आला होता. विषारी पदार्थ एखाद्या ठिकाणावरून जप्त केले असता त्याला कलम 328 लागू होत नाही. असे असताना पोलीस स्टेशन ऑफिसर या कलमाचा कसा काय वापर करतो? आणि जिल्ह्यातील दोन-दोन IPS ऑफिसर रेड साठी कसा आदेश देतात आणि मार्गदर्शन करतात? असा पण प्रश्न उपस्थित केला जात आहे. आणि तपासी अंमलदार सुद्धा त्याचा तपास गैर कायदेशीर रित्या कसा चालू ठेवतो असा पण प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अन्न सुरक्षा मानदे कायद्याचे कलम 41 नुसार प्राधिकृत केलेल्या अन्न सुरक्षा अधिकारी यांनाच गुटखा संबंधी रेड घालण्याचे आणि मालमत्ता जप्त करण्याचे अधिकार आहेत. प्राधिकृत अन्नसुरक्षा अधिकाऱ्याला सोबत न घेता अशी रेड करणे व जप्ती करणे म्हणजे स्वतः फुशारकी मारण्यासाठी किंवा अन्य 'लाभा'साठी किंवा चीप पब्लिसिटीसाठी पोलिसांकडून अशी गैर कायदेशीर कारवाई करण्यात आली असावी का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गुटख्याची हि रेड गैर कायदेशीर असल्याकारणाने आरोपी तर कोर्टातून निर्दोष मुक्त होईलच. परंतु आरोपीने दहा वर्षाची शिक्षा होण्या जोगा आणि अजामीनपात्र गुन्हा कलम 328 भारतीय दंड विधान नुसार केला नसताना आरोपीला त्रास देण्याचे उद्देशाने लावण्यात आलेल्या या कलमा नुसार रेड करणाऱ्या पोलिसांविरुद्ध, गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस स्टेशन ऑफिसर विरुद्ध तसेच तपासी अंमलदाराने कलम 328 वगळले नाही तर त्याचे विरुद्ध सुद्धा कलम 167 भारतीय दंड विधान अन्वये गुन्हा दाखल होऊ शकतो. याचे ज्ञान पोलिसांना नसावे याचा आश्चर्य वाटतो.