खोकेच खोके - एकदम ओके : संजय शिरसाट यांच्या कुटुंबाने कवडीमोल भावात खरेदी केल्या १० एकर शासकीय जमिनी – इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप

औरंगाबाद, ११ जून : महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कुटुंबाने सरकारी जमिनी बेकायदेशीर पद्धतीने लाटल्याचा खळबळजनक आरोप AIMIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. त्यांनी विविध ठिकाणच्या जमिनींच्या खरेदी-विक्रीचे दस्तऐवज सादर करत हा आरोप सिद्ध केल्याचा दावा केला आहे.
हरिजन समाजासाठी राखीव जमीन खाजगी मालकीत?
इम्तियाज जलील यांनी सांगितले की, साजापूर परिसरातील हरिजन समाजासाठी राखीव ठेवलेली वर्ग-2 प्रकारातील 10 एकर सरकारी जमीन संजय शिरसाट यांच्या कुटुंबाने वर्ग-1 मध्ये बदल करून कवडीमोल दरात खरेदी केली. सध्याची बाजारभाव किंमत 3 कोटी रुपये प्रति एकर असताना, ही संपूर्ण 10 एकर जमीन केवळ 1 कोटी 10 लाख रुपयांत खरेदी करण्यात आली.
पडद्यामागे प्रशासनाचा हात?
या व्यवहारामध्ये तलाठी बागडे आणि तत्कालीन तहसीलदार रमेश मुनलोड यांच्या संगनमताने ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोप जलील यांनी केला. यापूर्वी बागडे यांना महिला तहसीलदारांच्या विरोधामुळे आठ वेळा निलंबित करण्यात आले होते. मात्र तरीही त्यांची नियुक्ती करण्यात आली.
शिरसाट कुटुंबाच्या नावावर कोट्यवधींची मालमत्ता
अदालत रोड, जालना रोड (चिंतामणी कॉलनी):
येथे 12,000 स्क्वेअर फूट जमीन 5 कोटी 83 लाख 94 हजार रुपयांना संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत, दुसरा मुलगा तुषार आणि पत्नीच्या नावावर खरेदी करण्यात आली. दर फक्त 4800 रुपये प्रति स्क्वेअर फूट.
साजापूर (गट क्रमांक 34):
डिसेंबर 2024 मध्ये 2 एकर 2 गुंठे जमीन सिद्धांत शिरसाट यांनी 1 कोटी 50 लाखात, तर याच गटातील आणखी तितकीच जमीन 50 लाखात खरेदी करण्यात आली. सप्टेंबर 2024 मध्ये त्यांच्या पत्नीने देखील 2 एकर 2 गुंठे जमीन 60 लाखात खरेदी केली.
शिरसाट गप्प का? – इम्तियाज जलील यांचा सवाल
"दररोज पत्रकार परिषद घेणारे पालकमंत्री आता गप्प का आहेत?" असा सवाल इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला. त्यांनी विचारले की, "दलित, आदिवासी समाजातील गरीब, बेघर लोकांना जमीन मिळत नाही, पण संजय शिरसाट यांच्या कुटुंबाला एवढी जमीन कशी मिळाली?"
मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश द्यावेत – जलील यांची मागणी
इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री, राज्यपाल, ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स विभागाला या सर्व प्रकरणाचे पुरावे सादर करण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी सांगितले की, "जर मुख्यमंत्री भ्रष्टाचारविरोधी आहेत असे दाखवत असतील, तर त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी लावावी. अन्यथा त्यांना चष्मा पाठवू."
MIDC प्लॉट प्रकरणामुळे संतप्त प्रतिक्रिया
मागील आठवड्यातही जलील यांनी दारूच्या कारखान्यासाठी MIDC प्लॉट अत्यल्प दरात शिरसाटांनी घेतल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर शिरसाट समर्थकांनी त्यांच्या घरावर शेण फेकण्याचा इशारा दिला होता, त्यामुळे त्यांच्या घरी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
शेवटी जलील म्हणाले...
"माझ्यावर कोणताही दबाव चालणार नाही. मला खरेदी करता येत नाही. मी घाबरणारा नाही. हे आरोप मी पुराव्यांसह करत आहे. संजय शिरसाट आणि त्यांच्या कुटुंबाच्या नावे कोट्यवधींची संपत्ती केवळ दोन-तीन वर्षात जमा झाली. एवढं सगळं होत असतानाही विरोधी पक्ष गप्प का? हाही मोठा प्रश्न आहे."
संजय शिरसाट यांच्या कुटुंबावर शासकीय जमीन कवडीमोल भावात खरेदी करून लाटल्याचा गंभीर आरोप AIMIM नेते इम्तियाज जलील यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात दस्तऐवज सादर करून चौकशीची मागणी केली असून, मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारच्या यंत्रणांना सगळे पुरावे पाठविणार असल्याचे जाहीर केले.