गायरान अतिक्रमण विरोधात वंचित आघाडीचा संताप : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची होळी

छत्रपती संभाजीनगर, २१ जुलै २०२५:
जिल्हाधिकाऱ्यांनी १७ जुलै रोजी दिलेल्या गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याच्या आदेशाला वंचित बहुजन आघाडीने जोरदार विरोध केला आहे. आज त्यांनी विभागीय आयुक्तांची भेट घेत निषेध नोंदवला आणि संतप्त कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या परिपत्रकाची होळी करून आपला राग व्यक्त केला.
वंचित आघाडीने सांगितले की, या गायरान जमिनींवर गरीबांना प्रधानमंत्री आवास योजना, रमाई योजना आणि शबरी योजनेअंतर्गत घरे बांधण्यास सरकारनेच परवानगी दिली होती. त्यामुळे आता या जागांवरून त्यांना हटविणे म्हणजेच गरिबांना उघड्यावर काढण्याचा प्रयत्न आहे.
त्यांनी प्रश्न विचारला की, "पालकमंत्र्यांच्या सांगण्यावरूनच हे आदेश निघाले आहेत का?"
तसंच, प्रशासन गरीब जनतेला मदत करण्याऐवजी त्यांना आंदोलनात ढकलत आहे, अशी टीकाही केली.
वंचित आघाडीने असा आरोप केला की, जिल्ह्याच्या गायरान जमिनी हडप करण्यासाठीच अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले गेले आहेत. अतिक्रमणधारकांनी अधिकाऱ्यांकडे नियमबद्धतेसाठी अर्जही दिला होता, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
या मागणीसाठी वंचित आघाडीने याआधीही अनेक आंदोलने केली आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात मुंबईत विधानसभेवर मोर्चा काढण्यात आला होता. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गायरान अतिक्रमण नियमबद्ध करण्याचे आश्वासन दिले होते, याची आठवणही यावेळी करून देण्यात आली.
जर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश मागे घेतले नाहीत, तर वंचित आघाडीने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
या आंदोलनात योगेश बन, सतीश गायकवाड, संदीप जाधव, रुपचंद गाडेकर, सतीश शिंदे, भगवान खिल्लारे, मिलिंद बोर्डे, भाऊराव गवई, नितीन भुईगळ, कोमल हिवाळे, गणेश खोतकर, सुभाष कांबळे, प्रवीण जाधव, शेख युनुस पटेल, भय्यासाहेब जाधव, रवी रत्नपारखे, एस. पी. मगरे, राजाराम घुसाळे, प्रभाकर घाटे, विजय घाटे, योगेश घाटे, सुधाकर घाटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.