महाराष्ट्रातील दोन शक्तीस्थळांवर हल्ले

महाराष्ट्रातील दोन शक्तीस्थळांवर हल्ले

महाराष्ट्रात दोन शक्तीस्थळं आहेत, पैकी एक मुंबई केंद्रीत मातोश्री आणि दूसरे शरद पवार. ह्यांचे चाहते महाराष्ट्रभर पसरलेले आहेत. ह्या दोन शक्तीस्थळांवर सध्या हल्ले होत आहेत. अ‍ॅड. सदावर्तेंच्या नेतृत्वात एस.टी. कर्मचाऱ्यांने शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थान सिल्वर ओकवर हल्ला केला गेला तर दूसरीकडे किरीट सोमय्या, मोहित कंबोज आणि नवणीत राणा (कौर) यांनी मातोश्रीला लक्ष्य केले. या तिन्ही लोकांचा संबंध महाराष्ट्राशी नाही. 

शरद पवारांविरूद्ध आजवर कुणी टिका करण्याची हिंमत केली नव्हती ती हिंमत भाजपाने केली. महाराष्ट्रातील सध्याचं सरकार पाडून येथे राष्ट्रपती राजवट लावण्याचे शर्थीचे प्रयत्न राज्यातील भाजपा फडणवीसांच्या नेतृत्वात अर्थातच केंद्र सरकारच्या समर्थनाने करत आहेत. तर दुसरीकडे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभं करण्यासाठी राणा दाम्पत्य कंबोज आणि सोमय्या बरोबरच राज ठाकरे यांचे सहाय्य लाभलेले हे लोक शिवसेनेविरूद्ध मोहिम राबवत आहेत. सोमय्या यांनी शिवसेना नेत्यांवर भ्रष्टाचाराच्या आरोपांची मालिका चालविली तर दुसरीकडे कंबोज यांनी भोंग्याचे मोफत वाटप करून राज्यातील शांतता सुव्यवस्था बिघडवण्याची मोहिम हाती घेतली तर तिसरीकडे राणा दाम्पत्यांनी मातोश्रीलाच लक्ष्य केले.

एकेकाळी मातोश्रीचा दबदबा आणि दरारा इतका प्रभावी होता की बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला अमेरिकेचे परराष्ट्र सचिव हेनरी किसिंजर यांनी मातोश्रीला -(उर्वरित पान 2 वर)

जाऊन त्यांची भेट घेतली होती. देशाचे दोन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी नंतर देवेगौडा यांनी सुद्धा मातोश्रीला भेट दिली. यात आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्रांचे मोठे व्यापारी खगोशीसुद्धा बाळासाहेबांच्या भेटीला गेले होते. एनरॉन प्रकल्पाची अध्यक्षा रिबेका मार्क यांनी देखील मातोश्रीला जाऊन बाळासाहेबांची भेट घेतली होती. अशा या ऐतिहासिक महत्व असलेल्या महाराष्ट्रात प्रामुख्याने मुंबईतील शिवसेनेच्या शक्ती स्थळाला राणा दाम्पत्यांनी लक्ष्य केले आहे. 1995 साली जेव्हा शिवसेनेची महाराष्ट्रात सत्ता आली त्यावेळी बाळासाहेबांनी एका प्रश्नाच्या उत्तरात असे म्हटले होते की, आपल्या शत्रुला प्रतिक्रिया देण्यासाठी नेहमी सज्ज राहावे लागते. हा शत्रू कुणीही असू शकतो तो सरकारमधील व्यक्ती असू शकतो, तो महाराष्ट्रातील असू शकतो, महाराष्ट्राबाहेरील असू शकतो. हिंदू-मुस्लिम, कम्युनिस्ट, काँग्रेस किंवा दक्षिणेतील उडुपीवालेही असू शकतात. त्यांनी सांगितल्याप्रमाणे सध्या महाराष्ट्राबाहेरील तत्व मातोश्रीला म्हणजेच शिवसेनेच्या शक्तीला आव्हान देत आहेत. त्यांनी त्यावेळी एक गोष्ट सांगितली नव्हती ती म्हणजे शिवसेनेला त्यांच्या कुटुंबातीलच कुणी आव्हान देईल. सध्या हे ही घडले आहे. शिवसेनेची महाराष्ट्रात शक्ती एकदम वाढली नाही. तिच्या स्थापनेवेळी तिचे लक्ष दक्षिणेतील लोक होते. ज्यांना ते लुंगीवाले म्हणायचे पण त्यावेळी सेना मुंबईपुर्ती मर्यादित होती. मुंबईत महापालिकेच्या निवडणुकीत जेव्हा सेनेला विजय मिळाला त्यावेळी महापौरपदासाठी शिवसेनेच्या उमेदवाराला विजय मिळवून देण्यात त्यावेळच्या मुस्लिम लीगने सेनेला समर्थन दिले होते. सेनेने महाराष्ट्राबाहेर विस्तार करण्याचे ठरवले आणि त्यावेळेला महाराष्ट्रातील ठिकठिकाणी जे दंगे होत राहिले, भिवंडी, जळगाव, औरंगाबाद, मुंबई, बीड इत्यादी मोठमोठ्या शहरांमध्ये जसजसे दंगे पेटले तस-तसे सेनेची ताकत वाढत गेली. त्या विस्ताराच्या उपयोगानंतर सेनेने विधानसभा निवडणुकीत भाग घेऊन भाजपाशी युती करून राज्यात प्रथमच सत्ता काबिज केली. सेनेच्या बळावरच मग भाजपाने महाराष्ट्रात आपले पाय रोवले. गेल्या निवडणुकीत शिवसेना बरोबर निवडणुका लढवल्या आणि त्या जिंकल्यापण. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदावर आपला ह्नक सांगताच या दोघांबद्दल इतका दुरावा निर्माण झाला की त्याची सीमा नाही. हे बऱ्याच प्रमाणात शत्रुत्वदेखील बदलत आहे की काय असे सध्याचे चित्र आहे. सेनेशिवाय भाजपाला महाराष्ट्रात सत्ता काबिज करणे कठीण आहे हे समजल्यावर आता भाजपाने त्याच सेनेत बसलेल्या आणि नंतर बाहेर पडलेल्या मनसेचे हात धरले आहेत आणि एवढेच नाही तर त्याद्वारे राज्यात सांप्रदायिक शांततेला धोका निर्माण करून शिवसेनेच्या पाऊलावर पाऊल ठेऊन जिथे दंगे तिथे भाजपाचा फायदा अशी याची रणनीती आहे. म्हणजे ती शिवसेना असो की मनसे, मुळ सेनेशिवाय भाजपाला गत्यंतर नाही.