राज्यात गणेशोत्सवावर ध्वनीबंदीचा सावट: डीजे, भोंग्यांना कडक नियम!

राज्यात गणेशोत्सवावर ध्वनीबंदीचा सावट: डीजे, भोंग्यांना कडक नियम!

मुंबई, 7 ऑगस्ट 2025: यंदा गणेशोत्सव 27 ऑगस्टपासून सुरू होत आहे. गणपती बाप्पाचे आगमन 11 दिवस अगोदर होत असल्याने मुंबईसह राज्यातील गणेश मंडळे स्वागतासाठी सज्ज झाली आहेत. राज्य सरकारने गणेशोत्सवाला "राज्य उत्सव" म्हणून मान्यता दिल्याने मंडळांमध्ये उत्साह दुप्पट आहे. पण यंदा नॉईज पोल्युशन नियमांमुळे उत्सवावर काही मर्यादा आल्या आहेत.

          सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, आवाजाच्या पातळीवर कडक निर्बंध आहेत. रहिवाशी भागात 55 डेसिबल, वाणिज्यिक भागात 65 डेसिबल, औद्योगिक भागात 75 डेसिबल आणि सायलेंट झोनमध्ये 45 डेसिबलपेक्षा जास्त आवाजाला परवानगी नाही. 21 जुलैपासून पोलिसांनी या नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली आहे. मशिदी, मंदिरे, गुरुद्वारे, बौद्ध विहार यांसारख्या धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आले आहेत. नियम मोडल्यास तीन वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते, अशी तंबी पोलिसांनी दिली आहे.

        यामुळे गणेशोत्सवात डीजे, ढोल-ताशे, बँड आणि साऊंड सिस्टमच्या वापरावर मोठी बंधने आली आहेत. मंडळांना या वाद्यांसाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे. याचा परिणाम ढोल-ताशे, साऊंड सिस्टम पुरवठादार आणि डीजे व्यवसायिकांवर झाला आहे. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर बनला आहे.

         मंडळांनी सजावटीवर विशेष लक्ष दिले आहे. पर्यावरणपूरक आणि सामाजिक संदेश देणाऱ्या थीम्स यंदा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहेत. काही मंडळांनी नॉईज पोल्युशनच्या जागरूकतेवर आधारित सजावट निवडली आहे. मिरवणूक आणि विसर्जनासाठी मंडळे स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधत आहेत.

            पोलिसांनी मंडळांना आवाजाची पातळी कमी ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे यंदा गणेशोत्सवात पारंपरिक उत्साह कायम ठेवताना नॉईज पोल्युशन नियमांचे पालन करणे पोलिस आणि मंडळांसाठी आव्हान ठरणार आहे. गणेश भक्तांमध्ये बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता शिगेला आहे, पण शांततामय उत्सवासाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.