वक्फ मालमत्ता बळकावणार्‍यांवर गुन्हा दाखल न केल्यास मरेपर्यंत उपोषणाची धमकी

वक्फ मालमत्ता बळकावणार्‍यांवर गुन्हा दाखल न केल्यास मरेपर्यंत उपोषणाची धमकी

औरंगाबाद (प्रतिनिधी):  शहरातील सिटी चौक या मुख्य बाजार पेठ स्थित दरगाह शाह बेरिया या वक्‍फ संस्थेची चार मजली वक्फ मालमत्ता अवैधरित्या बळकावणाऱ्यांचे विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला नाही तर या दरगाहशी हितसंबंध असलेले मोहम्मद अज़हर खान यांनी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर  २६ एप्रिल पासून मरेपर्यंत उपोषण करण्याची धमकी दिली आहे.
     मो. अझहर खान यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या सरळ निगराणीतील दरगाह शाह बेरिया या संस्थेची सिटी चौकात चार मजली इमारत आहे. ही मालमत्ता सन २०१४ मध्ये ११ महिन्यासाठी भाडेकरारावर विक्रम प्रेमचंद सुराणा यांना देण्यात आली होती. सन २०१५ मध्ये त्यांचे निधन झाले. ही बाब त्यांचे वारस मुलगा आयुष सुराणा आणि पत्नी यांनी वक्फ मंडळास कळविलीही नाही आणि परतही केली नाही. लबाडीने आपला आर्थिक लाभ करून घेण्यासाठी त्यांनी परस्पर ही मालमत्ता शेजारील दुकानदार ऑनेस्टी ड्रेसेस आणि ज़हीनी ड्रेसेस चे मालक अज़ीज़ ज़हीनी आणि रज़्ज़ाक ज़हीनी यांच्या ताब्यात दिली. ही बाब अज़हर खान यांनी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिस शेख तसेच मंडळाचे चेअरमन आमदार वजाहत मिर्झा, मंडळाचे सदस्य खासदार इमतियाज जलील, खासदार फौजिया खान सह इतर सर्व सदस्यांचे निदर्शनास आणून दिली. तसेच मंडळाने ही मालमत्ता या अतिक्रमणकर्त्यांकडून परत घ्यावी व त्यांनी केलेल्या फौजदारी गुन्ह्यासंबंधी त्यांचे विरुद्ध कलम ४२०, ४४८, १२०-ब, ३४, १०९ आयपीसी सह कलम ५२-अ वक्फ अधिनियमांतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. व सतत त्याचा पाठपुरावा करीत आहेत. या मागणीसाठी त्यांनी मागील वर्षात ऑक्टोबर महिन्यात ३ दिवस आमरण उपोषण केले होते. त्यावेळी त्यांना गुन्हेगारांविरुद्ध कारवाई केली जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु आश्वासनानुसार वक्फ मंडळाने या गुन्हेगारांचे विरुद्ध अद्यापही फौजदारी गुन्हा दाखल केला नाही. अशाच प्रकारे अतिक्रमण करणाऱ्या महाराष्ट्रातील काही ठिकाणी वक्फ मंडळाकडून गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु या प्रकरणात जाणून बुजून गुन्हेगारांना सहाय्य करण्याच्या हेतूने वक्फ मंडळाकडून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येत नाही. कुठे तरी पाणी मुरत असल्याची शंका येत आहे.  फौजदारी गुन्हा घडल्याचे एखाद्या नागरिकांच्या निदर्शनास आले तर त्याची तक्रार पोलीस स्टेशनला देणे बंधनकारक असल्याने त्यांनी  सिटी चौक पोलीस स्टेशनलापण  एफ आय आर दिली.  परंतु त्यांनीही गुन्हा दाखल केला नाही. पोलीस आयुक्तांना भेटून एफ आय आर दीली. त्यांनी पण गुन्हा दाखल केला नाही. आता विक्रम प्रेमचंद सुरणाचे वारस आणि ऑनेस्टी व ज़हीनी ड्रेसेसचे मालकांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला नाही तर दिनांक २६ एप्रिल पासून वक्फ मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कार्यालयासमोर मरेपर्यंत उपोषणास बसणार असल्याचे त्यांनी सांगितले.