महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा वापर आणि जाहिरातींचा प्रभाव

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा वापर आणि जाहिरातींचा प्रभाव

    सन 2024 ची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावाखाली येणारी एक महत्त्वपूर्ण निवडणूक ठरणार आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे निवडणूक प्रचाराच्या पद्धतीत बदल झाला आहे, आणि विशेषतः सोशल मीडियाने यामध्ये एक मोठी भूमिका बजावली आहे. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप, यूट्यूब, आणि नव्याने उदयास आलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून राजकीय पक्ष आपल्या संदेशाचं प्रसारण करत आहेत. त्यामुळेच या माध्यमांचा निवडणुकीवर झालेला प्रभाव विचारात घेणे महत्त्वाचे आहे.

सोशल मीडियाचा वापर: प्रचाराची नवीन दिशा
      सोशल मीडिया वापरातून आता राजकीय पक्ष आणि नेते थेट जनतेपर्यंत पोहोचू शकतात. हे माध्यम लोकांपर्यंत अतिशय वेगाने पोहोचत असल्याने, पक्ष आणि उमेदवार यांचा थेट संवाद अधिक सुलभ झाला आहे. या माध्यमांचा वापर करून पक्ष आपली घोषणा, भूमिका, कार्यक्रम, योजनांचे अपडेट्स, आणि नवीन संकल्पनांचा प्रचार करता येतो. सोशल मीडिया हे पारंपारिक माध्यमांच्या तुलनेत अधिक वेगाने कार्यरत असल्याने, निवडणूक प्रचाराचा गतीमान परिणाम साधला जातो.


      सोशल मीडिया वापरून प्रचार करताना उमेदवार थेट लोकांशी संवाद साधत आहेत, प्रश्नांना उत्तरे देत आहेत, तसेच आवड-निवडींवर आधारित सामग्री देत आहेत. या माध्यमातून लोकांशी संवाद साधताना उमेदवाराचे व्यक्तिमत्त्व, विचारधारा, आणि लोकांशी असणारे संबंध समोर येतात, ज्याचा निवडणूक निकालांवर परिणाम होतो. लोकांनी उमेदवाराचा आणि त्याच्या विचारांचा आढावा घेण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करणे वाढत आहे.

सोशल मीडियावर जाहिरातींचा प्रभाव
        निवडणुकीत सोशल मीडिया जाहिरातींचा प्रभाव वाढता आहे. राजकीय पक्ष आणि उमेदवार सोशल मीडियावर जाहिराती देऊन आपली उपस्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. जाहिरातींचा वापर करून संदेश अधिक वेगाने पोहोचतो आणि निश्चित लक्षित गटांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचता येतो. त्यातून पक्षांची नावे, घोषणापत्रे, विकास योजनांचा प्रसार अधिक लोकांपर्यंत प्रभावीपणे होतो.
      अधिक लक्षवेधी जाहिरातींसाठी विविध माध्यमांतून लोकांना आकर्षित करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. ग्राफिक्स, व्हिडीओज, छोटी माहितीपट, संक्षिप्त संवादी संदेश इत्यादींचा वापर करून संदेश अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवला जातो. या माध्यमातून सकारात्मक व प्रतिकूल, दोन्ही प्रकारचे प्रभाव उमेदवारांवर पडू शकतात. सकारात्मक जाहिरातींमुळे मतदारांचा विश्वास मिळतो, तर विपरित प्रचारामुळे प्रतिस्पर्ध्याचा समाजात नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

मतदारांवर होणारा परिणाम
       सोशल मीडियाच्या माध्यमातून होत असलेल्या प्रचाराचा मतदारांवर मोठा परिणाम होतो. निवडणुकीच्या काळात मतदारांनी सोशल मीडियावर उमेदवारांचे अपडेट्स, कार्यक्रम, घोषणा पाहण्याचा कल वाढला आहे. विशेषतः तरुण मतदार सोशल मीडियावरून उमेदवारांचे विचार, मुद्दे, आणि भूमिका समजून घेण्यास उत्सुक असतात. या माध्यमातून होणारे थेट प्रसारण, मतदारांच्या प्रतिक्रिया, चर्चासत्रं, इत्यादींमुळे मतदारांना आपली भूमिका ठरवण्यासाठी माहिती उपलब्ध होते. यामुळे मतदारांचा निर्णय अधिक प्रभावी होण्याची शक्यता वाढते.

संभाव्य आव्हाने आणि मर्यादा
        सोशल मीडियाचा प्रभाव जितका सकारात्मक आहे तितकेच काही आव्हानेही आहेत. सोशल मीडियावर फेक न्यूज किंवा अफवा पसरवणे हे एक गंभीर आव्हान आहे. खोटी माहिती, दिशाभूल करणारे पोस्ट, आणि भावनिक उत्तेजनामुळे मतदारांवर विपरित परिणाम होऊ शकतो. सोशल मीडियाच्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे हे संदेश अगदी वेगाने पसरतात, ज्याचा समाजात नकारात्मक प्रभाव पडू शकतो.
        शिवाय, सोशल मीडियाच्या वापरासाठी मोठ्या प्रमाणात वित्तीय गुंतवणूक आवश्यक असते. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवार किंवा पक्ष यांना या माध्यमाचा संपूर्ण लाभ घेणं कठीण होऊ शकतं. त्यामुळे असमान संधी निर्माण होऊन प्रचारात विषमता येऊ शकते.

निष्कर्ष
      सन 2024 मधील महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा वापर एक महत्त्वाचा घटक ठरणार आहे. यातून प्रचार अधिक प्रभावीपणे साधता येणार असला तरी, याचे योग्य नियोजन आवश्यक आहे. पारदर्शकता, सत्यता आणि सामाजिक जबाबदारीच्या माध्यमातून सोशल मीडियाचा वापर करून प्रचार केला पाहिजे. तसेच, निवडणूक आयोगाने या माध्यमांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशिष्ट नियमावली तयार करणे गरजेचे आहे, जेणेकरून निवडणुकीत असमानता आणि दिशाभूल रोखता येईल.
      अशा प्रकारे, सोशल मीडिया हे निवडणूक प्रचारात महत्त्वाचे साधन बनले असून त्याचा योग्य वापर मतदारांना योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करू शकतो.

- डॉ. रियाज़ देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त (सेनि), औरंगाबाद