वर्ल्डक्लास भाभी : अमरावतीची धुयमाती - बुरा ना मानो होली है।
मागच्या होळीले आष्टीकरभाऊले पुलाखाली बोलावून साक्षीनं अजब धुयमाती खेळली होती. तशी धुयमाती यावर्षी खेळता येते का, याचा विचार ‘युवा’ स्वाभिमानच्या कोअर कमिटीचे ‘वृद्ध’ सदस्य नीळकंठराव अन् जयंतराव करीत होते. पण मागच्या धुयमातीनंतर वातावरण शांत होईपर्यंत रवीभाऊले दिल्लीत रहा लागले. तशी नौबत येऊ न देता, यंदाचा फंडा काय ठेवावा, याचा काथ्याकुट सुरू असताना रवीभाऊ अन् नवनीत भाभी दिल्लीवरून टपकल्या. नीळकंठराव, जयंतरावांचे प्लॅनिंग ऐकून रवीभाऊने थकल्या स्वरात गावात धुयमाती खेळाले स्पष्ट नकार दिला. ‘मै मेलघाटकी बेटी हूँ, मै इस बार भी रवी के साथ मेलघाट ही जाऊंगी’, असे म्हणत नवनीत भाभीने, ‘नवनीत नाम सुनके क्या लगा, प्लॉवर है, प्लॉवर नही, फायर है, क्या फायर...’हा ‘पुष्पा’चा डायलॉग फेकला अन् त्या घरात निघून गेल्या.
प्रत्येकवेळी हो म्हणणारे रवीभाऊ धुयमाती खेळासाठी नाही का म्हणत आहे, असा प्रश्न अंगणात बसलेल्या जितू, विनोद, नितीन, भाईजी, सचिन, नीलेश यांना पडला. भाऊ नाही म्हणते तं आपलं कसं होईन या विचाराने ते भाऊजवळ गेले. रवीभाऊ म्हणाले, पहा रे गडे हो... आपल्याले 'साडेसाती' लावून घ्यायची नाही. मले हनुमान चालिसा म्हणता येत नाही, नवनीतले हनुमानाचे नाव माहित नाही, ते कॅमेर्यावाल्यांनी अख्ख्या भारताले दाखवून आमचा ‘भाजीपाला’ केला. राजभाऊच्या आदेशाने आम्ही गावभर ‘दिलसे’ भोंगे वाटले अन् वाजवले, पण त्याचा कवडीचा फायदा झाला नाही. उद्धवजीच्या रुपाने महाराष्ट्राले साडेसाती लागली, असे सांगत हनुमान चालिसा म्हणण्यासाठी मुंबईत गेलो तर आमाले 14 दिवस ‘अंदर’ रहा लागलं. नवनीतच्या मानेचं सिटीस्कॅन करा लागलं. त्याचा एक फोटो काय काढला तं बदनाम व्हा लागलं. कोणीच कामी आलं नाही. त्याच्या अगोदर नुसतं मुंबईले मातोश्रीसमोर जातो म्हटलं तर आरतीबाईनं अडवून ठेवलं. तिच्यावर हक्कभंग आणण्यासाठी दिल्लीत जंगजंग पछाडलं, बोंबलून बोंबलून थंडे झालो, पण आरतीबाईचं काहीच काय आपल्याच्यानं साधी बदली पण झाली नाही. ज्यांच्यासाठी दिल्लीपासून गल्लीपर्यंत रान उठवलं, त्या देवेंद्र भाऊनं माह्यासाठी मंत्रिपदाची माळ सागर बंगल्यात कुठं लपवून ठेवली, ती दिसून नाही राह्यली. बंगल्याचा उंबरठा झिजवून थकलो. पण पदरात काहीच पडलं नाही.
नवनीतले ‘तारीख पे तारीख‘ देऊन व्हेंटीलेटरवर हँगिंग ठेवलं आहे. इकडून तिकडून दहीहंडीचा कार्यक्रम घेतला तर चंद्रशेखरभाऊच्या (केरॉन पोलार्ड) डोळ्यात खुपला. बडनेरासकट अख्ख्या जिल्ह्यात कमळ चिन्हच राहीन, असे सांगून त्यांनी आफत करून ठेवली. नवनीतचं ठिक आहे, पणे मलेही येसन घालतो म्हणते. तिकडे बेलोरा-अचलपूरात जरासा किराणा काय वाटला तर बच्चू माह्या कोथळा काढतो म्हणते. सारेच जण खोके, खोके म्हणते. म्या एकदा काय म्हटलं त एवढी मिरची लागली की थेट देवेंद्रभाऊ, एकनाथभाऊसमोर उभ केलं. एकटा माणूस काय-काय करीन. जरासं तोंड वर काढला का बत्ती बसते. मी पहिलेच परेशान आहे. त्यात आता नवीन लोचा नको. तुम्हीच काय ते ठरवा. मले बजेटसाठी दिल्लीले जायचं आहे, असे म्हणून तेसुद्धा निघून गेले.
विहिंप, बजरंगदल, भाजपवाल्यांनी रामनवमी जोरदार केली. भाभीनंसुद्धा ‘मान न मान मै तेरा मेहमान म्हणत’, भरचौकात भगवा फडकवला. हनुमान चालिसा जिकडे, तिकडे सुरू असल्याने काँग्रेसच्या नीलेश, पंकजभाऊले जोर चढला. त्यांनी ‘डंके की चोटपर’ हनुमान जयंती साजरी केली. तेहतीस कोटीपैकी एक हनुमान काय हिसकला, तर भाजपले मिरची झोंबली. हे काँग्रेसचे पुतनामावशीचे प्रेम आहे, असे तुषारभाऊ म्हणत त्यांनी पिचकारी उघडली.
तिकडे गावखेड्यात चिखल तुडविणार्या पवनीतबाई म्हणाल्या, तुमच्या धुयमातीत मले काही इंटरेस्ट नाही. मी काही तुमच्या नादी लागाले आरतीबाई नाही. इकडे, जिकडे-तिकडे पाणी घुसले आहे. घर पडले, भिंती पडल्या, लोकं परेशान हायेत. माही 'प्रायोरिटी' गावगाडा सांभाळाची हाये, असे म्हणून त्यांनी धुयमाती खेळाले नकार दिला. ते ऐकून, चुलित घाले बे ते, ‘कोई जरूरत नही उसकी, हमारी खुद की पानटपरी है’, असे म्हणत बच्चूभाऊनी मतदारसंघाची वाट धरली. बच्चूभाऊचा रोख एकनाथभाऊनं पाह्यला. यायले किती दिवस तडफडत ठेवायचा, याचा विचार केला. देवेंद्रभाऊ म्हणे, चिंता करू नका, आम्ही विदर्भवाले तुकडा समोर पडला की शांत होतो. शे-पाचशे कोटीचं एखादा काम मंजूर करून टाका, आपोआप शांत होते. बच्चूभाऊ म्हणे हद झाली. जिथ जातो, तिथं लोक खोके, खोके म्हणते. आम्ही गुवाहाटीले विकासासाठी गेलो होतो, पण लोक ऐकून घेत नाहीत. आता सगळे भूंकणारे नेपाळले नेऊन टाका, तिथ भाव चांगला भेटते, असा प्रस्ताव एकनाथभाऊला देऊन अमरावतीकडे निघाले. मार्गात धाराशिव येथे 'तुम्ही गद्दार आहात, डाकूसोबत गेले. याच्यासाठी तुम्हाले निवडून दिले काय', असे म्हणत आजोबांनी त्यांचा रस्ता रोखला. त्याने ते तिथचं अडून पडले. कुठे झोपले, कधी उठले माहित नाही. सकाळी धामधुमित मोटारसायकलने त्यांना ठोकले. तेथून दवाखान्यात जाऊन पडले. मोटारसायकलवाला कोण, ठाणेदार म्हणे हमको कुछ नही पता!
अधिवेशनात मुद्दे पाहिजे म्हणून पश्चिम महाराष्ट्र सोडून अजितदादा मेळघाटात पोहोचले. पण तैले कुठचं कोरड धरण दिसलं नाही. आता आपली पोलखोल होते की काय, असे समजून त्यापाठोपाठ सत्तारभाऊ मुक्कामी पोहोचले. राजकुमारभाऊच्या खांद्यावर हात ठेवून ‘ये मिठा है, वो कडू है’, असे म्हणून त्यांनी गुलाल चालत नसल्याने बच्चू भाऊचा चेहरा समजून जखमेवर मिठ चोळले. सकाळी झोपेतून उठता उठता नवनीत भाभी लव्हजिहादचे कारण सांगत राजापेठ ठाण्यात पोहोचल्या. तिथं त्यांनी बेजा दांगडो केला. माह्या फोन रेकॉर्ड का केला, असे म्हणून ठाणेदारावरच फायरिंग सुरू केली. तिकडे कठोरामार्गावरील कॉलेजमध्ये बसून प्रवीणभाऊ ही सगळी नौटंकी पाहत होते. देवेंद्रभाऊंनी पहिलेच आपल्याले दूर लोटले आहे, अजून खाजवून घेण्यात मतलब नाही, असे म्हणत त्यांनी कचर्याचा मुद्दा उकरून काढला. कमिटीत ‘टॉप टू बॉटम’ अन् ‘ए टू झेड’ कचरा खातात, माह्याजवळ रेकॉर्डींग असल्याची फटकार त्यांनी आष्टीकरभाऊले लगावली. अनुराधा वहिनी म्हणाल्या... अहो तुमचा सध्या बॅड पॅच चालू आहे, काहीही केलं तरी काहीच फरक पडणार नाही. त्यापेक्षा आपली संस्था सांभाळा, काहीच नसताना त्या गोडे भाऊजीनं एमबीबीएस कॉलेज आणलं, इथ एवढं असूनसुद्धा तुम्ही आयुर्वेदीक कॉलेज घेऊन बसले. नुसतं घ्याचचं पाह्यता, लोकांना द्या पण लागते. जमाना कुठं चालला, तुम्ही कुठं चालले, समजूत घेत चला, पहिले आपल्या आजूबाजूचा कचरा साफ करा, हे ऐकून श्रेयस गालात हसला अन खेळाले निघून गेला.
बाहेरच्या लोकांना पक्षात स्थान दिल्यानं पक्ष कमजोर होत असल्याची हाकाटी यशोमतीताईने दिली. तोच सुनीलभाऊले गुदगुल्या झाल्या. नानाभाऊ म्हणे, यापुढे पक्षाच्या बाहेरच्या लोकांना आपल्या सोबत खेळू द्यायच नाही. यावरून त्यांचात धुळफेक सुरू झाली. बबलूभाऊंनी बळवंताभाऊचं नाव जाहीर करून आणखी एक धमाका केला. हे ऐकून सुलभाताईचा तिळपापड झाला. मी किती पक्षनिष्ठ आहे, याचा पाढाच त्यांनी वाचून दाखविला. पण यशोमतीताई ऐकाले तयार नव्हत्या. त्यांनी राहुलभाऊच्या सभेची शेगावात जंगी तयारी केली. त्या तयारीनं राहुलभाऊच्या पदयात्रेचा अख्खा थकवा गायब केला. आता नानाभाऊची जागा भेटते का, दिल्लीत बढती भेटते, याची हुरहुर ताईले लागली. तोच तिकडे वरूडमधून देवेंद्रभाऊले जाग आली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला हात लावला तर हात छाटून टाकीन, अशी डरकाळी त्यांनी अवकाळी फोडली. कुठं या लागते, असे म्हणत विक्रमभाऊ पिचकारी घेऊन केदार चौकात पोहोचले, पण देवेंद्रभाऊ गायब.
तिकडे विद्यापीठात अकोल्याचे रणजितभाऊ आणि बुलडाण्याचे धिरजभाऊ तुफान भिडले. रणजितभाऊंच्या दीड लाखांच्या दाव्याचा फज्जा झाला अन् धीरजभाऊंनी बाजी मारली. त्याचा झटका सुनीलभाऊले बसला. फुकटात नाही म्हणून बसलो अन् चान्स गमावल्याचे मिलिंदभाऊ सुनीलभाऊंच्या कानात म्हणाले. सुनीलभाऊनं विद्यापीठात जाले होकार द्यावा, यासाठी देव पाण्यात बुडवून ठेवलेल्या सुलभाताईनं पुन्हा ते देव बाहेर काढले.
विद्यापीठातील वार्ता ऐकून धामणगावच्या प्रतापभाऊंनी टोपे नगरच्या किरणभाऊना फोन लावला. हा निकाल कसा काय आला,असे म्हणत याच्यावर मंथन करण्यासाठी 'एलजीबीटीक्यूआयए प्लस' संमेलन तातडीने घेतलं गेलं पाहिजे असं सूचवलं. त्या प्रस्तावाले किरण भाऊने होकार दिला. राधानगरवाले संजयभाऊ म्हणे आपल्या नशीबात राजयोग नाही. मी दादासोबत टिव्हीवर दिसतो, तेवढचं माह्यासाठी खूप आहे. बबलूभाऊ म्हणे तुमचं अन् माह्य सारखचं आहे. फक्त तुम्ही टिव्हीत दिसता, मी पेपरात फोटो पाहून खुश होतो.
इकडे राजकमल चौकातल्या कमिटीसमोर मुन्नाभाऊ, ज्ञानेश्वरभाऊ, रामाभाऊ जोरजोरात ओरडत होते. मल्टीप्लेक्स साठी 120 कोटीची जमीन 12 कोटीत देऊन शहराचे नुकसान होत असल्याचे ते बेंबीच्या देठापासून बोंबलून सांगत होते. पण पण चौथ्या मजल्यावर जाऊन बसलेल्या आष्टीकरभाऊपर्यंत त्यांचा आवाजच पोहोचत नव्हता. ते तिथूनच ‘सुपर ओव्हर’ खेळत होते. कोटी-कोटीची बोली असलेला एकेक चेंडू मर्सिडिज-बेंझ, फरारी, रोल्स रॉयसच्या गतीने टोलवत होते. त्यांच्या एका शॉटने शहर बस सेवेचा तर दुसर्या शॉटने साफसफाईच्या कंत्राटाचा सफाईदारपणे चुराडा केला. त्याच्यावर तुषारभाऊ एकटेच तुफान टाळ्या वाजवत होते. आष्टीकरभाऊंचा हा भन्नाट खेळ पाहून शिवटेडकीवरून बोंडेभाऊ म्हणाले, ए शहाण्या, मूर्ख आहे का?, आष्टीकरभाऊ म्हणे, मी मूर्ख नाही. माह्य रिटायरमेंट हाये, आता चान्स हाये तं खेळून घेतो. कोटींचा हा शब्द ऐकून दिल्लीत बजेटसाठी गेलेल्या नवनीत भाभीनं अमरावतीच्या दोन्ही रेल्वेस्थानकासाठी 6,200 कोटी मंजूर झाल्याची गुगली फेकली. वार्ताकारांनी ती झेलली. ‘नो बॉल’ आहे की ‘वाईड बॉल’ आहे, याची कोणतीही खातरजमा न करता त्याले आपापले लेबल लाऊन ‘ब्रेकींग’ केली. काही जण म्हणे का, अमरावती स्टेशन ‘इंटरनॅशनल’ अन् बडनेरा स्टेशन ‘वर्ल्डक्लास’ होणार आहे. संडासबाथरूममध्ये सोन्याचा पत्रा लावला जाणार आहे. माणूस स्टेशनवर गेला का त्याले काहीच करा लागणार नाही, मशीन त्याले थेट डब्यात घेऊन जाईन, मशीनच पाणी आणून देईन. मशीनच संडासबाथरूमले घेऊन जाईन. प्रत्येक कम्पार्टमेंटमध्ये एलसीडी राहिनं, प्रत्येकाचा फोन सॅटेलाईटशी कनेक्ट होईनं, अशा चर्चा चौकाचौकात सुरू होत्या. दिल्लीतील रेल्वेचालक अश्विनीभाऊ म्हणे अख्ख्या महाराष्ट्राले 13,539 कोटी दिलेे. त्यातून 1685 कोटींतून नवीन रेल्वेलाईन टाकणार, 1400 कोटी रेल्वेरुळांच्या नविनीकरणासाठी खर्च करणार, 776 कोटी ग्राहक सुविधेसाठी तर 237 कोटी सिग्नल व दूरसंचारची कामे करण्यासाठी खर्च करणार आहे. एकट्या अमरावतीला 6200 कोटी दिल्याचे मी कधी म्हटलेच नाही. दुसर्याच्या तोंडावर आपण बोट कसं ठेवावं. ज्याचा हात तुटनं त्याच्या गळ्यात पडनं, आपल्याले काही देणं-घेणं नाही. अश्विनभाऊच बोलणं होते न होते तोच मुंबईहून सुषमाताईची तिळगुळ ट्रेन धाडधाड करीत बडनेर्यात पोहोचली. ‘इलाका तुम्हारा, धमाका हमारा’ म्हणत त्यांनी आठवडी बाजारात व्हिडीओ लावले. पोट्ट्यांनी त्याच्यावर भलकशा शिट्ट्या वाजवल्या. माहौल करून टाकला. सुषमाताईनं नवनीत आक्कावर आरोपाच्या डांबराचा अख्खा टँकर उलटविला. त्याने भय्या-भाभीची बोलती बंद झाली. ‘व्हलेंटाईन डे’चा चढलेला खुमार पुरता उतरला. सकाळ होताच भाभी अन् भाऊंनी चांगलं चुंगल खाऊंन व तजेलदार होऊन मेळघाटचा रस्ता पकडला. भाभी ‘गाजली’ नृत्यावर थिरकू लागल्या तर रवीभाऊंनी नरेंद्रभाईच्या स्टाईलने ढोलकी वाजवून साथ देत होळी साजरी केली.
बुरा न मानो होली है।
-गोपाल रा. हरणे, वरिष्ठठ पत्रकार
अमरावती.
9422855496