त्या सरपंचाविरुद्ध BDO ची चिल्लर तक्रार : मात्र पोलीसांनी स्वतःहून बनविला दखलपात्र गुन्हा.
फुलंब्री : 1 एप्रिल : 31 मार्च रोजी रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरी मंजूर करण्यासाठी पंचायत समिती फुलंब्रीचे अधिकारी लाचेची मागणी करत आहेत या बाबीच्या निषेधार्थ फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा या गावाचे करून सरपंच मंगेश साबळे यांनी या भ्रष्टाचाराचा भांडाफोड करण्यासाठी आगळ्या वेगळ्या पद्धतीने आंदोलन करीत दोन लाख रुपयाच्या नोटा फुलंब्री पंचायत समिती कार्यालयासमोर उधळल्या. त्याचा व्हिडिओ कालपासून व्हायरल झालेला आहे.
हाच तो व्हायरल व्हिडिओ : येथे क्लिक करून पहा
शासनाने सुद्धा या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी करण्याचे आदेश सोडले आहेत. पंचायत समिती कार्यालयातील भ्रष्ट कारभार सरपंच मंगेश साबळे यांनी दोन लाख रुपयाच्या नोटा उधळत असताना कोण कोण, किती किती, आणि कशा कशा प्रकारे पैशाची मागणी करतो हे सांगितले आहे.
गेवराई पायगा येथील सरपंच मंगेश साबळे यांच्या या पद्धतीने करण्यात आलेल्या आंदोलनामुळे माझी बदनामी झालेली आहे अशी तक्रार फुलंब्री पंचायत समितीच्या BDO श्रीमती ज्योती विठ्ठलराव कवडदेवी वय (46 वर्षे) यांनी फुलंब्री पोलीस स्टेशनला दिली. या बाईने दिलेल्या तोंडी रिपोर्ट मधील नमूद मजकुरानुसार जास्तीत जास्त भारतीय दंडविधानाचे कलम 500 प्रमाणे अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा म्हणजेच NC नोंद करून या बाईला न्यायालयात जाऊन प्रायव्हेट फौजदारी कारवाई करण्याची सूचना पोलिसांनी द्यावयास हवी होती.
परंतु पोलिसांनी आगाऊपणा करीत मंगेश साबळे या सरपंचाचे विरुद्ध या BDO बाईने दिलेल्या रिपोर्टनुसार दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा होत नसताना सुद्धा दखलपात्र स्वरूपाच्या भारतीय दंडविधानाची कलम 188 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमाची कलम 135 या दोन्ही दखलपात्र कलमांचा वापर करीत गुन्हा क्रमांक 125/23 भारतीय दंड विधान कलम 188, 500, 501 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135,110,117 नुसार दाखल केला.
फुलंब्री पंचायत समिती प्रांगणात क्रिमिनल प्रोसिजर कोड चे कलम 144 लागून नसताना भारतीय दंडविधानाचे कलम 188 लागूच होऊ शकत नाही. सरपंच मंगेश साबळे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 37 चे कोणत्याही तरतुदींचे उल्लंघन केले नसताना महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 135 कसे लागू पडते? या दोन्ही कलमांचा पोलिसांनी द्वेष भावनेनेच सरपंच मंगेश साबळे यांना त्रास देण्याचे उद्देशाने वापर केला असल्याचे दिसून येत आहे.
वस्तुतः एखाद्या सरकारी नोकराने एखाद्या इस्माला त्रास देण्याचे उद्देशाने कायद्याचा गैरवापर करीत अशा प्रकारे असत्य दस्तऐवज तयार करणे हे भारतीय दंडविधानाचे कलम 167 नुसार दखलपात्र गुन्हा आहे. BDO बाई तर अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा होईल अशी तक्रार करते. परंतु तिला सहाय्य करण्यासाठी आणि सरपंचाला त्रास देण्याचे उद्देशाने पोलीस स्वतःहून अशा प्रकारे असत्य दस्तऐवज तयार करते म्हणून पोलिसाविरुद्धच भारतीय दंडविधानाचे कलम 167 नुसार गुन्हा दाखल व्हायला पाहिजे.
गेवराई पायगा येथील सरपंच मंगेश साबळे यांचे विरुद्ध दाखल करण्यात आलेला हा खोटा गुन्हा परत घेण्यात यावा या मागणीसाठी आज औरंगाबाद जिल्हा आणि जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर केले. याप्रसंगी राजू सदाशिव खैरनार, नारायण रमेश लोखंडे, विकास विजय जाधव, अप्पासाहेब परसराम जाधव, शंकर माणिक राऊत, सुरज मव्हारे, उमेश फताफले, सोपान काळे, साईनाथ बेडके, भाऊसाहेब चोपडे, तातेराव बोकील, योगेश भगवान मिरगे आदींची उपस्थिती होती.