तहसीलदारावर फसवणुकीचा गुन्हा : सही बनावट, आदेशही बनावट!
केज : केज तालुक्यात महसूल विभागाला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तहसीलदारांची बनावट सही करून अर्धन्यायिक आदेश पारित केल्याप्रकरणी तत्कालीन नायब तहसीलदार आणि सध्या छत्रपती संभाजीनगर कार्यालयात तैनात असलेल्या तहसीलदार आशा वाघ यांच्यावर केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांनी ही तक्रार दाखल केली असून संपूर्ण महसूल प्रशासनात मोठी खळबळ माजली आहे.
बनावट सही करून आदेश! – नायब तहसीलदारांचा ‘असामान्य’ कारभार उघडकीस
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 155 अंतर्गत अर्धन्यायिक अधिकार फक्त तहसीलदारांना दिलेले असतात. मात्र, तत्कालीन नायब तहसीलदार आशा वाघ यांनी स्वतःहून तहसीलदारांचे अधिकार वापरत आदेश पारित करताना तहसीलदारांची बनावट सही करून तो आदेश शासन अधिकाऱ्यांना पाठवल्याचे चौकशीत समोर आले.
फक्त बनावट सहीच नव्हे! तर आदेश थेट ग्रामतलाठ्यांना व्हॉट्सॲपद्वारे पाठवून सातबारा फेरफार करण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही धक्कादायक वास्तव बाहेर आले आहे.
तपासात धक्कादायक खुलासे — फाईल्सही बेकायदेशीररित्या ताब्यात!
तलाठ्याने आदेशावर शंका व्यक्त केल्यानंतर तहसीलदार गिड्डे यांनी “मी असे आदेश दिलेच नाहीत” असे सांगताच प्रकरण फोडले गेले. सखोल चौकशीत आदेशातील सही बनावट असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर पुढे चौकशी केल्यावर आशा वाघ यांनी संबंधित फाईल्स अभिलेख कक्षातून बेकायदेशीरपणे स्वतःच्या ताब्यात घेतल्या असल्याचे उघड झाले.
या गावांना दिले गेले बनावट आदेश
बनावट आदेश खालील चार गावांशी संबंधित असल्याचे समोर आले:
मौजे दहिफळ (वडमाऊली) – गट क्र. 92
मौजे लाडेवडगाव – गट क्र. 58
मौजे नांदुरघाट – गट क्र. 261/2
मौजे वाघेबाभुळगाव – गट क्र. 40/1
या आदेशांच्या आधारे संबंधित नोंदी घेण्यास तलाठ्यांना सांगण्यात आले होते.
कोणते गुन्हे दाखल झाले?
तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या तक्रारीनंतर आशा वाघ यांच्या विरोधात केज पोलिस ठाण्यात गु.र. नं. 673/2025 भा. दं. सं. 318(4), 337, 336(2), 316(2) नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
सरकारी दस्तऐवजांची बनावट प्रत तयार करणे, पदाचा गैरवापर, प्रशासनाची दिशाभूल, फसवणूक — अशा अनेक गंभीर आरोपांखाली हा गुन्हा नोंदला गेला आहे. सध्या तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश क्षीरसागर हे पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.
महसूल विभागाचे विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह!
या बनावट आदेशामुळे केवळ शेतकरीच दिशाभूल झाले नाहीत, तर महसूल विभागातील अधिकारी, तलाठी आणि संपूर्ण प्रणालीवर याचा थेट परिणाम झाला आहे. अर्धन्यायिक प्रक्रियेचे गंभीर उल्लंघन केल्याने संपूर्ण प्रशासन हादरले आहे.
वरिष्ठांकडून आता या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले असून, महसूल विभागातील दस्तऐवज पडताळणी, अंतर्गत नियंत्रण आणि पारदर्शकता आणखी कडक करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
संपूर्ण महसूल यंत्रणा चर्चेत
स्थानिक प्रशासनापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत या प्रकरणाची जोरदार चर्चा आहे. संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता असून महसूल विभागातील विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.