इराण-अमेरिका युद्धामुळे दिग्गज मुस्लिम राष्ट्रांमध्ये वाढती जवळीक; ‘इस्लामिक नाटो’ची चर्चा! गाझात मुलांच्या हत्येबाबत संयुक्त राष्ट्रांचा धक्कादायक अहवाल

इराण-अमेरिका युद्धामुळे दिग्गज मुस्लिम राष्ट्रांमध्ये वाढती जवळीक; ‘इस्लामिक नाटो’ची चर्चा! गाझात मुलांच्या हत्येबाबत संयुक्त राष्ट्रांचा धक्कादायक अहवाल

        ???? संयुक्त राष्ट्र संघाने गाझा-इस्रायल-हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर एक विशेष चौकशी समिती नेमली होती. या समितीने इस्रायलच्या कथित अमानवीय आणि क्रूर कारवायांबाबत सविस्तर अहवाल सादर केला आहे. या अहवालात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. त्यामध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या नेतृत्वाखाली गाझामधील लहान मुलांना जाणूनबुजून लक्ष्य करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

        अहवालानुसार, युद्धादरम्यान सुमारे २१ हजार मुलांचा मृत्यू झाला असून, बेछूट बॉम्बहल्ल्यांमुळे सुमारे ४० हजार मुले अपंग झाली किंवा गंभीर जखमी झाली आहेत. विशेष म्हणजे हा अहवाल सादर करणाऱ्या समितीचे अध्यक्ष भारतीय न्यायाधीश श्रीनिवासन मुरलीधर होते. त्यांच्या प्रामाणिकपणा आणि कर्तृत्वामुळे त्यांनी भारताची मान उंचावली आहे.

        ???? दुसरीकडे, इराण-अमेरिका-इस्रायल संघर्षामुळे मध्यपूर्वेतील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल घडताना दिसत आहेत. जी इस्लामिक राष्ट्रे एकमेकांविरोधात उभी राहायची, ती आता नव्या परिस्थितीत जवळ येताना दिसत आहेत. भविष्यात इस्रायलला सामोरे जाण्यासाठी बलाढ्य मुस्लिम राष्ट्रांच्या एका सामूहिक सुरक्षा संघटनेची, म्हणजेच ‘इस्लामिक नाटो’ची संकल्पना चर्चेत येत आहे. या घडामोडींमुळे नेतन्याहू आणि त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

        ???? २८ फेब्रुवारी २०२६ पूर्वी अमेरिका आणि इस्रायलने कदाचित कल्पनाही केली नसेल की काही महिन्यांनंतर त्यांना इराणसारख्या देशासमोर चर्चेच्या टेबलावर यावे लागेल. सैन्यशक्तीच्या तुलनेत इराणची अमेरिकेशी बरोबरी करणे अवघड मानले जात असले तरी, इराणने या संघर्षात अपेक्षेपेक्षा अधिक प्रभावी प्रतिकार केल्याचे अनेक विश्लेषकांचे मत आहे.

        इराणने अमेरिकेच्या काही महत्त्वाच्या संरक्षण व्यवस्थांना आव्हान दिले. युद्धादरम्यान अमेरिकेच्या सामरिक प्रतिष्ठेला धक्का बसल्याची चर्चा झाली. इराणमध्ये सत्ताबदल घडवून आणण्याच्या आणि त्याच्या अणुकार्यक्रमाचा पूर्णतः नायनाट करण्याच्या घोषणा करणारे तत्कालीन अमेरिकन नेतृत्व युद्धानंतर अपेक्षित उद्दिष्टे साध्य करू शकले नाही, अशी टीका करण्यात येत आहे. परिणामी, शेवटी चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा मार्ग स्वीकारावा लागला.

       ???? युद्धापूर्वी इराणचे पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि तुर्कीसारख्या प्रभावशाली मुस्लिम राष्ट्रांशी संबंध तणावपूर्ण होते. अनेक दशकांपासून मध्यपूर्वेतील प्रभावासाठी विविध गटांमध्ये स्पर्धा सुरू होती. सौदी अरेबियासह कतार, ओमान, संयुक्त अरब अमिरात आणि बहरीन यांसारखी राष्ट्रे अमेरिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात अवलंबून होती.

       मात्र, अलीकडील संघर्षानंतर या देशांच्या धोरणांमध्ये काही प्रमाणात बदल होत असल्याचे निरीक्षकांचे मत आहे. अमेरिकेची सुरक्षा हमी कितपत प्रभावी आहे, याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. त्यामुळे काही अरब राष्ट्रांनी इराणशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसत आहे.

       इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांनी जिनिव्हा करारानंतर कतार आणि पाकिस्तानला भेट दिली. तसेच सौदी नेतृत्वासोबतही विविध द्विपक्षीय विषयांवर चर्चा झाल्याचे वृत्त आहे. या घडामोडींमुळे पाकिस्तान, इराण, तुर्की आणि इजिप्त यांच्यातील सहकार्य वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

       ???? गाझामधील संघर्ष सुरू असताना इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांनी मुस्लिम राष्ट्रांनी एकत्र येण्याचे आवाहन केले होते. आजच्या घडामोडी पाहता, त्या आवाहनाला काही प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे. भविष्यात मुस्लिम राष्ट्रांमध्ये अधिक मजबूत सामरिक आणि राजनैतिक सहकार्य निर्माण झाले, तर त्यातून ‘इस्लामिक नाटो’सारखी संकल्पना वास्तवात उतरू शकते, असे काही तज्ज्ञांचे मत आहे.

        एवढे मात्र निश्चित की मध्यपूर्वेतील बदलती समीकरणे येत्या काळात जागतिक राजकारणावर मोठा प्रभाव टाकू शकतात.

(जयहिंद)

✍️ अशफाक शेख
वरिष्ठ पत्रकार, सहारा समय,
संभाजीनगर (औरंगाबाद)