धार्मिक असहिष्णुतेचा वाढता धोका: अल्पसंख्याक धर्मीय प्रार्थनास्थळे धोक्यात

धार्मिक असहिष्णुतेचा वाढता धोका: अल्पसंख्याक धर्मीय प्रार्थनास्थळे धोक्यात

        मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात घडलेल्या जैन मंदिरावरील हल्ल्याने धार्मिक असहिष्णुतेचे आणखी एक उदाहरण समोर आणले आहे. हिंदू कट्टरतावादी गटांकडून केवळ मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मीयांच्या प्रार्थनास्थळांवरच नव्हे, तर आता जैन धर्मीयांसारख्या शांतताप्रिय समाजाच्या मंदिरांवरही हल्ले होऊ लागले आहेत. या प्रकाराने धार्मिक सलोख्यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

           ४ जानेवारी रोजी सागर जिल्ह्यात जैन धर्मीयांच्या मंदिरावर झालेली तोडफोड आणि महिलांशी झालेल्या गैरवर्तनाने धार्मिक असहिष्णुतेचा विकृत चेहरा दाखवला आहे. या घटनेत केवळ प्रार्थनास्थळांचा अवमान झाला नाही, तर एक शांतताप्रिय समाजाला लक्ष बनवण्यात आले आहे. याआधी मुस्लिम धर्मीयांच्या मशिदी, दर्गे आणि ख्रिश्चन धर्मीयांच्या चर्चवर होणारे हल्ले आपण पाहिले आहेत. आता जैन समाजालाही त्याच असहिष्णुतेचा फटका बसतो आहे.

          या घटनांवरून असे वाटते की, जैन समाजानंतर इतर अल्पसंख्याक समाजांना, जसे की बौद्ध, शीख, आणि पारशी समाजांना सुद्धा अशाच प्रकारच्या घटनांना सामोरे जावे लागणार आहे. हिंदू कट्टरपंथीयांच्या वाढत्या वर्चस्ववादी प्रवृत्तीमुळे अल्पसंख्याक धर्मीय प्रार्थनास्थळे धोक्यात आली आहेत. त्यांचे धर्मस्थळे पाडणे, त्यावर हक्क सांगणे, किंवा त्यांचा धार्मिक अधिकार नाकारणे हे प्रकार अधिकाधिक वाढताना दिसत आहेत.

           भारताची ओळख नेहमीच विविध धर्म, संस्कृती, आणि पंथ यांच्यातील सामंजस्यावर आधारित राहिली आहे. परंतु, अलिकडच्या काळात कट्टरतावादी प्रवृत्ती समाजात विखुरणाऱ्या विचारांचे विष पसरवत आहेत. हे फक्त एका धर्माला लक्ष्य करणारे नाही, तर आपल्या बहुसांस्कृतिक समाजाच्या मुलभूत तत्त्वांवर प्रहार करणारे आहे.

            हिंदू कट्टरतावादी गटांचे उद्दिष्ट केवळ धार्मिक स्थळांवर हल्ले करणे नसून, अल्पसंख्याक समाजांमध्ये भीती निर्माण करणे हे आहे. या गटांना विविध धर्म, संस्कृती, आणि विचारसरणींचे अस्तित्व मान्य नाही, आणि त्यामुळे ते अशा प्रकारचे हल्ले करून त्यांच्या राजकीय आणि धार्मिक वर्चस्वाची योजना आखत आहेत.

          या घटनेनंतर प्रशासनाने सागर शहरात धारा १६३ लागू केली, परंतु हे उपाय तात्पुरते असून, अशा प्रकारच्या घटनांना कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी कडक कायदे आणि त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीची गरज आहे. तसेच, धार्मिक स्थळांचे संरक्षण करण्यासाठी एक विशेष यंत्रणा उभारण्याची गरज आहे.

          धार्मिक असहिष्णुतेच्या या घटना केवळ एका समाजाचे नुकसान करत नाहीत, तर संपूर्ण देशाच्या एकतेला धक्का लावतात. त्यामुळे सर्व धर्मीयांनी एकत्र येऊन या कट्टरतावादी विचारसरणींचा निषेध करणे गरजेचे आहे. धार्मिक सलोखा जपणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.

          जैन मंदिरावरील हल्ला ही एक चेतावणी आहे की, जर अशा कट्टरतावादी प्रवृत्तींना रोखले नाही, तर आपल्या देशाचा बहुसांस्कृतिक आणि बहुधार्मिक तत्त्वांवर आधारित सामाजिक फॅब्रिक उद्ध्वस्त होईल. अल्पसंख्याक धर्मीयांच्या धार्मिक स्थळांवर होणाऱ्या हल्ल्यांवर आळा घालण्यासाठी आणि सर्वधर्मीय सहिष्णुता प्रस्थापित करण्यासाठी प्रशासन, न्यायव्यवस्था, आणि सामान्य नागरिकांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे.

लेखक : डॉ. रियाज़ देशमुख, असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस (रि), औरंगाबाद.