ACB जालनाचे जाळ्यात औरंगाबादेत ८,५३,२५०/- रुपये लाच घेतांना मोठा मासा रंगेहात अडकला...

ACB जालनाचे जाळ्यात औरंगाबादेत ८,५३,२५०/- रुपये लाच घेतांना मोठा मासा रंगेहात अडकला...

औरंगाबाद, दि. ०६ जानेवारी  : परभणी जिल्ह्यातील जलसंधारण विभागातील केलेल्या बांधकामाचे बिल मंजुरीसाठी कंत्राटदाराकडून जलसंधारणाची व्यवस्थापकीय संचालकासाठी साडेसात टक्के व स्वतःसाठी पन्नास हजार रुपये स्वीकारताना लाचखोर उपविभागीय अधिकाऱ्याला औरंगाबादेत रंगेहात पकडण्यात आले.

     या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी आहे की, चोंडेश्वरी कंट्रक्शन, परभणी या कंपनीच्या नावावरती कोल्हापुरी बंधाऱ्याचे गवळी पिंपळी, ता. सोनपेठ, जि. परभणी येथील कामाचे बिल १८,००,०००/- आणि गोविंदपुर ता.पूर्णा जि. परभणी येथील कामाचे बिल १,१९,००,०००/- रु असे मिळुन दोन्ही कामाचे एकूण बिल १,३७,००,०००/- रुपये  काढण्यासाठी जलसंधारण विभाग औरंगाबादचे व्यवस्थापकीय संचालक  सुनील कुशिरे याच्यासाठी ७.५%  प्रमाणे ८,०३,२५०/ रुपये, आणि स्वतःसाठी व महामंडळ कार्यालयाचे मिळून ५०,०००/ रुपये असे एकूण ८,५३,२५०/ रुपयाची मागणी रुषीकेश प्रल्हादराव देशमुख वय  ३४ वर्ष  उपविभागीय जलसंधारण अधिकारी वैजापुर अतिरिक्त चार्ज  उपविभागिय जलसंधारण अधिकारी महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ औरंगाबाद आणि भाउसाहेब दादाराव गोरे, लिपिक, महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ कार्यालय औरंगाबाद यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली. तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी जालना अँटी करप्शन ब्युरो चे कार्यालय गाठले व तिथे तक्रार नोंदवली. 

     जालना अँटी करप्शन ब्युरोचे अधिकाऱ्यांनी तक्रारीची शहानिशा करून घेतली.  औरंगाबाद येथील जलसंधारण महामंडळ औरंगाबादचे कार्यालयात सापळा रचला. आज दुपारी  महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ औरगाबाद कार्यालयासमोर लाचखोर उपविभागीय जलसंधारण अधिकारी रुषीकेश प्रल्हादराव देशमुख  यांने त्याचे ताब्यातील इनोव्हा कार क्रं. MH -20 FG-5005 मध्ये लाचेची रक्कम  स्वीकारली. तेव्हा त्यास रंगेहात पकडण्यात आले. 

      जालना एंटी करप्शन ब्युरोचे शंकर महादेव मुटेकर पोलीस अंमलदार गजानन कांबळे, जमधडे, बुजाडे, खंदारे गिराम यांनी औरंगाबाद अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे आणि जालना अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस उपअधीक्षक सुदाम पाचोरकर यांचे मार्गदर्शनाखाली ही उल्लेखनीय कामगिरी केली.

      वृत्त लिहे पर्यंत सापळा पथकाची पंचनामा इत्यादी कारवाई सुरू होती. ही कारवाई संपल्यानंतर औरंगाबाद येथील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती मिळाली आहे.

     या प्रकरणात जलसंधारण विभागाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील कुशिरे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येते किंवा नाही सध्या तरी ते गुलदस्त्यात आहे. मात्र  ऋषिकेश देशमुख आणि भाऊराव गोरे या दोघांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे समजते.