चक्क महानगरपालिका आयुक्तांच्या बंगल्यासमोर आमरण उपोषण : अत्यावश्यक नागरी सुविधांचा अभाव..
औरंगाबाद : शहरातील हिना नगर, शादाब कॉलोनी, पटेल नगर तसेच इतर भागातील नागरिक मागिल पाच वर्षा पासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. यास प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप येथिल नागरिकांद्वारे केला जात आहे. नागरीकांशी संवाद साधला असता त्यांच्या म्हणण्या नुसार शहरातील वार्ड क्रमांक ३७ हिना नगर, शादाब कॉलोनी तसेच पटेल नगर या परिसरातील नागरिक पाणी, ड्रेनेज लाइन, रस्ते, साफसफाई, तसेच इतर मूलभूत सुविधांपासून मागिल पाच वर्षा पासून वंचित असल्याचे सांगण्यात येत आहे. नागरिकांकडून सर्व प्रकारचे टॅक्स वसुली केल्यानंतरही या मूलभूत नागरी सुविधा प्रशासनाकडून उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. नागरिकांच्या हाती फक्त आश्वासनांचा भोपळाच दिला जातो. कागदोपत्री मात्र सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्याचे दर्शविण्यात आले असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
या परिसरातील नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना यासंबंधीची माहिती अनेक वेळा दिल्याचे, अनेक निवेदने देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु संबंधित अधिकारी या प्रश्नांकडे अज्ञात कारणाने कानाडोळा करीत असल्याचा आरोप केला जात आहे.
महानगरपालिकेत एका मागून एक आयुक्त येतो आणि जातो. महानगरपालिकेचे निवडून आलेले सदस्यांचा कार्यकाळ मागील तीन वर्षापासून संपला असून तेथे नागरिकांचे प्रतिनिधित्व करणारा कोणताही नगरसेवक नाही. राज्य शासनाने महानगरपालिकेचे संपूर्ण कारभार 'प्रशासक' म्हणून महानगर आयुक्तांकडे सोपविले आहे. महानगरपालिके अंतर्गत असलेला हा परिसर सुद्धा स्मार्ट सिटी प्रोजेक्ट मध्ये सामील आहे. परंतु स्मार्ट सिटी प्रोजेक्ट चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक हेच काम पाहत असताना सुद्धा या परिसराकडे अज्ञात कारणाने दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप पण नागरिकांकडून केला जात आहे.
वारंवार निवेदने देऊन, प्रत्यक्ष भेटी देऊन या परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविल्या जात नाहीत. नवीन रुजू झालेले प्रशासकांना या परिसरातील समस्यांची जाणीव करून देण्यासाठी, तसेच या गंभीर समस्यांकडे त्यांचे लक्ष वेधण्यासाठी महानगरपालिके कार्यालयासमोर किंवा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किंवा विभागीय आयुक्त यांचे कार्यालयासमोर उपोषणाला न बसता चक्क महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक तथा स्मार्ट सिटी प्रोजेक्ट चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नुकतेच या पदावर रुजू झालेले आईएएस अधिकारी जी. श्रीकांत यांच्या बंगल्यासमोर उपोषणाला बसण्याचा निर्णय दैनिक शब्दमत चे संपादक तथा समाजसेवक अज़मत पठाण यांनी घेतला आहे. या आमरण उपोषणाबाबतची माहिती त्यांनी महानगरपालिका प्रशासनास निवेदनाद्वारे दिली आहे.
महानगरपालिकेचे माजी आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी अद्याप महानगरपालिका आयुक्तांचा 'जलश्री' हा बंगला रिकामा केला नाही. मिळालेल्या माहितीनुसार या आठवड्यात ते बंगला रिकामा करणार असून नंतर नवनियुक्त आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत हे जलश्री या बंगल्यावर राहण्यासाठी येतील. ज्या दिवशी जी. श्रीकांत हे जलश्री या बंगल्यावर राहायला येतील त्याच दिवशी अजमत पठाण हे उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी सांगितले.