औरंगाबाद खंडपीठाने रंद्द केली शिक्षा : ॲड. सईद शेख यांचा युक्तिवाद ठरला निर्णायक

छत्रपती संभाजी नगर १३ सप्टेंबर: परभणी जिल्ह्यातील कोटंबवाडी येथील मुसा शेरखा पठाण यांना एकच प्लॉट दोनदा विक्री प्रकरणात प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी, परभणी यांनी तीन वर्षांचा सश्रम कारावास व ३५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली होती. मात्र, ॲड. सईद शेख यांच्या युक्तिवादामुळे अखेर औरंगाबाद खंडपीठाने ही शिक्षा रद्दबातल केली.
या प्रकरणात तक्रारदार शेख रफिक शेख चाँद यांनी २०११ मध्ये दिलेल्या तक्रारीवरून भादंवि कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर २०१९ मध्ये खालच्या न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. याविरोधात आरोपी पठाण यांनी अपील दाखल केले होते.
खंडपीठासमोर ॲड. सईद शेख यांनी बाजू मांडताना सांगितले की, हा वाद खाजगी स्वरूपाचा असून तक्रारदार आणि आरोपीमध्ये परस्पर तडजोड झाली आहे. याचिकाकर्त्याने तिसऱ्या व्यक्तीच्या नावावर केलेले खरेदीखतही रद्द केले असल्यामुळे तक्रारदारास प्लॉटची मालकी स्पष्ट झाली आहे. त्यामुळे शिक्षेला काहीही अर्थ उरत नाही.
न्यायमूर्ती विभा वि. कनकनवाडी व न्यायमूर्ती हितेन एस. वेनेगावकर यांच्या खंडपीठाने या युक्तिवादाला मान्यता देत ३ वर्षांचा कारावास व दंडाची शिक्षा रद्द करण्याचे आदेश दिले. मात्र, याचिकाकर्त्यास दोन आठवड्यांत ३५ हजार रुपये दंड उच्च न्यायालय विधी सेवा समितीकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणात ॲड. सईद शेख यांना अॅड. शोएबोद्दीन सिद्दीकी (परभणी) यांनी सहकार्य केले. तर शासनाच्या बाजूने सहाय्यक सरकारी वकील गोविंद कुलकर्णी आणि तक्रारदारांच्या वतीने अॅड. सिद्धेश जाधवर यांनी बाजू मांडली.