बौध्दांसाठी ५००० कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा, अल्पसंख्यांक मंत्रालयाकडे मागणी

बौध्दांसाठी ५००० कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा, अल्पसंख्यांक मंत्रालयाकडे मागणी

छत्रपती संभाजीनगर, दि. 09 सप्टेंबर –
भारतीय संविधानाच्या अनुच्छेद क्र. 29 व 30 मध्ये दिलेल्या तरतुदीनुसार बौध्द समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी अल्पसंख्यांक विभागाने विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी ठाम मागणी दि. बुध्दिस्ट उपासक उपासिका फाउंडेशनचे अध्यक्ष शरद जाधव यांनी केली आहे.

      या मागणीसंदर्भात अल्पसंख्यांक आयुक्त प्रतिभा इंगळे (IAS) यांची भेट घेऊन सखोल चर्चा करण्यात आली. या चर्चेत इंगळे यांनी जिल्हा प्रशासनाला योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश देण्याचे आश्वासन दिले.

       शरद जाधव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बौध्द समाज अल्पसंख्यांक असूनदेखील त्यांना नेहमीच नैसर्गिक न्यायापासून दूर ठेवले जात आहे. त्यांच्या विकासासाठी व उन्नतीसाठी विभागाने तातडीने विशेष उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.

प्रमुख मागण्या :

• बौध्द समाज व बौध्द विहारांचे विशेष सर्वेक्षण करून विकास व सुशोभिकरणासाठी निधी द्यावा.

• गौतम बुध्दांच्या प्रतिमा व बौध्द विहारे शासकीय जागांवर असल्यास त्या जागा नियमीत करून द्याव्यात.

• प्रत्येक बौध्दविहारास विपश्यना केंद्र म्हणून घोषित करून आवश्यक सोयीसुविधांसाठी निधी द्यावा.

• बौध्द पौर्णिमा राज्यभर मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी 500 कोटी रुपयांचा निधी थेट बौध्द संस्था व विहारांना द्यावा.

• नवीन बौध्द विहारे उभारण्यासाठी व देखभालीसाठी वार्षिक 12 लाख रुपयांची मदत द्यावी.

• बौध्द स्मशानभूमीसाठी जागा व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

• बौध्द तरुण-तरुणींना लघुउद्योग व मध्यम उद्योग उभारणीसाठी 5000 कोटी रुपयांची थेट मदत द्यावी.

• ज्यांच्याकडे घरे व जागा नाहीत अशा बौध्द कुटुंबांना घरे द्यावीत व त्यांच्या वस्त्यांमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

• बौध्द विहारांमध्ये वाचनालय व अभ्यासिका उभारण्यासाठी विशेष अनुदान द्यावे.

      शरद जाधव यांनी ठामपणे सांगितले की, “भगवान गौतम बुध्द हे केवळ भारतापुरतेच नाहीत, तर ते विश्वाचे मार्गदाते आहेत. त्यामुळे बौध्द समाजाच्या उन्नतीसाठी शासनाने विशेष पावले उचलून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे ही काळाची गरज आहे.”

      या निवेदनावेळी फाउंडेशनचे उपाध्यक्ष डॉ. प्रमोद दुथडे, कोषाध्यक्ष के.बी. दिवेकर, अशोक आनंदराव, डॉ. सुनिल पगडे, सविता अभ्यंकर, पंडित नरवडे, सिध्दार्थ बनसोडे, भगवान म्हस्के, दादाराव खंडगळे, बाबुराव वाकेकर, देवीदास काकडे, जितेंद्र भवरे, शेषराव सातपुते, राज चौथमोल, राजु नरवडे, रामदास अभ्यंकर आदी मान्यवर उपस्थित होते.

बौध्दांसाठी ५००० कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा, अल्पसंख्यांक मंत्रालयाकडे मागणी
Minority Ministry Urged to Allocate 5000 Cr for Buddhists