वक्फ जमिनींच्या संरक्षणासाठी काझींची झुंजार भूमिका : प्रशासनाला दाखवला अधिकार

धाराशिव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री दर्जा असलेले समीर गुलामनबी काझी यांनी धाराशिव जिल्ह्यातील वक्फ जमिनींवरील अतिक्रमण आणि महसुली अभिलेखातील गोंधळाबाबत प्रशासनाला थेट धारेवर धरले. “वक्फ संपत्तीवर कोणीही बेकायदेशीर अतिक्रमण करू नये, असे झाल्यास वक्फ अधिनियम १९९५ च्या कलम ५२(ए) नुसार फौजदारी कारवाई होईल,” असे स्पष्ट शब्दांत आदेश त्यांनी दिले.
सोमवार, दि. ८ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे या संदर्भात बैठक पार पडली. बैठकीत नवीन वक्फ (उम्मीद) अधिनियमातील महसूल विभागाची भूमिका, शासन निर्णय दि. १३ एप्रिल २०१६ ची अंमलबजावणी, वक्फ जमिनींचे भूसंपादन, अतिक्रमण, अवैध खालसा तसेच नगर परिषद क्षेत्रातील बेकायदेशीर अतिक्रमण या सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.
या बैठकीत जिल्हाधिकारी धाराशिव किर्ती किरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव. मैनक घोष, जिल्हा वक्फ अधिकारी सय्यद आमेर खैसर पटेल, सर्व नगर परिषदेचे मुख्याधिकारी, पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व इतर अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीची खास बाब म्हणजे यापूर्वी वक्फ मंडळाच्या अध्यक्षांनी अशा प्रकारे जिल्हा प्रशासनाशी थेट बैठक घेतलेली नव्हती. समीर काझी यांनीच प्रथम असा उपक्रम राबवला. याआधीही त्यांनी मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे घेतली होती. त्यांच्या या पद्धतीमुळे केवळ चर्चा नाही, तर प्रत्यक्ष कारवाई घडवून आणण्याची दिशा प्रशासनाला मिळत आहे.
त्यांनी फक्त जिल्हा प्रशासनालाच नाही तर स्वतःच्या हाताखालच्या अधिकाऱ्यांनाही कामाला लावले पाहिजे, असा सूर या बैठकीत दिसून आला. विशेषतः वक्फ मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे मुंबईत बसूनच काम उरकतात, महिन्यातून एकदा बैठक घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर मुख्यालयी येतात, अशी टीका होत असते. समीर काझी यांनी त्यांनाही आता नियमित कामकाजासाठी सजग केले पाहिजे, अशी मागणी वर्तुळात जोर धरत आहे.
समीर काझींच्या या बैठकीमुळे केवळ धाराशिव जिल्ह्यातीलच नव्हे, तर संपूर्ण मराठवाड्यात वक्फ संपत्तीवरील अतिक्रमणाबाबत कठोर कारवाई होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर विभागांमध्येही अशीच बैठक घ्यावी व प्रशासनाला जबाबदारीने कामाला लावावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
वक्फ जमिनींचे संरक्षण, अतिक्रमण निर्मूलन आणि पारदर्शक नोंदी ठेवण्यासाठी समीर काझी यांनी उचललेले हे पाऊल निश्चितच प्रशंसनीय ठरत असून, वक्फ मंडळाच्या इतिहासात नवा टप्पा मानला जात आहे.