मस्जिद वरील बॉम्बहल्ला: पोलिसांची संशयास्पद भूमिका, न्यायालयाने हिंदू दहशतवाद्यांचा जामीन फेटाळला

मस्जिद वरील बॉम्बहल्ला: पोलिसांची संशयास्पद भूमिका, न्यायालयाने हिंदू दहशतवाद्यांचा जामीन फेटाळला

बीड, २० जुलै: बीड जिल्ह्यातील अर्धमसाला गावात २९ मार्च २०२५ रोजी हजरत सय्यद बादशाह यांच्या दर्ग्याच्या संदल कार्यक्रमात हिंदू-मुस्लिम बांधवांनी ऐक्याने जुलूस काढले. मात्र, यावेळी विजय गव्हाणे आणि श्रीराम सांगळे यांनी मुस्लिमांना गावात नव्याने बांधलेली मक्का मस्जिद पाडण्याची धमकी दिली आणि अश्लील शिवीगाळ तसेच भडकवणारी भाषा वापरली. गावकऱ्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याच रात्री २ ते ३ वाजण्याच्या सुमारास मक्का मशिदीत जोरदार बॉम्ब स्फोट झाला. मशिदीच्या खिडक्या, दरवाजे, फरशी आणि धार्मिक ग्रंथांचे नुकसान झाले. काही लोकांनी आरोपींना घटनास्थळावरून पळून जाताना पाहिले. फिर्यादी राशिद अली हुसेन सय्यद यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली, की आरोपींनी जेलेटिनसारख्या स्फोटकांचा वापर करून मस्जिद मध्ये बॉम्बस्फोट घडवला, मस्जिदचे नुकसान केले हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करण्याचा आणि मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा कट रचला. याशिवाय, विजय गव्हाणेने इंस्टाग्रामवर जेलेटिनच्या कांड्या दाखवणारा व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप आहे.

          पोलिसांनी सुरुवातीला या गंभीर प्रकरणात भारतीय न्याय संहिता आणि स्फोटके कायद्याच्या सौम्य कलमांखाली गुन्हा दाखल केला, पण हिंदू दहशतवाद्यांना पाठिशी घालण्यासाठी अनलॉफुल अ‍ॅक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन अ‍ॅक्ट (यूएपीए) ची गंभीर कलमे १५, १६ आणि १८ लागू केली नाहीत. ही पोलिसांची हेतुपुरस्सर निष्क्रियता आणि पक्षपातपूर्ण वृत्ती असल्याचा आरोप मुस्लिम समाजातील जाणकारांनी केला. या संशयास्पद भूमिकेमुळे हिंदू दहशतवाद्यांना प्रोत्साहन मिळत असल्याची टीका झाली. लोकांच्या रोषानंतर आणि वर्तमानपत्रामधील लेखांमुळे पोलिसांना नाइलाजास्तव यूएपीएची ही कलमे लागू करावी लागली. मात्र, या गंभीर प्रकरणात सौम्य कलमे लावणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई न झाल्याने पोलिसांच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

         हा खटला बीड जिल्ह्याच्या विशेष न्यायालयात सध्या प्रलंबित आहे. आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला, पण सरकारी वकील बी.एस. राख आणि फिर्यादींचे वकील अ‍ॅड. सय्यद अजहर अली यांनी सशक्त युक्तिवाद केला. मशिदीवरील बॉम्ब हल्ल्याचे गंभीर स्वरूप आणि समाजात तेढ निर्माण करण्याचा कट लक्षात घेता न्यायालयाने विजय गव्हाणे आणि श्रीराम सांगळे या दोन्ही हिंदू दहशतवाद्यांचा जामीन अर्ज फेटाळला.

        पोलिसांनी हिंदू दहशतवाद्यांना पाठिशी घालण्यासाठी सौम्य कलमे लावून गंभीर गुन्ह्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. अशा पक्षपाती कारवाईमुळे सामाजिक सलोख्याला धक्का बसण्याची भीती आहे. पोलिसांनी निष्पक्षपणे आणि कठोर कारवाई करणे अपेक्षित होते, पण त्यांच्या या संशयास्पद भूमिकेमुळे जनतेचा विश्वास डळमळीत झाला आहे.