बँक कॅन्टीनमध्ये गोमांस बंदीचा आदेश: निषेधार्थ कर्मचाऱ्यांची बँकेत बीफ पार्टी

बँक कॅन्टीनमध्ये गोमांस बंदीचा आदेश: निषेधार्थ कर्मचाऱ्यांची बँकेत बीफ पार्टी

तिरुवनंतपुरम (प्रतिनिधी) – कोचीतील कॅनरा बँक शाखेत गुरुवारी कर्मचाऱ्यांनी एक वेगळ्या पद्धतीने निषेध नोंदवला. कारण शाखेचे नव्याने रुजू झालेले उपक्षेत्रीय व्यवस्थापक अश्विनी कुमार (मूळचे बिहार) यांनी बँकेच्या कँटीनमध्ये बीफ (गोमांस) बंदी घालण्याचे आदेश दिल्याचा आरोप आहे. या निर्णयाचा विरोध म्हणून कर्मचाऱ्यांनी थेट शाखेबाहेर बीफ आणि परोट्याची मेजवानी ठेवून निषेध व्यक्त केला.

       या आंदोलनाचे आयोजन बँक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया (BEFI) यांनी केले होते. सुरुवातीला कर्मचाऱ्यांवरील छळवणुकीविरोधात आंदोलन करायचे ठरले होते. परंतु बीफवरील बंदीची माहिती समोर आल्यानंतर निषेधाचा केंद्रबिंदू बदलला. फेडरेशनच्या नेत्यांनी स्पष्ट केले की, अन्न निवड हा व्यक्तीचा वैयक्तिक अधिकार असून तो भारताच्या संविधानाने संरक्षित केला आहे.

       बँकेच्या केंद्रीय नेतृत्वाने अद्याप या वादावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र राज्यातील अनेक राजकीय नेते कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत.

     स्वतंत्र आमदार व डाव्या आघाडीचे समर्थक के.टी. जलील यांनी या प्रकरणाचा निषेध केला. त्यांनी फेसबुकवर पोस्ट करताना लिहिले – “वरिष्ठ अधिकारी काय खायचे, काय घालायचे किंवा काय विचार करायचे हे ठरवू शकत नाहीत. केरळमध्ये ‘संगही’ अजेंडा चालणार नाही. येथे लाल माती आहे. आपण निर्भयपणे फॅसिस्टांविरुद्ध बोलायला व उभे राहायला हवे. कम्युनिस्ट जेव्हा सोबत असतात तेव्हा कुणालाही भगवा झेंडा घेऊन शांततेत गोंधळ घालता येणार नाही.”

       केरळमध्ये गोमांस हा नेहमीच आहाराचा महत्त्वाचा भाग राहिला आहे. २०१७ मध्ये केंद्र सरकारने कत्तलीसाठी जनावरांची विक्रीबंदी केली होती, तेव्हाही केरळात मोठे आंदोलन झाले होते आणि बीफ फेस्टिव्हल्स घेण्यात आले होते.

     bयेथील जनजीवनात गोमांसाला धार्मिक रंग नाही. काही हिंदू समुदायसुद्धा मोठ्या प्रमाणावर गोमांस खातात. विक्रीच्या आकडेवारीनुसार केरळमध्ये सर्वाधिक लोकप्रिय मांस म्हणजे बीफ आहे.

       थोडक्यात, बँकेच्या अधिकाऱ्याच्या आदेशामुळे कर्मचाऱ्यांचा आहाराचा प्रश्न वादाचा विषय ठरला असून, त्यातून केरळातील सांस्कृतिक स्वातंत्र्य विरुद्ध सक्ती असा मोठा राजकीय मुद्दा उभा राहिला आहे.