गुस्ताखी माफ: "द ग्रेट इम्तियाज जलील" - वॉल ऑफ औरंगाबाद", याला म्हणतात नेतृत्व

गुस्ताखी माफ: "द ग्रेट इम्तियाज जलील" - वॉल ऑफ औरंगाबाद", याला म्हणतात नेतृत्व

      गेली चाळीस वर्षे ऐतिहासिक औरंगाबाद शहराला गालबोट लावणाऱ्या अनेक घटनांचे आम्ही साक्षीदार. एखादी अप्रिय घटना घडल्या नंतर त्यावर काबू मिळविण्याचा साठी पोलीस पेक्षा जास्त जबाबदारी राजकीय नेतृत्वाची असते. बुधवारी रात्री शहराच्या किराडपुरा भागात काही बटन टोळक्याने जो धुमाकूळ घातला, तो स्वीकार्य नाहीच नाही. मात्र बघता-बघता ज्या गतीने वातावरण पालटले ते अत्यंत धक्कादायक आहे. वाटत होतं या घटनेचे लोण शहरात इतरत्र पसरते की काय? या  "संकटाच्या घडीत तो धावून आला, काही काळ तो हळहळला, मात्र गडबडला नाही. त्यांने एकट्याच्या बळावर तितक्याच खुबीने परिस्थिती आटोक्यात आणली. तो सोशियल मेडीयावर ज्या पद्धतीने हात जोडून शहरवासीयांना कळकळीची विनंती करत होता त्यावरून त्याची शहराच्या सामजिक सामंजस्य साठी तळमळ किती? हे कळतंय. म्हणूनच आम्ही या अद्वितीय देवदूताला खिताब देतोय.... "द ग्रेट इम्तियाज जलील : वॉल ऑफ औरंगाबाद", आणि याच वेळी शहराचे पोलीस आयुक्त यांच्या कल्पक नेतृत्वाच्या संयमाला ही सॅल्युट..!!

हुश्श.... आम्ही वाचलोय.....!!
    अनेकांना वाटत असेल खासदार इम्तियाज जलील यांचा इतका उदो-उदो कशाला?  मात्र सत्य स्वीकारण्याची ताकत असायला हवी. काल रात्रीच्या घटने नंतर खासदारांचे राजकीय शत्रू ही त्यांचे चाहते झालेत...! किराडपुरा भागात राममंदिर असल्याने हा भाग नेहमी संवेदनशील मानला जातो. रात्री नेमकी घटना याच ठिकाणी रस्त्यावर घडली. जलील जेव्हा त्या ठिकाणी पोहोचले तेव्हा त्यांनी वेळ न घालता थेट मंदिरात जाऊन ठिय्या मांडला. तेथील पुजारी, महिला, कर्मचारी यांच्या घरात जाऊन तुमच्या संरक्षणाची जबाबदारी माझी आहे, तुम्ही घाबरू नका म्हणून धीर दिला. त्यातच शिंदे गटाचे राजेंद्र जंजाळ, राष्ट्रवादीचे विनोद पाटील व इतर नेत्यांशी संपर्क साधून राममंदिरात काहीच घडलं नाही म्हणून थेट व्हिडीओ कॉन्फरन्स करून पटवून दिलं. त्याच वेळी शहराच्या जनतेला हात जोडून शांततेचे आवाहन करत संयम बाळगा, शांती भंग करू नका, म्हणून विनवणी केली. एका भिंती सारखे रात्रभर राममंदिराचा किल्ला लढवला. स्वतःवर दगड येत असतांना मात्र मंदिराला किंवा तिथल्या महिला व कर्मचाऱ्यांना किंचित ही इजा पोहोचू दिली नाही. एकी कडे दगडफेक होत असताना त्या क्षणी कल्पकतेने निर्णय घेत आपल्या कर्तृत्वाचा परिचय दिला. त्या मुळे लाखो शहर वासी अर्ध्या रात्री का असेना निवांत झोपले. आज सकाळी शहरात असं काही घडलं, किंचितही वाटलं नाही. काही तासात हा बदल घडवून आणला म्हणून.... "द ग्रेट इम्तियाज जलील".

     राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही शहराच्या घटनेवर जे संयमाने वक्तव्य दिलं, त्यांचे ही अभिनंदन..!!शहराच्या शांततेला तडा जाऊ दिलं जाणार नाही. नामांतरशी या प्रकरणाचा काडीमात्र संबंध नाही. हे सांगताना त्यांनी राजकारण केले नाही. त्यात डॉ. निखिल गुप्ता यांनी ज्या प्रकारे शहराच्या इतर भागात पडसाद उमटू दिलं नाही म्हणून त्यांचे ही अभिनंदन. प्रकरण दोन गटांचे असल्याचे सांगत राजकीय पुंग्या वाजविणाऱ्यांची त्यांनी हवाच काढून घेतली. पोलिसांचा संयम ही शहराच्या शांततेला कायम ठेवण्यासाठी उपयोगी ठरला.

      आज आम्ही दिवस भरात अनेक शहराच्या जुन्या-जाणत्यांशी चर्चा केली. यात अनेक राजकीय पक्षाचे शिलेदार ही आहेत. त्या सर्वांनी खासदार जलील यांची तोंडभरून स्तुती केली. आपल्या शहराच्या जातीय सलोख्याला तडा जाऊ नाही, म्हणून खंबीरपणे हा माणूस भिडला, लढला, उभा राहिला. आपल्या जीवाची पर्वा न करता राम मंदिराचे संरक्षण केले. हे मंदिर जितके तुमचे आमचे ही तितकेच, आपल्या राजकीय स्वार्थया साठी शहराची अब्रू घालणाऱ्यांना ही त्यांनी चांगलाच चोप दिला. मंदिराचे संरक्षक, रखवालदार आम्हीच, ही जाणीव त्यांनी करून दिली. हा संदेश छोटा नाही. बाहेरच्या विषारी लोकांना शहरात आणून शहराची सामाजिक सामंजस्य बिघडवणाऱ्यांनाही हा टोला, धडा...!!(जयहिंद)

अशफाक शेख,
वरिष्ठ पत्रकार, औरंगाबाद, 31/03/2023