डोळ्यांचे आरोग्याची काळजी घ्या..!

डोळ्यांचे आरोग्याची काळजी घ्या..!

गेल्या काही वर्षात संगणकावर काम केल्याने, प्रदूषणामुळे डोळ्याच्या तक्रारी सातत्याने वाढत्या आहेत. डोळे दुखणे, चुरचुरणे, लाल होणे, डोळ्यांची आग होण्याचा त्रास होतो. मात्र डोळ्यांची काळजी घेतली जात नाही. शांतपणे डोळे बंद करून बसणं गरजेचं असतं, त्यामुळे डोळ्यांचं स्वास्थ्य सुधारतं. पण या साध्या मात्र अतिशय महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिलं जात नाही. त्यामुळे डोळ्यांचे आजार व त्यांच्याशी संबधित समस्या वाढत आहेत.

काय होतोय त्रास?
कमी वयात चष्मा लागणं, डोळ्यांच्या खाली काळे वलय तयार होणं, पापण्यांवर सूज येणं, डोळ्याची जळजळ होणं, डोकेदुखी या सारख्या डोळ्यांशी संबंधित आजारांचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून वाढले असल्याचे जाणवते. जेव्हा आपण कम्प्युटर व टीव्ही समोर बसतो तेव्हा डोळ्यांवर जास्त ताण पडतो. त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बाहेर पडणारे विद्युत तरंग नाजूक डोळ्यांना हानी पोहोचवतात. त्याने रात्री उशिरापर्यंत टीव्ही, मोबाइल पाहत राहिल्याने मेंदूतही ताण निर्माण होतो. याव्यतिरिक्त प्रदूषण, धूळ, माती यामुळे डोळ्यांना हानी पोहोचते. डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी प्रयत्न न करणं आणि बदलती जीवनशैली यामुळे लहान वयात चष्मा लागणं, लहान वयातच मोतिबिंदू होणं, डोळे कोरडे पडणं, डोळ्यांतून सतत पाणी येणं, डोळे लाल होणं, डोळ्यांच्या तक्रारींमुळे डोकं दुखणं अशा तक्रारी असलेल्या रुग्णांची संख्याही वाढतेय. डोळ्यांना जंतूसंसर्ग होऊ नये, यासाठी तज्ज्ञांना दाखवून तातडीने उपचार करून घेणं गरजेचं आहे.

ही काळजी घ्या
नेत्रपटलास यूव्ही लाइटमुळे इजा झाल्यास नजर कमी होण्याचा धोका असतो. म्हणून यूव्ही लाईट्समुळे पापण्यांच्या त्वचेसही सनबर्न होऊ शकतो. त्यासाठी योग्य ती काळजी घेतली तर उन्हाळ्यातील डोळ्यांचे आजार सहज टाळता येऊ शकतात.

हे टाळा
लहान मुलांना उन्हाळ्यात काजळ लावू नये. महिलांनी चेहऱ्यावर कॉस्मेटिक वापरताना ते डोळ्यात जाणार याची काळजी घ्यावी. फूटपाथवर गॉगल्सची विक्री केली जाते. मात्र, हे गॉगल्सची काच ही डोळ्याला घातक असते. त्यामुळे गॉगल स्वस्त मिळत असेल तरी ते वापरू नयेत. डोळ्यात स्वतःचे कोणतेही औषध घालू नये, डोळ्यांमध्ये काही गेल्यास डोळा चोळू नये. डोळे दोन वेळा थंड पाण्याने हबका मारुन धुतले तर त्यामुळे डोळ्यांना गारवा मिळतो.

• डॉ. विशाल एम. कर्णिक, नेत्ररोगतज्ज्ञ