डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे विडंबन : फौजदारी गुन्हा दाखल करा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे विडंबन : फौजदारी गुन्हा दाखल करा

छत्रपती संभाजीनगर,, २२ जून: माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अन्याय अत्याचार विरोधी कृती समिती द्वारा उद्या (ता. २३ जून) निघणाऱ्या जन आक्रोश मोर्चाची जाहिरात शहरातील प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये (पूर्ण पानाची) मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध करण्यात आली. मात्र या जाहिरातीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो चुकीच्या पद्धतीने छापल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

          डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पारंपरिक, जगप्रसिद्ध फोटो — ज्यात त्यांच्या डाव्या हातात संविधान आणि उजवा हात संसद भवनाकडे निर्देश करत असतो — असा दर्शविला जातो. मात्र, सदर जाहिरातीत हा फोटो उलट सादर केला गेला असून, त्यात उजव्या हातात संविधान आणि डाव्या हाताचे बोट निर्देश करताना दाखवण्यात आले आहे. ही बाब आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावणारी असून अत्यंत निंदनीय आहे.“ ही केवळ चूक नाही, तर महामानवाच्या प्रतिमेचे विडंबन आहे,” असा रोष व्यक्त केला आहे.

           या चुकीला जबाबदार कोण? आक्रोश मोर्चा काढणारे की जाहिरात छापणारे वर्तमानपत्र? हा प्रश्न आता गंभीरपणे उपस्थित झाला आहे. या कृतीमुळे आंबेडकरी समाजात तीव्र नाराजी असून संबंधितांवर भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी जोरदार मागणी होत आहे.