ATM मशीनीत कार्ड टाकताच निघाले दहा हजार : प्रामाणिक तरुणांनी गाठले पोलीस स्टेशन

ATM मशीनीत कार्ड टाकताच निघाले दहा हजार : प्रामाणिक तरुणांनी गाठले पोलीस स्टेशन

औरंगाबाद 13 सप्टेंबर : आज सकाळी पडेगावातील वाणी कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या एचडीएफसी बँकेच्या एटीएम मशीन मधून पैसे काढण्यास पडेगावातील दोन तरुण नामे ज्ञानेश्वर आढाव आणि विलास सोनवने हे गेले. मशीन मध्ये एटीएम कार्ड टाकताच मशीन मधून आवाज येऊन  नोटा बाहेर निघाल्या.  कोणतीही एंट्री न करता मशीन मधून पैसे निघाल्याने त्यांना आश्चर्य वाटलेे नोटा बाहेर काढून त्यांनी मोजणी केली असता त्या नोटा दहा हजार रुपयाच्या होत्या. 

     या दहा हजार रुपयाच्या नोटा आपल्या अगोदर एटीएम मशीन मध्ये आलेल्या इसमाच्या असाव्या असे त्यांना वाटले. परंतु तो ईसम कोण होता? हे त्यांना माहित नसल्याने त्या दोन्ही प्रामाणिक तरुणांनी तात्काळ छावणी पोलीस स्टेशन गाठले. आणि पोलीस स्टेशन मध्ये ड्युटीवर असलेले पोउपनि. भागिले व सपोउपनि पांडूरंग डाके यांचेकडे सविस्तर हकीकत सांगून ती दहा हजार रुपयांची रक्कम त्यांचे सुपूर्द केली.

     थोड्याच वेळात पोलीस स्टेशन छावणी येथे पडेगाव चे माजी नगरसेवक सुभाष शेजवळ आले व त्यांनी पोलीस उपनिरीक्षक भागिले यांना सांगितले की ते सकाळी एचडीएफसी बँकेचे वाणी कॉम्प्लेक्स येथील एटीएम मशीनमधून पैसे काढण्यास गेले होते. दहा हजार रुपये काढण्यासाठी त्यांनी आवश्यक एंट्रीज़ केल्या परंतु बराच वेळ थांबून सुद्धा पैसे मशीन मधून आले नसल्याने तेथून बाहेर पडले. परंतु काही वेळाने त्यांचे मोबाईलवर मेसेज आली की त्यांच्या अकाउंट मधून दहा हजार रुपये डेबिट झाले आहे. 

     पोलीस उपनिरीक्षक भागिले आणि सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक डाके यांनी खातरजमा करून दोन पंचांचे समक्ष प्रामाणिक तरुणांनी आणून दिलेली दहा हजार रुपयाची रक्कम सुभाष शेजवळ यांचे स्वाधीन केली. सुभाष शेजवळ यांनी दोन्ही तरुणांविषयी कृतज्ञता व्यक्त करून आभार मानले.