महाराष्ट्र शासनाचे अल्पसंख्यांक आयुक्तालय औरंगाबादेत : पहिले आयुक्त म्हणून मोईन ताशिलदार यांची नियुक्ती
औरंगाबाद, २१ जून : महाराष्ट्रातील अल्पसंख्यांकांचे सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने अल्पसंख्यांक आयुक्तलय निर्माण केले जातील अशी घोषणा लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी केली होती. आणि त्याचे मुख्यालय औरंगाबाद येथे राहील असे घोषित केले होते. त्याची अंमलबजावणी लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता संपल्यानंतर लगेच सुरुवात करण्यात आली आहे.
आज महाराष्ट्र अल्पसंख्यांक विकास मंत्रालयाने अल्पसंख्यांक आयुक्त म्हणून मंत्रालयात कार्यारत असलेले उपसचिव मोईन ताशिलदार यांची पहिले आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. लवकरच ते औरंगाबाद येथे येऊन अल्पसंख्यांक आयुक्त म्हणून पदभार सांभाळतील.
मोईन ताशिलदार यांची ओळख अत्यंत शिस्तप्रिय, दबंग, उत्तम प्रशासक, धडाडीने कार्य करणारे, आणि निर्णायक क्षमता असलेले दबंग अधिकारी म्हणून आहे. याचे दर्शन त्यांनी मागील एक दीड वर्षे महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर असताना संपूर्ण महाराष्ट्राला घडवून दिले आहे. वक्फ अधिनियमाची काटेकोर अंमलबजावणी करत वक्फ मंडळातील आळशी आणि कासव गतीने काम करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कामाला लावले. पारदर्शकपणे कोणत्याही दबावाला किंवा आमिषाला बळी न पडता ६० अधिकारी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबवली. वक्फ बोर्डाची इन्कम वाढवण्यासाठी कधीही वक्फ फंड न भरणारे पंधरा हजार वक्फ संस्थांना नोटिसेस देऊन वक्फ फंड भरण्यास भाग पाडले. वक्फ मालमत्तेसंबंधी गैरव्यवहार करणाऱ्या अनेक संस्थांचे विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करीत असे शेकडो वक्फ संस्थाचालकांना त्यांचे विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल का करण्यात येऊ नये म्हणून नोटीसा पाठवून त्यांना सळो की पळो केले.
असे सद्गुणी मोईन ताशिलदार यांची पहिले अल्पसंख्यांक आयुक्त पदी नियुक्ती झाल्याने अल्पसंख्यांकांचे विकासासंबंधी व प्रश्नांसंबंधी, तसेच १५ कलमी कार्यक्रम राबविण्यात निश्चितच गती प्राप्त होईल. अशी आशा व्यक्त केली जात आहे.