आता रेल्वेच्या वेबसाईटवरून एसटीचेही रिझर्वेशन
अकोला, दि.१३ सप्टेंबर (प्रतिनिधी- मोतेबर देशमुख): एसटी महामंडळाची सेवा रेल्वेच्या प्रवाशांना देखिल उपयोगी पडावी या उददेशाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीमध्ये एसटी महामंडळ व इंडियन रेल्वे केटरिंग ॲन्ड टुरिझ्म कॉर्पोरेशन (IRCTC) यांच्यामध्ये मुंबई येथे सामजंस्य करार करण्यात आला. यामुळे इंडियन रेल्वे केटरिंग ॲन्ड टुरिझ्म कॉर्पोरेशनच्या संकेतस्थळावरुन (https://www.bus.irctc.co.in) प्रवाशांना एसटीचे तिकीट देखिल आरक्षित करता येणार आहे.
रेल्वेच्या एकुण प्रवाशी संख्येपैकी 75 टक्के प्रवाशी इंडियन रेल्वे केटरिंग ॲन्ड टुरिझ्म कॉर्पोरेशनच्या संकेतस्थळावरुन तिकीट आरक्षित करतात. या सर्व प्रवाशांना आता एसटी बसचे तिकीट देखिल आरक्षित करणे शक्य होईल. त्यामुळे एसटीच्या प्रवाशी संख्येमध्ये वाढ होणार आहे. तसेच प्रवाशांना रेल्वे आणि एसटीच्या संयुक्त प्रवासाचे नियोजन करणे शक्य होईल. अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.
या कार्यक्रमाला परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, पराग जैन नैनुटिया, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्यासह IRCTC च्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती सिमा कुमार या उपस्थित होत्या.